कोरा कागज भाग-६

 


सरला काकू घराजवळ कधी पोहोचल्या हे त्यांचं त्यांना पण कळलं नाही. विचारांच्या तंद्रीत त्या चालतच राहिल्या. रस्ता कधी मागं गेला याचा त्यांना पत्ताही लागला नाही. घराजवळ येताच त्यांना दुरूनच काहीतरी बिघडल्याची जाणीव झाली. जाताना होतं तसं आत्ता का दिसत नाही? हा एक नवा विचार आता त्या घोळवू लागल्या. या विचाराचा धागा पकडून त्या जसजशा घराजवळ येत गेल्या तसतसं त्यांना कळालं की बहुतेक सुदीपनी काही तरी पराक्रम केला असेल किंवा सुषमाने काही तरी आगाऊपणा केला असेल त्याशिवाय इतकं पाणी रस्त्यावर येणार नाही आणि बारीक काळीराख पण उडाली होती सगळीकडे म्हणजे नक्कीच काही तरी मोठा तमाशा करून ठेवला असेल या बाईनं. एका मागून एक येणाऱ्या या असंबंध विचारांनी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. दारात आल्यावर तर घरात पसरलेली शांतता त्यांना आणखीनच त्रस्त करून गेली. त्या घरात आल्या तर सुषमा आणि सुदीप खाली मान घालून बसले होते. त्यांनी दळपाचा डबा ठेवला आणि इकडे तिकडे बघू लागल्या. सुषमाने भाजीची तयारी तर सगळी करून ठेवली होती. संध्याकाळचे सात वाजायला आहे होते. त्यांना पुढच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. बाहेर ठेवलेल्या बदलीकडे त्याचं लक्ष गेलं आणि बघतात तर काय? जळकी कपडे? थोडा वेळ तर त्यांना सुचेनाच काय? कारण एक तर सकाळपासूनच त्या इतक्या संतापल्या होत्या की आता आणखी संताप वाढवून त्यांना स्वतःचा बिपी वाढवायचा नव्हता. काय झालं? म्हणूनही त्यांनी सुषमा किंवा सुदीपला विचारलं नाही. त्या आत गेल्या हात-पाय धुतले. देवासमोर दिवाबत्ती केली आणि जेवणाला लागल्या. अर्धा पाउण तासात तर त्यांनी सगळा स्वयंपाक आवरला.

किचन कट्ट्यावरील सगळा पसारा आवरला आणि त्या हवा खायला बाहेर येऊन बसल्या.

सरू काकू त्यांच्या गॅलरीत उभ्या होत्या. त्यांनी आवाज दिला, “काय आवरला का नाही स्वयंपाक?”

सरला काकूं फानाकाऱ्यानं म्हणाल्या, “आवरला की. न आवरून सांगतोय कुणाला. एकाला चार माणसं खाणारी. करायला नको?”

“होय, करायला पाहिजे की. आयुष्य गेलं ह्यातच. आता लेकाच्या संसारात तरी सुख मिळंल म्हंटलं तर काय बोलायचं काम न्हाय. आधी आपला संसार उभा करायला खस्ता खाल्ल्या आता हेंच संसार उभं करायला बी आपणच खस्ता खायच्या. हाय काय आणि नाय काय. सगळं सारखंच.” सरू काकू वरूनच खाली भडकलेल्या आगीला हवा देत होत्या.

“काय मग काय केलं आज नातवानं पराक्रम सांगितला का नाही?” आता मूळ मुद्द्याकडं त्यांचा मोर्चा वळला.

“काय दिसलंय की, त्या बादलीत कपडे पडल्यात जळलेली. इथं राख उडालीय सगळी कडं. काय विचाराय नाही बघा मी त्यास्नी. सकाळी सकाळी दोघं माय-लेकरं तोंडाला लागल्यात माझ्या. सकाळपास्न उठवलंय बघा डोकं. आत्ता आणि कुठं यांच्या तोंडाला लागू? त्यापेक्षा तो यील तवा बगल. कुठं कुठं पुरणार आमी तर ह्यास्नी. तेंच हाय तेंच ते बघतील. गप्प बसायचं. त्रास करून घेतला की आपल्यालाच त्रास.” असं म्हणत त्यांनी पाय पसरले आणि हात झटकला. पसरलेले पायाचे तळवे त्यांनी एकमेकांत अडकवून ठेवले आणि एक हात जमिनीवर टेकवून त्या. दुसरा हात चेहऱ्यावरून फिरवू लागल्या.

“शुभा आलती दळायला. जावंची आमच्या बिपी जास्ती झालती म्हणं सकाळी. दवाखान्यातनं आणलं लेकानं सकाळी सकाळी.” बसल्या बसल्या त्यांनी सरू काकूला माहिती दिली.

सरू काकू म्हणाल्या, “बरं झालं गॅस बंद करून आलो थांबा खाली.” मग त्या गॅलरीतून उठून आत गेल्या. किचनमध्ये जाऊन त्यांनी गॅस बंद केला. खालून रेग्युलेटर बंद केला. किचनमधली आवारावर केली. गॅलरीचा दरवाजा बंद केला. हॉल मधून बाहेर आल्या आणि मेन दरवाजा बंद करून त्या एकेक पायरी उतरू लागल्या.

एवढा वेळ सरला काकू शांत बसल्या होत्या. आठ तर वाजलेच होते. आकाशातील चंद्र चांदण्या तर काय रोजच बघतात त्या. त्यात काहीच नवीन दिसलं नाही त्यांना. पण, त्या आभाळाकडं टक लावून बसल्या होत्या. कुठल्या तंद्रीत हरवल्या होत्या. ते त्यांचं त्यांनाही सांगता आलं नसतं.

सरू काकू जिना उतरून खाली आल्या आणि शेवटच्या पायरीवर बसत त्या सरला काकूला म्हणाल्या, “या इथं जरा निवांत बसुया.”

सरला काकू उठून तिकडे जायला निघाल्या. सगळीकडे अंधार पसरला होता. गल्लीत एखादा दिव्याचा खांब पण नाही. गल्लीत त्या दोघींचीच घरं शेवटच्या टोकाला. फक्त यांच्या अंगणात बसवलेल्या बल्बचाच तेवढा काय तो उजेड. पण, पायाखालची वाट रोजचीच असली की अंधारातही अंदाजानं चालतो माणूस. तसच त्याही चालल्या होत्या. चारच पावलांच अंतर होतं.

दोघी एकमेकांशेजारी बसल्या. सरला काकू म्हणाल्या, “काय झालंया काय माहिती दोघ माय लेकरं गप्पगप्प हाइत बगा. ते कार्ट पण, बोलाल्यालं नाही. आणि ती काय कवा बोलतच न्हाई खरं. मीच सांगायचं तिला, हे कर ते कर. तवा उठून करती. सकाळी बगा, तेला मी हाक मारत हुतो आणि तेनं टीव्हीच्या नादात ऐकून घेतला नाही. म्हणून जरा ओरडलो तर ही अंगावर आली नुसती. शब्दाला शब्द वाढला की परत डोक्याला ताप. म्हणून मीच गप्प बसलो शेवटी. आत्ता दळप घेऊन आलो तर सगळ्या रस्त्यावर पाणी-पाणी झालय. त्या बादलीत कपडे पडल्यात जळलेली. काय केलं काय दोघांनी?”

ती काय आतच होती तुम्ही गेल्यावर. मी बसलेले कि इथच गॅलरीत बघत. तो पोरगा आतनं कुठनं फटाकड्या घेऊन आला. आणि बसाल इथं खेळत. हीच काय तेच्याकडं लक्ष नाहीच. मी पण काय बोलले न्हाई. कशाला सारखं लक्ष द्यायचं. पोरांना सारखं पण बोललं की चालत नसतंय. म्हणून मी पण गप्प बसलो. तेनं खेळता खेळता ती सुरसुरी पेटवली आणि त्या कपड्यांखाली धरली. तो स्कार्फ तुमचा डोक्याला बांधायचा घातलेला नाही याकडेला ते पेटलं आणि ते पसरतच गेलं. उन्हाचं काय कपडे लगेच सुकात्यात एवढं चार आणि पाच वाजेपर्यंत त्यांना कशाला बाहेर ठेवायचं. ते नायालन म्हणाल्यावर गेलं की फार्फार पेटत. मग सगळ्यालाच आगीनं धरलं. सगळा धूर कोंडल्यावर मग भाईर आली तुमची सून. आणि मग त्या बॅरेलातलं पाणी मारून आग विझवली. मी खाली यायचं म्हणस्तोवर तीनं सगळं विझवून, तो बाहेरचा कोबा धुवून कपडे तिथं बादलीत टाकली आणि आत जाऊन बसली दोघं ते अजून काय भाईर न्हाईत. त्यांनी सरका काकुच्या अंगणातल्या कोब्याकडं बोट करून दाखवत त्यांनी दुपारचा सगळा सीन त्यांच्या समोर शब्दातून उभा केला.

झालं सरला काकुचं उरलं सुरलं अवसान पण, गळालं.

क्रमश:

©® मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

0 Comments