संपण्याआधी सावरणे यालाच तर म्हणतात!

स्मिता आज थोडी उशिरा घरी आली. जाताना आपल्याला वेळ होईल किंवा नाही असं काहीच सांगून गेली नव्हती. आल्यावर पण तिने स्वतःपुरता चहा बनवला, प्यायली आणि आपल्या खोलीत निघून गेली. आपण उशिरा आलोय, घरी कुणाला तरी काळजी वाटली असेल, आपण उशिरा आल्याबद्दल काही तरी बोललं पाहिजे यातील काहीच तिच्या गावी नव्हतं. उलट काहीच न झाल्यासारखं आपल्याच नादात होती. कॉलेजहून उशिरा येण्याची तशी ही तिची पहिलीच वेळ होती म्हणा. तरीही आल्या आल्या असं आपल्याच नादात कशी काय गुंग होऊ शकते ही पोरगी? या विचाराने मालतीताईंच्या मनात मात्र थोडी चलबिचल झालीच.

Source : Google Image


राघव दादा म्हणाले झालं असेल काही तरी थांबली असेल थोडी मैत्रिणीसोबत अर्धा-एक तास उशीर झाला तरी काय बिघडतं? एवढ्याने काय आकाश कोसळलं का लगेच? असं म्हणत त्यांनी मालतीताईंची समजूत घातली. दुसऱ्या दिवशी स्मिता उठली, आपली सगळी कामं आवरली आणि आई जाते गं म्हणत निघून सुद्धा गेली. मालतीताईंना तिच्याशी बोलायचं होतं पण, ती थांबलीच नाही.

आज मात्र स्मिता वेळेवर घरी आली. तसही दिवसभर घरातील कामांच्या घाईत त्यांच्या मनातील काळाचा विचार मागे पडला होता. तिच्याशी आपल्याला काही बोलायचं होतं हेही त्या विसरून गेल्या. आईला आपल्याशी काही बोलायचं असेल हेही स्मिताला जाणवलं नाहीच. कारण मालतीताई काय विचार करताहेत हे आता तिला कसं कळणार?

ती आपली नेहमी सारखी घरात मजा मस्ती करत वावरत होती. त्यानंतर दोन दिवसांनी तिला पुन्हा यायला उशीर झाला. तेव्हाही असंच घडलं. राघवदादांनी मालतीताईची समजूत काढली, होतं कधी कधी लगेच धारेवर धरायची काय गरज?

आपल्या येण्या-जाण्याच्या वेळेमुळे घरात काही तरी ताण पसरतोय हे स्मिताच्या गावीही नव्हतं. अर्धा-एक तासांचा उशीर मुळात तिच्यासाठी उशीर नव्हताच. कारण, तिच्या मैत्रिणी तर त्याही पेक्षा जास्त वेळ घराबाहेर राहायच्या कुणाचा डान्स क्लास, कुणाचा सिंगिंग क्लास, कुणाची स्पोर्ट प्रॅक्टिस. त्यामुळे आपण थोडे कधी तरी अर्धा-एक तास उशीर केलाच तर काय हरकत आहे? त्यातही तिच्या अशा उशिरा येण्याने कुणी तिला घरी काही बोललं नव्हतं. याचा अर्थ घरी काहीच प्रॉब्लेम नाही हे तिनं गृहीत धरलं होतं.

 

एक दोन तीन चार पाचवेळा तिला यायला उशीर झाला तेव्हा मालतीताई थोड्या चिंतेत पडल्या होत्या आणि आता त्यांच्या मनातील चिंतेचं रागात परिवर्तन झालं होतं. आज त्या स्मिताच्या येण्याकडेच डोळे लावून बसल्या. कधी एकदा ही कार्टी घरात येते आणि कधी एकदा तिची खरडपट्टी काढते असं त्यांना झालं होतं. बरोबरच आहे म्हणा त्यांच्या मनात पहिल्याच दिवशी धास्ती निर्माण झाली होती. त्यात स्मिताचं वागणं म्हणजे अगदी आपलं काही चुकत नाही असंच. आईला आपली काळजी वाटत असेल याची पोरीला जराही फिकीर नाही? म्हणजे काय? आज तिला जाब विचारल्याशिवाय रहाणारच नाही. नाही म्हणजे नाही. घड्याळातील काटे उलटत जातील तसतसे त्यांच्या मनातील या विचारांची गर्दीही वाढत होती.

 

अर्धा-एक तास उशिरा येणारी स्मिता आज तर चक्क दोन तास झाली तरी परतली नव्हती. कार्टीनं चांगलाच अंदाज घेतला, मालतीताईचा राग आता राघवदादावर निघत होता. तुम्ही वेळीच बोलला असता तर आज ही वेळ आली नसती, पण नाही. तुम्हाला खूपच लेकीचा कड. आता? आता बघा कशी हातातून चालली पोर. वगैरे वगैरे त्यांचं सुरु झालं. एकीकडे स्मिताची काळजी, पोरगी का अजून आली नाही आणि दुसरीकडे बायकोचा चढलेला पारा. बिचारे चांगलेच कात्रीत अडकले होते. त्यांना तर काहीच बोलता येत नव्हतं. दोघेही हॉल मध्ये धुसमुसत बसले होते. इतक्यात स्मिता आलीच.

 

तीला यायला का उशीर झाला? हे विचारून घेण्यासाठी राघव दादा काही बोलणार इतक्यात मालतीताईंचा संयम सुटला.

“काय गं इतके दिवस झाले बघतेय, तुला हल्ली वरचेवर घरी यायला उशीर होतोय? तुला जराही काही शिस्त राहिली नाही. कॉलेजला चाललीस म्हणजे काय फार मोठी झालीस का? आपल्या काळजीने आपल्या आई-बाबांचं काय होत असेल? याचा तरी काही विचार तुला? आणि करत काय असतेस इतका वेळ बाहेर? त्यांनी असा अचानक तोंडाचा पट्टा सुरु केल्यावर स्मिताही गोंधळली.

 

आज ती कॉलेजमधून घरी यायला निघाली होती. इतक्यात तिची मैत्रिण नेहाला चक्कर आली. तिच्या आई-बाबांना कळवावं की, आधी तिला दवाखान्यात न्यावं या गोंधळात असलेल्या स्मिता पुढे अचानक तिचा मित्र निखील येऊन उभा राहिला. निखीलची गाडी होती त्यामुळे दोघांनी आधी तिला दवाखान्यात नेलं आणि मग तिच्या आई-बाबांना फोन केला. तिचे आई-बाबा येईपर्यंत निखील आणि स्मिताला तिच्याजवळ थांबणं भाग होतं. उलट आज स्मिताला स्वतःचाच अभिमान वाटत होता कारण आपल्या मैत्रिणीला अशा कठीणप्रसंगी सावरून घेण्याचं धैर्य तिनं दाखवलं होतं. तिला कुणाच्या तरी उपयोगी पडण्याची संधी मिळाली होती. पण, या सगळ्यानंतर घरी काही तरी असं पाहायला मिळेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती.

 

तिने तोंड उघडण्यापूर्वीच आईने आपलंच सुरु केलं. ती ताणतणतच आपल्या रूममध्ये निघून गेली. मालतीताई आता शांत बसल्या होत्या, पण त्याच्या मनात काही तरी वेगळंच सुरु होतं. स्मिता आपल्या खोलीत रडत बसली होती, पण तिच्याही मनात काहीतरी वेगळंच सुरु होतं. राघवदादा मात्र आता या दोघींची समजूत कशी घालायची या विचारात होते.

 

ठिणगी पडली होती आता फक्त त्याचा वणवा होणार की, सगळं पुन्हा पूर्ववत होणार की टोकाला जाणार याची चिंता तिघांनाही सतावत होती.

 

शेवटी राघवदादांनी दोन दिवसांनी एक ट्रीप प्लान करायचं ठरवलं, कारण आता या दोघींपैकी ऐकून घेण्याची मानसिकता कुणाच्यातच नसणार हे त्यांनी ओळखलं. तिथून आल्यानंतर दोघींना समोरसमोर बसवून सगळं काही सविस्तर बोलू आणि दोघींच्याही मनातील गैरसमज दूर करू अशा विचाराने ते उठले. त्यांनी स्मिताला चहा ठेवायला सांगितला. मालतीताईना त्याच्या हातची गरमागरम भाजी खाऊन कितीतरी दिवस उलटून गेले याची आठवण करून दिली. त्यानंतर तिघे मिळून भाजी घेण्यास जाऊ असंही बोलले. त्याचं फर्मान आलं म्हटल्यावर काय दोघींनाही उठणं भागच होतं.

 

माय-लेकीनी मिळून फक्कड चहा भाजी बनवल्या. सगळ्यांनी मिळून त्याचा आस्वाद घेतला आणि निघाले भाजी आणायला.

 

राघवदादांनी अतिशय संयमाने प्रसंग हाताळला होता. नाहीतर?

 

नाहीतर, माय-लेकींमधील अढी आणखीनच वाढत गेली असती. संपण्याआधी सावरणे  यालाच तर म्हणतात!

Post a Comment

1 Comments