प्रवास
“प्रवास” तो परिसर म्हणजे जणू धरतीवरील स्वर्ग असावा. सगळीकडे हिरवी , पोपटी पाने असलेली डौलदार झाडे आनंदात डुलत होती. त्यावर गुलाबी , लाल , पिवळी , आबोली अशा विविध रंगांची फुले फुललेली होती. तिथल्या वातावरणातून प्रसन्नता ओसंडून वाहत होती. पायाखाली मऊशार हिरवे , लुसलुशीत गवत पसरलेले होते. त्यावरील साचलेल्या दवाचा गारवा पायांना जाणवत होता. फुलपाखरांची लगबग जाणवत होती. वातावरणात एक हवीहवीशी शांतता होती. फुलावर उडणाऱ्या त्या रंगीत फुलपाखराला धरण्याचा मोह अनावर झाला होता. तरीही हळूहळू चालता चालता कुठले बरे फुलपाखरू आपल्या हातात येईल याचा मी अंदाज बांधत होते. एका फुलावर मध गोळा करण्यात गुंगलेल्या फुलपाखराला मी हळूच स्पर्श केला आणि त्याला उचलून हातात घेतले. त्याला स्पर्श करताच त्या नाजूक फुलपाखराची एक मोठी अळी झाली. हाताच्या दाबाने ती आली फुटून त्यातून काळसर द्रव वाहू लागला. त्या द्रवाची भयंकर दुर्गंधी येत होती. स्वतःच्याच हाताची त्या क्षणी प्रचंड किळस वाटू लागली. हात झटकला तरी तो काळा द्रव हट्टी मुलासारखा चिकटून राहिला...