कोरा कागज भाग -४

 



दारातल्या बॅरेल मधल्या मगानं ती त्या आगीवर पाणी फेकू लागली. शेजारच्या सरू काकू त्यांच्या गॅलरीतून हे पाहत होत्याच. नाही तरी सुषमावर लक्ष ठेवणं हे एक त्यांचं अलिखित कर्तव्य होतं. पाणी मारता मारता तिचं तोंड पण सुरु होतंच. एकतर आधीच सकाळपास्नं घरात दंगा सुरु हाय. त्यात आता तू हे करून ठेवलास. आता काय करायचं. बघ, हे तेंच नव शर्ट जळलं.

सुषमाने कशीबशी ती आग विझवली आणि आधी सुदीपला जवळ ओढून घेतलं. तिचं पूर्ण अंग कापत होतं. सुदीप पण घाबरलेला त्याला वाटलं होतं आता मम्मी मारेल. पण, तिने जवळ ओढल्यामुळे तो थोडासा तिच्या बाबत आश्वस्त झाला होता. पण, पुढच्याच क्षणी त्याला पप्पांचा चेहरा आठवला. आता हे पप्पांना कळालं तरी आपल्या दोघांचीही खैर नाही हे त्याला कळून चुकलं होतं. सुदीप शांत झालाय हे लक्षात आल्यावर सुषमाने सगळा कठडा धुवून काढला. कपडे सगळे काढले आणि एका बादलीत टाकले. सगळेच थोडेफार तरी जळालेच होते.

आधीच सासूचा सकाळचा बिघडलेला अवतार आणि त्यात आता सुदीपचा हा पराक्रम. तिला फक्त एवढंच कळत होतं की आजचा दिवस काही बरा नाही. पण, तरीही तिने फार धसका वगैरे घेतला नाही. कारण, खराब दिवस कधी अचानक उगवेल हे काही सांगता येत नव्हतं. तसंही सकाळीच सासूला मूड बिघडायला निमित्त मिळालंच होतं त्यात आणखी एक भर.

भाजीची तयारी करून ठेवली. पण, ती भाजी करू शकत नव्हती. मग तिने पीठ मळायला घेतलं. मागच्या आपल्याच पराक्रमाने धास्तावलेला सुदीप आता मुकाट्याने पुस्तक घेऊन बसला होता. किचन मधील सगळी तयारी तिने केली आणि ती सुदीपच्या शेजारी येऊन बसली. जणू दोघेही गंभीर गुन्हेगार असून आता आपल्या बद्दल सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेची दोघांनाही आतुरता लागून राहिली होती.

एक तर सासू तरी पटकन यावी किंवा नवरा तरी असं तिला वाटत होतं. घड्याळाच्या काटा आपल्या वेगाने फिरत होता त्याचं फिरणं सुरु होतं पण, बाहेर गेलेल्या दोघांचाही अजूनही काही पत्ता नव्हता.

इकडे सरला काकू दळप घेऊन गिरणीत गेल्या. त्यांच्या आधीच चार-पाच जणींनी आपले डबे ठेवले होते. त्यांचं दळण होईपर्यंत सरला काकूंना बसणं भाग होतं. इतक्यात शुभा आली दळण घेऊन. शुभा म्हणजे सरला काकुंच्या जाऊबाईंची सून. शुभा घरातील आणि घराबाहेरची म्हणजे भाजी आणणे, दळण आणणे, बाजार आणणे अशी कामे अगदी आनंदाने करायची. शुभा कसं घरातील सगळं चोख आवरते याबद्दल सरला काकूंनी सुषमाला हजारदा उदाहरण देऊन झालं होतं.

दोघींच्या गप्पा सुरु झाल्या. शुभा म्हणाली, “तुमच्या लेकानं आणि नातवानं चकल्याच पाहिजे म्हणून हट्ट धरलाय. म्हणून भाजणीचं दळण घेऊन आले. तुमचं काय?”

“आमचं काय? गहू. आमच्या लेकाला असल्या काय फर्माईशी करण्याचं ध्यान नाही. करल ते गप्प खातोय तो. आता दिवाळी आलीच की पंधरा दिवसांनी तवा करायच्याच की चकल्या. आत्ता आणि कशाला घाट घालायचा. तुम्हाला काय ताकद हाय अंगात म्हणून जमतंय. आम्हाला जमतंय तसं?” बोलताना त्या चुंबळीचा टॉवेल उगाचच या हातातून त्या हातात धरून दाबत होत्या. जणू त्यांना खरं काय ते सांगायचं नव्हतं. खरं तर, “आमच्या सुनेला कुठे असलं काय करायला सुधारतंय,” असंच त्यांना म्हणायचं असणार पण, त्यांनी ते आतच दाबलं.

शुभा मग स्वतःच काहीबाही सांगू लागली. “आज सासूबाईंना जरा बिपी जास्त झालती मग ह्यांनी लगेच नेऊन आणलं दवाखान्यातनं. औषधं जरा चुकली की त्रास होतोय. लक्षात नाही राहत त्यांच्या. एवढं पण लक्षात ठेवायला नको आपल्याला त्रास होतोय तर, आपण गोळी खाल्ली पाहिजे ते.”

“होय ठेवायला पाहिजे की. आता आमच्या घरात कोण हाय? काय जास्त कमी झालं तर माझी गोळी माझं मी आठवणींन घेतोय. काय झालं तर कुठं लेकाला त्रास द्यायचा.”

“बगा की. ह्यास्नी त्या सीरियलीतनं फुरसत मिळाली तर घेतील ती गोळी आठवणीनं.” शुभा म्हणाली.

दळप गिरणीत ओतता ओतता शेवंता काकू म्हणाल्या, “व्हय बाई आम्हा म्हाताऱ्यांची एक सूद जाती. मग तुम्हाला तरण्यास्नी काय हुतंय आठवान करून द्यायला? म्हणायचं जरा आत्या घेतलासा काय गोळी. बरं वाटतंय माणसाला.” शेवंता काकू दिवसभर गिरणीत उभ्या असायच्या. लेकाचं लग्न करून सहाच महिने झालेलं. नव्या सुनेचे नवे नखरे त्यांना पण झेपत नव्हते. पण, काय करणार आलिया भोगासी का काय म्हणतात ते, तसं मानून गप्प राहायचं असं त्यांचं तत्व.

“अहो, आठवण करून दिली तरी खायला पाहिजे कुणी? आजारी माणसानच नव्हं? का आम्ही खावं त्यांच्या बदली?”

शेवंता काकू गिरणीतील दळपाचा घास हलवत होत्या, त्यामुळे शुभा काय म्हणाली ते त्यांना ऐकू गेलं नसावं. त्या आपल्या कामातच गुंग. म्हणजे शरीर कामात गुंग आणि मेंदू विचारात. खरं तर त्याला कुणी विचार म्हणनंच चुकीचं आहे. मेंदू विचार किती करतो आणि त्यात कल्पना किती गोवतो यावर काही अजून संशोधन झालेलं नाही.

सरला काकू मात्र शुभाला म्हणाल्या, “आपल्याला झेपतंय तेवढं केलं पाहिजे. मस्त आमच्या जावंनं पण खस्ता खावून मोठा केल्या लेकाला. तेच काय तोंड शिवाल्यालं असतंय. विचारायचं आईला, आई घेतलीस काय गोळी? शेवटी, तेलाच कराय लागती नव्हं धावपळ?” कधी जावंची स्वतःहून विचारपूसही न करणाऱ्या सरला काकू जावंच्या सुनेला मात्र तिची कशी काळजी घ्यायला पाहिजे हे शिकवत होत्या.

शुभा गप्प बसली. कुठून विषय काढला असं झालं तिला.


क्रमश:

©® मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

6 Comments

JadhavSardar said…
वाचताना चित्र उभ राहतं डोळ्यासमोर👍Keep it up madam💐
Meghashree said…
Thanks ☺️ Sardar
शब्द लिहिलेत असे की समोर चित्रच उमटले.
Meghashree said…
गजशारदा धन्यवाद 🙏
मनस्वी लेखन... खूपच छान
गजब लिहीत आहात... keep it up.