काहीही न करता बसून रहाणं सुद्धा खूप मोठं काम आहे!

कधी कधी सकाळी अंथरुणातून उठावंच वाटत नाही. कुठलंच काम करायला नको दिवस फक्त असाच निवांत असावा...असं वाटणं साहजिक नाही का? दररोज उठून आपण आपलं रुटीन धावपळीचं आणि प्रचंड धकाधकीचं जीवन जगतच असतो. त्यातून एखादा दिवस असा काहीही न करता घालवावासा वाटणं स्वाभाविक आहे. रोजच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येणं ही सामान्य बाब आहे. पण, आपल्याला कामाची इतकी सवय झालेली असते की, काहीही न करता कसं बसायचं? हेच कळत नाही. किंवा आपण बसून राहिलो तर अंगात आळस भरेल, शिवाय कामं तर केलीच पाहिजेत ना? त्याला पर्याय नाही असं म्हणत आपण स्वतःला रेटत नेतो. स्वतःवरच कामाची सक्ती करत राहतो. एखादा दिवस असं स्वतःला अजिबात जबरदस्ती न करता मस्त लोळत काढला जाऊ शकत नाही का? खरं तर हा प्रश्न बायकांना विचारायला हवा. कारण, असा एखादा दिवस त्याच्या नशिबी येणं म्हणजे स्वर्गीय सुखच. नाही का! रोजच्या कामातून सुट्टी ही हवीच. आपल्या शरीराला आणि मनालाही. काहीही न करू वाटणं, म्हणजे आपल्या शरीरानं आणि आपल्या मनानं पुकारलेलं बंडच असतं. अशावेळी काहीही न करता राहणं ही अवघड आणि काही करणं ही अवघड अशी द्विधा अवस्था होते आणि ती ठीक आहे. ...