कोरा कागज भाग-५


 

एकतर सासूच्या आजारपणामुळं दिवसभर दगदग झालेली. त्यात ही चकलीची फर्माईश. आईला एवढं जीवावरचं दुखणं आलंय त्याचं लेकाला काही नाही आणि सुनेला मात्र डोस पाजायला सगळे तत्पर. अगदी आयुष्यभर एकमेकींच्या इर्ष्येवर संसार करणाऱ्या जावा पण म्हातारपणात मात्र सुनेच्या बाबतीत वागताना अगदी एक होतात.

सासूला जरा आराम वाटायला लागल्यावर तिनं ही सगळी भाजणीची तयारी केली आणि लागलीच दळण घेऊन आली. आज दळण झालं तर उद्या किंवा जमल्यास रात्रीच्या जेवणानंतर लगेचच चकल्या करता आल्या असत्या. उद्याचं सुद्धा काम आज आत्ता कसं होईल याकडेच तिचं लक्ष. कधी तरी निवांत वेळ मिळेल म्हणून बिचारी होता होतील तेवढी कामं हाताबरोबर करण्याचा प्रयत्न करायची. पण, कसलं काय घरातलं काम म्हणजे हनुमानाची शेपटीच करेल तितकी वाढती पण कमी व्हायचं नाव घेत नाही. इथं आल्यावर जरा कुणाशी काय बोलणं सुरु करावं म्हंटलं तर त्यात पण, खोट.

शेवंता काकू मघापासून गप्प होत्या आणि अचानकच सुरु झाल्या, “काय उपेग नाही बगा भाड्यास्नी मोठं करून. तुम्हाला सांगतो, नुसतं बायको म्होरं गोंडा घोळत्यात.

त्यांच्या डोळ्यात उद्वेग होता जणू एकीकडे लेकाला शिव्या तर घालत होत्या पण, त्या शिव्या घालाव्या लागताहेत म्हणूनही त्यांचच मन त्यांना खात होतं. कितीही मोठी झालीत लेकरं तरी त्यांना असं स्वतःहून बोल लावणं खूपच जड जातं आईच्या काळजाला. त्यात शेवंता काकूंना तर एकच मुलगा. पिठाची गिरण आणि मिरची कांडप एवढ्यावर त्यांनी संसार उभा केलेला. त्यातही किती अडचणी आल्या गेल्या यांचा हिशेब नाहीच. लेक मोठा झाला, संसाराला लागला हे बघितल्यावर तरी मन समाधानी होईल असं वाटतं. काहीही आणि कितीही वाटलं तरी शेवटी वाटणं हे वाटण्यापुरतंच. मनाची उदासी काही केल्या हटत नाही. सतत कामात मग्न राहूनही शेवंता काकूच्या मनात मात्र नेहमीच घालमेल सुरु असायची.

लेकाच्या लग्नानंतर काहीतरी फरक पडेल अशी अशा लावून बसल्या होत्या त्या. आशा मागून निराशा येतेच किंवा आशा ही निराशेची धाकटी बहिण असते. असले सुविचार कधी त्यांनी वाचले नव्हते. धान्याचे वजन आणि दळपाचा दर यांचा हिशेब करण्यापलीकडे त्या बाकी काही शिकल्या नव्हत्या आणि एवढ्या कौशल्यावर त्यांचा संसारही अगदी नेटाने उभा राहिला होता. त्यामुळे स्कील अपडेशन सारख्या कल्पनांनी त्यांना कधी झपाटले नाही.  

“का तुमचं आणि काय झालं?” सरला काकूनं जरा आधार दिला तसा शेवंता काकूला तर भरूनच आलं.

“आपण चालरीत पाळतेली माणसं. जग बदललं म्हणून पूर्वापार चालून आलेली चाल मोडून चालत्या का? सुनंला काय म्हणलं मी, इथ त्यांनी जरा आवंढा गिळला आणि आवाज बारीक करून सांगू लागल्या, तुला चालत नसतंय तवा सांगत जा मला. घरातलं काम तसं करुनी इटाळ आल्यावर. माझ्या घरची देवी हाय. आम्ही कधी तिला असं दुखवल्याली नाय. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. फरकच नाय बघा. अवो आसं डोकं हलतंय म्हणून सांगू..... एक गोष्ट तुला ती बी प्रेमानी सांगितलेली कळत नसलं तर, मग आमी माणसं हवूत का जनावरं? कालच बघा हेंनी फिरायला म्हणून सकाळी सकाळी गेलेत आणि कसा काय खड्या वरनं पाय निसटला. हे एवढी जखम झालीय. अंगठा आणि तर्जनी जेवढी लांबवता येईल तेवढी लांबवून त्यांनी जखमेची उंची सांगितली. रोज जात्यात नव्ह का? विटाळाचं गड्या माणसासनी परवाडत नसतंय. आत्ता किती सांगितलं तर ऐकत नाय म्हणाल्यावर कसा जीव नाराजच झालाय बगा. मग आमच्या सासवा सारखं शिवी शिवाय पाणी बी न पिणाऱ्या सासवा ह्यास्नी असत्या तर कसं केलं असतं.”

सरला काकुच्या शब्दांचा जरा आधार मिळाल्यावर शेवंता काकूंनी सुने बद्दलची सगळी भडास मोकळी केली.

शुभा आपली नुसतीच ऐकत होती. तिनं अजिबात तोंड उघडलंच नाही याविषयात. कारण, याच कारणावरून त्यांच्यातही सुरुवातीला बरीच तूतू मैमै झाली होती. शेवटी तिने सगळ्याकडं दुर्लक्ष करून देणंच सोयीचं ठरवलं. शिवाय तिचा नवरा आणि सासरेही इतक्या कर्मठ विचारांचे नव्हते. त्यामुळे याबाबतीत सासूचा थयथयाट चालत नसे. शेवटी तिच्याने कामं व्ह्यायची नाहीतच. त्यामुळे हे कर, एवढंच कर, असलं काही सांगण्याच्या भानगडीतच पडत नाहीत त्या.

“आत्ताच्या पिढीला काही राहिलेलं नाही चालरीत. नुसतं मनात आलं तसं नाचलं की झालं.” सरला काकू आपल्या मनातील संताप अखंड पिढीच्या माथ्यावर मारून शांत बसल्या. असं बोललं म्हणजे कुणालाच नेमका दोष दिल्याचा दोष लागत नाही, हे त्यांना माहिती असावं बहुतेक. पिढी म्हणजे पिढी त्यात घराची, बाहेरची, गावातली, गावा बाहेरची, अशी सगळीच सरसकट माणसं धरली जातात. शिवाय, विशिष्ट व्यक्तीद्वेषाचं पापही लागत नाही. पिढी ही खापर फोडण्यासाठीच जन्माला आलेली असते. मग मागची असो की पुढची. काही फरक पडत नाही.

“कशाला एवढं मनाला लावून घेताय? कामात असताना असा सारखा विचार करू नये. आधीच गिरणीच्या कामात बारीक लक्ष द्याय लागतंय. असा विचार करून जीवाला यायचं. त्यापेक्षा कामात राहायचं आणि कामाकडं लक्ष द्यायचं.” सरला काकू बोलत होत्या. बोलताना त्या कधी शेवंत काकूकडं बघायच्या कधी पापण्यांची उघडझाप करत स्वगत बोलल्या सारखं बोलत होत्या.

विचार न करण्याच्या सरला काकूचं बोलणं ऐकून शेवंता काकू विचार न करता कसं राहायचं यावर विचार करू लागल्या आणि असा विचार करत करतच त्यांनी सरला काकूंच्या दळपाचा डबा त्याच्यासमोर ठेवला. सरला काकूंनी डबा घेतला आणि त्या घराकडं निघाल्या.

थोड्यावेळाने शुभा पण, आपलं दळप घेऊन घरी गेली. शेवंता काकूंनी गिरण बंद केली. जात्यांची घरघर थांबली. विचारांची घरघर थांबत नव्हती. आणि त्यांना काहीही करून विचार बंद करायचे होते कारण, डोकं सुन्न झालेलं एकसारख्या उठणाऱ्या विचारांकडं लक्ष देऊन देऊन.

क्रमश:

©® मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

0 Comments