मग करावं तरी काय आता?



छे एकटं वाटतंय...! कुणाला फोन करावा का छान गप्पा होतील? किंवा कुणाला तरी मेसेज?

अगं सणावाराचं लोकं बिझी असतात त्यांच्या त्यांच्या कामात. सणाची तयारी करायची. पुन्हा ते एन्जॉय करायचं मग छान छान फोटो घ्यायचे त्यावर छान छान पोस्ट लिहायची. गप्प तू कुणालाही डिस्टर्ब नको करू. पलीकडून त्रासिक आवाज आला की पुन्हा तू नाराज होशील.

मेसेज करू का कुणाला?

अगं सकाळीच बघतीलं ना कसं झालं. तू त्याला सहज विचारलंस, काय झालं रे? मग तो म्हणाला तू गप्प बसत जा. हे बघ लोकं गप्प बसवतात तर मेसेज करून काही उपयोग आहे का त्यांना? त्यांना वेळ मिळाला की करतील ते फोन किंवा मेसेज. तू स्वतःहून काही करायला नको जाऊ कुणाला. आणि काय तो सारखा सारखा फोन आणि मेसेज दुसरी काही कामंच नाहीत का?

हम्म. काय करू शकते मी दुसरं.... दुसरं... दुसरं....?

पोटात कालवल्या सारखं पण होतंय... थोडं खाल्लं तर बरं वाटेल नाही?

अगं किती खाशील? वजन किती वाढलंय? आणि काय करणार काय तू आता? अशा भलत्या वेळी? पुन्हा कुणी संपवलं नाही तर. शिल्लक राहील. पुन्हा टाकून द्यायचं होत नाही म्हणून तुलाच ते शिळं खावं लागेल. पुन्हा अॅसिडिटी वाढेल. त्यापेक्षा सहन कर थोडं. आता दोन तासांनी होईलच जेवणाची वेळ.... मग करायचंच आहे की स्वयंपाक... तो काय सुटलाय का, कुठे गेलं तरी...? आणि काय करणार काय आज स्वयंपाकाला? नाही ते भलतं सलतं काहीही करत बसते. जरा पौष्टिक न्युट्रीटिव्ह करत जा गं बाई. निदान खाताना तरी विचार कर...

हां... पण, काय करायचं आणि त्यातून किती पोषकद्रव्ये मिळवायची... म्हणजे मिळतात... ते समजत नाही गं. लक्षातच येत नाही. मग जमेल ते... हाताशी असेल ते.. करून मोकळं व्हायचं एवढंच असतं डोक्यात!

बरं मग करू काय आत्ता? थांब किचन मधून फिरून आल्यावर सुचेल काही तरी...हम्म.... भांडी घासायची पडलेत...

नेहमीच पडतात... रोजच करतेस... किती घासावी ती भांडी... आणि खाणं एवडूएवडूसं... तरी तुझी भांडी एवढी कशी निघतात गं?... राहूदे करशीलच नंतर .....

मग मिरची चिरायला घेऊ का?

एकच मिरची चिरून काय होणार. वायाच जाईल...

मग चॉकलेट खाऊ का?

अगं जिभेवर थर साचतो... गोडगोड चव रेंगाळत राहते...

ह्म्म्म. मग काय? मी करू तरी काय? पुस्तकं वाचू का? पण, कोणती पुस्तकं वाचल्यावर छान वाटेल. मोटिव्हेशनल, रोमँटिक, गूढ, भयकथा... काय वाचू काय नेमकं?

नको नको वाचत बसलीस की वाचतच बसशील परत तुला उठवणार नाही ती पुस्तकं सोडून. हलकं फुलकं कर गं काही तरी... काय तू पण!

आता काय मग फिरायला जायचं म्हंटलं तरी... पुन्हा तयार व्हा. फिरून या. धुळीनं भरलेले रस्ते तुडवा. अनोळखी लोकांच्या नजरा झेला... ओळखीच्याच झाडांची पानं बघा... किंवा पानगळ बघा.... मग पुन्हा घरी या... मग पुन्हा चेंज करा. आणि इतकं करूनही पुन्हा ‘करायचं काय’ हा प्रश्न असणारच...

डान्स करू का?

एनर्जी लागते त्याला. कधीही उठलं आणि नाचलं... असं होत नसतंय.... काहीही सुचतं.. खाली दिमाग शैतान का घर...

त्याला पसारा आवरायला मदत करते. थांब....

”अगं आगं मम्मे, मम्मे नको आवरू गं तू माझा पसारा... तुला काही कळणार नाही आवरायला. काही तरी करून ठेवशील इकडचं तिकडं तिकडचं इकडं... नको गं मम्मे नको मदत करू तू...!

नकोय त्याला माझी मदत. मग काय करू तरी काय? बसून बसून नसत्या कल्पना...

कधीकधी दिवसा ढवळ्या सुद्धा... मला ना मीच कधीकधी पंख्याला लाटकलेली दिसते...

हा हा हा हा हा

हसण्यासारखं काय त्यात..?

पंखा आहे का तुझ्या घरी? म्हणे पंख्याला लटकलेली दिसते. हा हा हाहीही हाहा!

हम्म. बरच आहे ना, नाही ते. असता तर कदाचित तेच झालं असतं. खरं तर पंखा घेण्याची दुर्बुद्धी सुचली नाही याबद्दल आभार मानायला हवेत.         आयुष्यात मी कधी टेरेसवरून उडी मारलेली नाही. करावा का प्रयत्न एकदा?

मूर्ख आहेस का तू? मेलीस तर सुटशील आणि नाही मेलीस तर?

हो की अगं... पण, का गं..... कोणताही प्रयत्न करताना आपल्याला आधी त्याची अपयशी बाजूच दिसते. म्हणजे मारण्याचा विचार करतानाही मेलो तर ठीक आणि नाहीच मेलो तर.... हा विचार करून कितीदा ढकलतो आपण आपल्याच हातचं मरण.... पण असा नकारात्मक विचार ही चांगलाच नाही का कधी कधी...!!!

मग करावं तरी काय आता?

Post a Comment

1 Comments

Sheetal said…
Very positive post.. कुठल्या गोष्टी ऐकाव्यात हे ठरवायला हवे