वळण




त्या तिथे भांड्यांचा ढीग पडलाय, जो स्वत:हून हलणार नाही. तिथे कपड्यांचा, तिथे बारीक धूळ, कुठे केस, कुठे कपटा.... कहीच नाही हलू शकत जागचं, स्वत:हून. .... आणि इथे मी! हलायचंच नाहीये काही करून, असं ठरवलं नाही. पण, तसंच झालंय खरं! 

"माणूस" होतो का आपण कधीकाळी? हे सांगता नाही येणार... पण, काहीतरी होतो आपण कधीकाळी जे आता नाहीहोत आणि जे आता आहोत ते नव्हतोच कधीकाळी!
सांग ना, आतल्या जीवनरसाला वाळवी कधी लागत गेली, हे कळलं कसं नाही तुला? आयुष्यातली सांज हळूहळू गडद अंधाराकडे झुकत चालले.... आणि याचा तुला पुसटसाही अंदाज आला नाही? आता या क्षणीतरी तुला वाटतंय का, आपण ठरवलं तर...  तर पुन्हा पहाट होण्याची शक्यता वाढू शकते? सुकलेल्या मुळांना पुन्हा पालवी फुटू शकते? ही वाळवी पुन्हा नष्ट होऊ शकते, जी पोखरत चालले तुझ्या जाणीवा

समुद्र. नेहमी असतो तसाच उधाणलेला. तेव्हाही तो तसाच होता. आज तर तोही थोडा कलुषित झालाय! राहिला नाही तसाच नितळ. स्वच्छ. हं. 
समुद्राच्या काठावर वाळुचा किल्ला बांधण्याचा माझा चाललेला निष्फळ प्रयत्न पाहून तू उगाचच थोडासा नाराज व्हायचास. उगीच आणि थोडाच. पण मी नाराज होऊ नये म्हणून तू कधीच ती नाराजी उघड उघड दाखवली नाहीस. 
"अरे, काय हिला एवढं पण नाही जमत", विनय चिडवत होता मला.
"जमेल की, करतेय ना ती प्रयत्न," तू त्याच्यावर चिडलास. त्याचं मला तसं हिणवणं तुला आवडायचं नाही. तो तुझा भाऊ होता तरी. मला मात्र तूझं ते तसं निरागस तरीही ठामपणे सोबत राहणं, आधार देऊन जायचं. आज तुझी कित्ती आठवण येतेय माहितेय? कारण नाहीचै आज कुणी तसा आधार देणारं, जसा तू द्यायचास! 
नंतर मी समुद्रात उतरले. तू सांगत होतास खोल पाण्यात जाऊ नको…. तुझं ऐकायचं नव्हतंच मला कधीच. मी आत जात राहिले, मोठी लाट आली आणि माझ्या नाकातोंडात पाणी गेलं. मी केवढी आणि लाट केवढी! तू म्हणत होतास,  "तुला पोहता नाही येत, तर नको जाऊ ना आत." पण मला ऐकायचं नव्हतंच. मग लागले गंटागळ्या खायला…. मग तू ओरडलास, "नख रुतवून ठेव घट्ट वाळूत," यावेळी मात्र मी ऐकलं. कारण जीवाचा प्रश्न होता ना! मी नख घट्ट रुतवली आणि पुन्हा लाटेसोबत की काय, पण किनार्यावर आले… किंवा जास्त खोल नव्हतेच गेले मी. फक्त लाटेच्या उंचीला घाबरूनच गंटागळ्या खात होते कदाचित. पण तू किती घाबरलेलास? मला जाणवलं होतं की तुही तितकाच घाबरलेलास जितकी मी. वाटलेलं घट्ट बिलगावं तुला आणि दूर सारावी दोघांच्यातही दाटलेली भिती. मारलीही असती मी मिठी! काहीच हरकत नव्हती ना भेदरलेल्या क्षणी एकमेकांचा आधार व्हायला
 पण, हरकत होती, तुझ्या आईची! तिच्या जळजळीत नजरेची! तिथे माझी आई असती तरी तेच दृश्य असतं! खरंतर तेंव्हा तुझ्या आईच्या नजरेत असाच धाक होता! "मेली कार्टी, अजिबात चांगल्या गुणाची नाही. कसले काय ते संस्कारच नाहीत यांच्यावर."
संस्कार.... हाहाहा... फार मोठी गोष्ट होती ती. जी कुठेच कधीच हाताला लागली नाही.
आत्ता तू म्हणशील, इतक्या वर्षापूर्वीचे बोललेले शब्द आठवत नाहीत माणसाला आणि तुला चक्क तिची नजर आठवली?
हो, हो, आठवली! कारण त्या नजरेत सतत मला नकारच दिसला. स्वीकार कधीच दिसला नाही. खैर खूप म्हणजे खूप मागे पडल्यात या गोष्टी हे खरं असलं आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय हे जरी खरं असलं तरी, वाहून गेलेल्या पाण्याचे ओघळ राहिलेत आणि जाता जाता पाण्यानं आपल्या सोबत खूप काही नेलंय हेही तितकंच खरं आहे....  
वर्षं सरत गेली आणि आपल्यातील अंतर वाढत गेलं...इतकं की चक्क आपण एकमेकांसाठी अनोळखी झालो. म्हणजे रस्त्यावर तू दिसलास तरी, तुझ्याकडे न बघता चालायची सवय झाली. तुलाही सवय झालीच माझ्याकडे न पाहण्याची. याचा कधी पस्तावाही नाही वाटला... आजही वाटत नाही. पण आयुष्याने काही निर्मळ, निरागस क्षणांचे मोती ओंजळीत टाकलेले असतात ना, त्यातीलच हे काही क्षण जे मी तुझ्यासोबत घालवले.
*****************************************************************************************
कॉलेज पाच वाजताच सुटलं. आपण त्याही आधी चार वाजताच लेक्चर बंक मारून बाहेर पडलो. इथे 
कुणीही नसताना पोचलेलो आपण. बसला गर्दीही नव्हती, तरी संध्याकाळचे सात वाजत आले आणि 
आपण इथेच. आपल्या नंतर आलेले कितीतरी प्रवासी निघून गेले. कुणी जाताजाता वळून वळून बघत होते, हिला कुठेच जायची घाई कशी नाही? बस आली की माणसं कशी लगबगीनं पाळतात ना! पण, मला पाळायचं नव्हतं फक्त बसायचं होतं वाट पाहात. तो आला नव्हता येणार होता की नाही तेही माहित नव्हतं. त्यानं सांगितलंही नव्हतं माझी वाट बघ म्हणून आणि तरीही मी उगाच नजरेत जीव आणून ताटकळत होते, त्याच्यासाठी! तो येईल, नाही येईल, येईल, नाही येईल.... क्षणा क्षणाला होय-नाही, होय-नाही, असा लंपडाव चालू होता... स्वत:शीच. साडे सात वाजले. मग मात्र राहवेना संध्याकाळ गडद होत चालली. मग आलेल्या बसमध्ये जाऊन बसले. बस सुटे पर्यंतही वाटत होतं तो येईल....

बस सुटली. तो आला नाही. मग, स्वतःला छळण्याचे बालिश हट्ट सुरु झाले. का नसेल आला? काय झालं 
असेल? किती किती गर्दी ती विचारांची, त्यापाठोपाठ भावनांची. मनाची, मेंदूची अखंड कसरत सुरु होती 
आणि त्यामागून शरीर आपलं गुलाम होऊन धावत होतं. माझा स्टॉप आला मी उतरले. रोजचाच रस्ता. 
थोडीच, घर चुकणार होतं. आपोआप त्या घरात माझं शरीर शिरलं. मनाला कुठेतरी मागे मागे रेंगाळायची 
सवय झालेली. यंत्रवत सगळं पार पडत असतं. आजूबाजूला कुणाच्या संशयी नजरा शोधत राहतात खुणा 
आपल्या शरीरातून आपण बेपत्ता झालोत की आहोत याच्या! अशी नजर आपल्या नजरेला पडताच आपण पुन्हा सावध होतो आणि पुन्हा आणून बसवतो आपल्या मनाला आपल्या आत!
त्याचा सुटण्याचा प्रयत्न आणि माझा त्याला कैद करण्याचा अट्टाहास! ही कसरत रोज दमछाक करत असे 
माझी. जसं माझं मन... तसाच तो. त्यालाही माझ्या कैदेत यायचं नव्हतं. मी मात्र दोघांचा पाठलाग करत रहायची न चुकता... आणि थकून जायची....
शेवटी तो बोलला.... "नको करूस माझा असा पाठलाग...."
"का रे, आवडत नाही का मी तुला?" मी विचारलं.
"तसं नाही पण, तुला तर माझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटेल ना, मग कशाला माझ्यावर वेळ खर्च करतेस.... तसंही मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही." तो उत्तरला.
आणि मग तो पाठलाग, तो लंपडाव थांबला.... कायमचा थांबला... नाही. पण काही काळ त्याला 
स्वल्पविराम नक्की मिळाला.
 *******************************************************************************************
दोन्ही काठावर ऐसपैस अंग पसरून उभारलेली टुमदार घरं. काही जुनी काही नवी... आणि त्यांच्या मधून 
जागा मिळेल तसा वाट काढत जाणारा रस्ता... प्रत्येक घराबाहेर एक तरी बल्ब असतोच. आता पांढरे 
असतात, तेंव्हा पिवळे असायचे... आणि त्यांचा मंद, दुधी-पिवळा उजेड...त्यात रस्त्यावरचे दिवे. आकाशाकडे मान वर करून बघितल्यावरच कळायचं, अंधार किती काळाकुट्ट आहे.  या अंधाराची 
भीती वाटायची नाही, असेही काही दिवस होते आयुष्यात. नंतर नंतर आयुष्याचं वय वाढत गेलं तशी तशी 
अंधाराची भीती वाढत गेली. आता तर सावलीचा अंधारही उगीच बिचाकावतो. पण, अंधाराची भीती वाटत 
नव्हती न ते आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस होते. मस्त भटकता यायचं कारण आत पर्यंत कुणाच्या 
काळ्या नजरेची सावली पोचली नव्हती.

पण, एकेक दिवस सरतील तसे... काही डोळ्यांच्या बाहुल्या उगाच अक्राळविक्राळ हसतात असं वाटायचं. मग, असे अक्राळविक्राळ हसणारे प्रत्येक डोळे मला भीती दायक वाटू लागले. मी अशा डोळ्यांपासून स्वतःची नजर वाचवू लागले. खाली मान घालून राहण्याची अशी सवय झाली की, वाकून वाकून... मानेचा मणका ठणकू लागला. तरीही वर नजर करून चालायचं असतं हे काही केल्या वळत नव्हतं....
*************************************************************************************************
"मला माहितेय की तू कशी आहेस ते. चांगल ओळखते मी तुला..." हे वाक्य आठवलं ना खूप हसायला 
येतं. पण, तेंव्हा वाटायचं, लोकांजवळ जादू असते...की काय आपण कसे आहोत हे ओळखण्याची.... मग 
आपल्या जवळ का नाही ही जादू कोण कसं आहे ते ओळखण्याची...? हाहाहा... किती अल्लड, बालिश 
आणि मुर्खासारखा प्रश्न विचारत राहतो आपण स्वतःच स्वतःला...
खरं तर कुणीच कुणाला पुरतं ओळखत नसतं. फक्त सगळे वाऱ्याच्या कान गोष्टी खऱ्या मानून त्यानुसार 
माणसाबद्दल मतं बनवत असतात इतकंच.
मग कधी कधी वारा माझ्याही कानात काहीबाही सांगू लागला. मला अशा वाऱ्याशी बोलायची अजिबात 
इच्छा नसायची ज्याला फक्त इतरांच्या आयुष्यात वादळ बनून जायचं असतं.
मी ज्याला ओळखत होते तो वारा तर वेगळाच होता. हो संध्याकाळ झाली की तो ही अलगद उतरायचा 
आजूबाजूला... त्यात एक हवीहवीशी जादू होती. जी अपोआप मला माझ्यातून काढून एक परी बनवायची. 
मी हातात सोन्याची कांडी घेऊन छु मंतर करत राहायची... खूप वेळ गट्टी जमायची आमची. वारा मला 
रंगीत फुलांच्या गोष्टी सांगायचा. त्या प्रत्येक फुलात एक रंगीत जग असायचं. त्या फुलांसारखच सुंदर आणि खरं... हो खूपच खरं असायचं ते माझ्यासाठी तरी....!
वारा मला खूप काही सांगायचा आणि माझंही ऐकायचा... ऐकत राहायचा... त्याला अजिबात कंटाळा नव्हता.. ना बोलण्याचा ना ऐकण्याचा... मला वाटायचं... हा असा वारा सगळ्यांना भेटत राहो. जसा मला भेटतो तसाच... खरा खरा... जसा माझ्या आजूबाजूला पसरवत राहतो स्वतःचं प्रसन्न अस्तित्व आणि भरभरून देत राहतो...प्रसन्न हलकेपणा मलाही...
पण, वारा म्हणाला एक दिवस, मला तुझ्याशी बोलण्यात गंमत वाटते कारण तूला माझ्या गोष्टी खऱ्या 
वाटतात ज्या दिवशी तुला माझ्या गोष्टी खोट्या वाटायला लागतील... त्या दिवसा पासून मी पुन्हा कधीच, 
तुझ्याशी बोलणार नाही.
एक दिवस वारा असाच गमती सांगत होता. म्हणाला, "खऱ्या माणसाला खरं प्रेम मिळत आणि 
आयुष्यातील ती सगळी सुखं मिळतात, जी त्याला हवी असतात..." मी म्हंटल, "असं कधीच होत नाही... 
सगळी सुखं माणसाला कधीच मिळत नाहीत."

"तुला हल्ली पटत नाहीत ना माझ्या गोष्टी? तू आत्ता रमत नाहीस रंगीत दुनियेत... आता मी कधीच नाही 
बोलणार तुझ्याशी..."

आणि वारा मुका झाला. त्यानंतर आजपर्यंत कधीच, तो काहीच बोलला नाही.
********************************************************************************************

रात्र झाली. गरम हवा सुटली. चटई घेऊन आम्ही चौकात यायचो. चौक म्हणजे रस्त्याचा चौक नव्हे बरं...
 घराचा चौक! चौकोनी आकारातून भलं मोठं आकाश दिसायचं... त्यात भरपूर लुकलुकणाऱ्या चांदण्या 
असायच्या... एक चांदोमा असायचा.... चांदण्या मोजता मोजता कधी झोप लागायची कळतही नसायचं....
मग हळूच त्यातली एक चांदणी उतरून यायची. तिचा चमचमता फ्रॉक खूप आवडायचा मला... चांदणीला खूप गाणी यायची... "चांदणी तू दिवसा कुठे गायब असतेस गं? तू झोप यायच्या वेळी येतेस ना मग मला 
खूप खूप खेळता येत नाही तुझ्यासोबत... मला खेळायचं असतं तेंव्हा का नाही येत तू?" ती फक्त हसायची.... कदाचित तिलाही माहित नसावं की ती दिवसा का नाही येऊ शकत. पण, जेंव्हा केंव्हा यायची 
तेंव्हा मस्त चमचमत यायची.....


तिच्या चमचमत्या दुनियेत ना सगळीकडे फक्त शुभ्र कापूस असतो म्हणे... मऊमऊ कापूस... जिथे 
कशाही उड्या मारल्या तरी अजिबात लागत नाही, ठणकत राहणाऱ्या जखमा होत नाहीत, ... कापसाची 
घरं, कापसाचे रस्ते, तरीही ते कधी उडून नाही जात बरं... कित्ती छान ना!

पण, तिला इथे खाली यायची देखील खूप हौस असायची. वरच्या सगळ्या चांदण्या कशा मस्त आपसात 
गप्पा मारत खेळत असतात. पण, त्यांना जमिनीवर उतरावं नाही वाटत म्हणून तक्रार करायची... त्या तिला खाली येऊ देत नसत म्हणून ती एकटीच यायची. इथे खाली येऊन त्यांनीही खूप खेळावं अस 
तिलाही वाटायचं... पण, ती रोज एवढच सांगायची आणि मी ते ऐकत ऐकत झोपी जायचे.... रोज रोज 
तिच्या सोबत जाण्याचं ठरवूनही कधी जाता आलंच नाही... नंतर चांदणी उदास झाली असेल... तिला 
खालची रात्र उदासवाणी वाटली असेल.... किंवा माझ्यासारखीच तिलाही रात्रीची भीती वाटू लागली 
असेल...... किंवा तिच्या मैत्रिणीनी तिच्या घरी सांगितलं असेल आणि तिला खूपखूप ओरडा बसला असेल... काय झालं माहित नाही पण, आता ती येत नाही. आता मला चांदणीची आठवण येत नाही. आता 
मलाही तिच्यासोबत वर जावं वाटत नाही. आता चांदण्या मोजाव्या असंही वाटत नाही... आता चांदण्या 
बघाव्या असंही वाटत नाही. चांदणी पुन्हा येईल गप्पा मारायला.... तिची वाट पहावी असंही वाटत नाही.

मात्र, आपणही कुणाच्या तरी आभाळाची एक चांदणी असावं असं उगीच वाटतं...
********************************************************************************************
तू असो किंवा तो असो. तो लांबलांब जाणारा रस्ता असो की, तो कानगोष्टी सांगणारा वारा असो, ती 
अल्लड चांदणी असो... तुमचं असणंच फक्त माझ्यापुरतं होतं. तुमच्या असण्याने कधी त्रास दिला नाही 
आणि तुमच्या नसण्यानेही कधी त्रास झाला नाही. फक्त एक पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरून 
काढण्याचा मी प्रयत्न करत राहिले. खरं तर नकळतच होत होतं ते. पण, खरं सांगू का त्यात पडलेली भर 
कधीच संतुष्ट करू शकली नाही. कधीच तृप्त करू शकली नाही...!

म्हणून तर या अशा अस्ताव्यस्त निर्जीव पसाऱ्याचा एक भाग होऊन बसले आज. चेतना नसलेला, निष्प्राण 
पसारा... मोठा असो की छोटा पसारा कधीच नाही हलु शकत जागचा... स्वतःच्या मनानी... मी ही अशीच 
तर झाले होते... कठपुतळी... स्वतःच्या मनासारखं जगणं विसरून गेले होते.

तुमच्या रुपात खरं तर मी स्वतःच स्वतःला भेटत होते. पण, आत्ता तशी भेट तर स्वतःशीही होत नाही...
आता पुन्हा एकदा प्रवास करायचाय स्वतःकडून स्वतःकडे. खरं सांग आत्ता तुम्ही सगळे याल ना पुन्हा 
भेटायला?

मी वाट पाहतेय....!
पुन्हा उमलण्याची. पुन्हा पालवी फुटण्याची. पुन्हा बहरण्याची...!


© मेघश्री श्रेष्ठी.


Post a Comment

8 Comments

Ravi Dhaware said…
❤️❤️❤️❤️
Meghashree said…
❤️❤️ Thanks Ravi
Unknown said…
वाह👌💐💐💐
Unknown said…
👌👌👌👌👌👌👌
Unknown said…
👌👌👌👌👌👌👌
Unknown said…
मस्त लिहीतेस 👍
खूपच सुंदर लिखाण, अगदी मनाच्या कोपऱ्यात उतरून जाता. विचार करायला लावणारे लिखाण असते तुमचे. खूप छान.