कोरा कागज भाग-1

 


भाग १ - 

सकाळी उठून तिने बंब पेटवला. पाणी गरम होईपर्यंत अंगण आणि घर झाडून काढले. अंघोळ केली. गॅसवर चहा ठेवला. चहा घेऊन देवपूजा केली. रात्रीची भांडी घासण्यासाठी अंगणात नेली.  तीच्ची भांडी होईपर्यंत, तो उठला त्याने स्वतःचे आवरायला सुरुवात केली. तिने त्याच्यासाठी चहा ठेवला. अंघोळ आटोपून तो बाहेर आला. मग सुदीप उठला त्याची आवरायची आणि अंघोळीची गडबड. सगळ्यांचे आवरल्यावर तिने नाश्ता केला. सुदीप तिसरीत होता. पण, शांत होता. काहीही काम करताना गडबड गोंधळ अशी त्याची सवय नव्हती. शिवाय, पप्पाचा प्रचंड धाक! इतका की सुदीपला पप्पाने हाक मारली तरी, तो ततपप करू लागे. कधी-कधी सुधीरला वेळ असेलच तर चुकून त्यांच्यात थोड्याफार गप्पा होत असत. पण, त्याला कामानिमित्त नेहमी बाहेर राहावे लागे त्यामुळे दोघांच्यात फारसा संवाद होत नव्हता. त्यात सुषमाने सतत त्याला पप्पा रागावतील, पप्पा रागावतील अशी भीती घालून त्याच्या मनात सुधीर विषयी एक अनामिक दडपण निर्माण केले होते. तिची तर काय चूक! सुदीप तिचे म्हणणे अजिबात ऐकत नव्हता. तिने काही सांगितलेच, “हां, तुला काय कळतंय? लई शाणी हाइस,” असे बोलून तिचे म्हणणे उडवून लावत असे. पोराला धाकात ठेवायचं तर कुणाची तरी भीती हवीच. तिला भीत नाही म्हणून तिने सतत पप्पा रागावतील मारतील अशी भीती घालून ठेवली. त्यात सुधीरचे नेहमी बाहेर गावचे दौरे. आला तरी  नेहमी फोनवर किंवा मित्रांसोबत, कामानिमित्ताने घराबाहेर फिरणे यातच बिझी. शिवाय, तो कधीच सुदीपला जवळ बसवून त्याच्याशी गप्पा मारत नसे. हाताशी असलेला वेळही तो टीव्ही, वाचन किंवा मग फार फार तर आईशी बोलणे यातच घालवत असे.

सुषमा जेमतेम शिकलेली. चांगलं स्थळ चालून आलं म्हणून आई-वडिलांनीही चटकन पोरीचे हात पिवळे करून टाकले. मुळात कधीही घरा बाहेर न पडलेली सुषमा आईच्या घरातून निघून थेट नवऱ्याच्या घरात पोहोचली होती. हेही घर आणि तेही घरच. तिथे परक्या घरचं धन म्हणून वाढली. इथे परक्या घरची पोर म्हणून वावरते. खरं तर आयुष्यात काही आपलं म्हणून असतं हेच मुळात तिला माहित नाही. सासूने दिलेले आदेश मुकाट्याने ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण, माहेरी तक्रार करण्याची सोय नाही आणि नवऱ्यासमोर मनमोकळं करण्याचं धाडस नाही. हो, हो, बरोबर वाचलत. धाडसच!

नवरा कामानिमित्त आठवडा, दोन आठवडे महिना दोन महिने बाहेर असतो. त्याला कामाची आणि तिथून गावातल्या संसाराची कसरत सांभाळावी लागते. गाड्याचं मन राखणं हेच बाईचं काम. आधीच महिना-महिना बाहेर राहणार त्यात जर घरात आल्यावर पण त्याला शांतता नसंल  तर त्याचं मन रमणार न्हाई संसारात. हा सासूने रोज रोज दिलेला सल्ला तिच्या डोक्यात फिट बसला होता.  

सरला काकूंनी तिला वागणूकच अशी दिली होती की, तिने कधीही नवऱ्या समोर ब्र उच्चारण्याचेही धाडस करू नये. तिला त्याची कडक शिस्त, कठोर स्वभाव याचे कडवट घोट पाजून पाजून त्यांनी तिच्या स्वची जाणीव पुरती मारून टाकली होती. एकप्रकारे घराची अब्रू आणि लेकाचा संसार राखण्यासाठी त्यांनी सुषमाच्या भावनांचा दिवसाढवळ्या खून केला होता. एकटीने नाही. अगदी चार लोकांच्या साक्षीने.

सरला काकू, संध्याकाळी पाय मोकळे करायला म्हणून जात आणि शेजारच्या सरू काकूंकडे गप्पा ठोकत बसत. आजच्या दिवसात सुषमाने काय आणि किती चुका केल्या आणि त्या यांनी कशा पोटात घालून घेतल्या याचे रसभरीत वर्णन सरू काकूजवळ केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. सरू काकू पण त्यांच्या हो ला हो मिसळत.

“आम्ही कसं दिवस काढलं. अंग झाकायला एक कापड मिळालं तरी काळीज सुपाएवढं होऊन जायचं. आणि ह्या आजकालच्या पोरी कपाटं साड्यांनी भरून उलटली तरी ह्याचं संसारात चित्त नसतंय.” अगदी हातवारे करून सरला काकू अत्यंत हेटाळणीपूर्ण स्वरात सुनेबद्दलचे असमाधान व्यक्त करत. जणू ह्या आहेत म्हणूनच लेकाच्या संसाराचा गाडा सुरळीत चाललाय.

सरू काकू सरला काकूच्या सांगण्यात आणखी भर घालायची.

“आजकालच्या पोरी तुम्हाला सांगते, (असे म्हणत त्या आपला हात उंचावत आणि पंजा पसरून पुढचे बोलणे सुरु करत), शिकून सवरून अडाणी राहिल्या. संसार कसा निगुतीनं करावा. कामात बारकावा असावा. कामावर लक्ष पाहिजे. कुठं सांडलं-लवंडलं ह्येच्याकडं ध्यान पाहिजे. काय काय नाही  यातलं. नुसता नवरा पाहिजे आणि त्याच्यासोबत गुलुगुलू कराय पायजे. आमच्या भरल्या घरात एकमेकांची तोंड सुदिक बघायला चार-चार दिवस सवड नसायची आणि कुठल्या गप्पा न कुटलं काय!”

कमी अधिक फरकानं दोघींचा हा अगदी रोजचाच संवाद. सुषमा सासूच्या सांगण्या बरहुकुम वागण्याचा प्रयत्न करत होती. तरीही सासूला पूर्ण खुश करणे काही तिला जमत नव्हते. हे रोजचं आव्हान तिला मात देत होतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामातच व्यस्त असूनही अजून कुठलं काम आपल्याला जमत नाही याचा तिला उलगडा होत नव्हता.

मेलेल्या भावनांच्या कलेवरात कधीकधी चुकून जीव येई तेंव्हा तर ती अगदी सुन्न होऊन जायची. कारण...

कारण... बारा वर्षाच्या संसारात तिने एकदाही संसाराचा आनंद म्हणजे काय याची चवच चाखली नव्हती.

(क्रमश:)


Post a Comment

3 Comments

खूपच वास्तवदर्शी लिखाण आहे