प्रवास

            “प्रवास”

तो परिसर म्हणजे जणू धरतीवरील स्वर्ग असावा. सगळीकडे हिरवी, पोपटी पाने असलेली डौलदार झाडे आनंदात डुलत होती. त्यावर गुलाबी, लाल, पिवळी, आबोली अशा विविध रंगांची फुले फुललेली होती. तिथल्या वातावरणातून प्रसन्नता ओसंडून वाहत होती. पायाखाली मऊशार हिरवे, लुसलुशीत गवत पसरलेले होते. त्यावरील साचलेल्या दवाचा गारवा पायांना जाणवत होता. फुलपाखरांची लगबग जाणवत होती. वातावरणात एक हवीहवीशी शांतता होती.

 

फुलावर उडणाऱ्या त्या रंगीत फुलपाखराला धरण्याचा मोह अनावर झाला होता. तरीही हळूहळू चालता चालता कुठले बरे फुलपाखरू आपल्या हातात येईल याचा मी अंदाज बांधत होते. एका फुलावर मध गोळा करण्यात गुंगलेल्या फुलपाखराला मी हळूच स्पर्श केला आणि त्याला उचलून हातात घेतले. त्याला स्पर्श करताच त्या नाजूक फुलपाखराची एक मोठी अळी झाली. हाताच्या दाबाने ती आली फुटून त्यातून काळसर द्रव वाहू लागला. त्या द्रवाची भयंकर दुर्गंधी येत होती. स्वतःच्याच हाताची त्या क्षणी प्रचंड किळस वाटू लागली.

 

हात झटकला तरी तो काळा द्रव हट्टी मुलासारखा चिकटून राहिला होता. आसपास कुठे पाणी मिळाले तर हात धुता येतील म्हणून पाण्याच्या शोधात आता मला त्या आजूबाजूच्या मनमोहक परिसराचा जणू विसरच पडला. मा‍झ्या डोक्यात बसली होती ती फक्त किळसवाणी दुर्गंधी. झुळूझुळू वाहणार्‍या पाण्याचा कुठे तरी आवाज येत असल्याचा भास झाला आणि मी त्या आवाजाच्या दिशेने चालू लागले. आवाज तर येत होता पण कुठेच पाण्याचा टिपूसही दिसत नव्हता.

 

आजूबाजूला कितीतरी सुगंधी फुलांचे ताटवे दिसत होते. तरीही मा‍झ्या नाकात मात्र त्या चिकट काळ्या द्रवाचा उग्र दर्प जणू चिकटून बसला होता. वाटलं यातीलच एक फुल तोडून घ्यावं, ते कुस्करून त्याचा रस हातावर चोळावा. फुला तोडण्यासाठी फुलांच्या देठाला हात लावताच अचानक त्याला फुटलेल्या काट्यांनी हात ओरबाडले गेले. आता संपूर्ण हात खरचटला आणि रक्तबंबाळ झाला.

 

इथल्या सौंदर्याची अनुभूती जणू फक्त डोळ्या पुरतीच सीमित होती. त्याचा उपभोग घेण्याचा मला अधिकारच नव्हता.

 

आधीच्या उग्र दर्पाच्या अनुभवात आता वेदनेची भर पडली. मऊशाल हिरवळही आता काटेरी वाटू लागली. नेमक्या कुठल्या चेटकिणीच्या बागेत तरी आले नाही ना अशी शंका डोक्यात वळवळू लागली. कारण, वरून सुदंर दिसणाऱ्या या गोष्टी प्रत्यक्षात भयावह होत्या.

आता शांत वाहणारा वाराही बोचू लागला. पावला पावलावर उगीचच कुणी तरी दबा धरून बसल्याची भीती वाटू लागली. या हिरवळीत एखादा साप दडून बसला असेल. पुढच्या वाटेवर कदाचित कुणी चेटकीण दात विचकत बसली असेल. लख्ख प्रकाशातही मन भीतीने काळवंडून गेलं.

 

पाण्याचा आवाज अजूनही कानावर येत होता. झुळूझुळू वाहणाऱ्या त्या पाण्याचा आवाज आता अचानक खळखळाटात परावर्तीत झाला होता. जणू एखादी पूर आलेली नदी जोशात सगळे बांध तोडून वाहत होती. पुढे पुढे चालत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण आता आपण कोण आहोत? कुठून आलो? याचाच विसर पडला होता.

 

आपल्याला कुणी मागेपुढे असेल का? हेही माहित नव्हते. आपण कुठून निघतो आणि कुठे पोहोचणार याचाही काही पत्ता लागत नव्हता.

 

या ठिकाणी कसे पोहोचलो हेही आठवत नव्हते. मागे फिरून कुठे जाणार या प्रश्नाचेही उत्तर नव्हते. फक्त डोळ्यांना सुंदर वाटणारे ते ठिकाणी विचित्र अनुभवांनी भरलेले आहे, एवढेच कळत होते.

 

पाय पुढे पुढे पडत होते आणि रस्ता मागे मागे सरकत होता. डेरेदार वृक्षांनी धरलेल्या सावलीत उन्हाची झळ पोहोचत नव्हती. पण, ती गर्द सावली आपल्याला गिळून टाकेल की काय अशी भीती काही केल्या मनातून जात नव्हती. झाडांना लगडलेली फळे खाण्याचा मोह आवरत नव्हता, पण हात दुर्गंधीने भरलेले होते. त्या फळांची चवही कदाचित विषासारखीच असली तर किंवा ही फळे विषारी असली तर? असाही संशय होताच.

 

ती टपोरी फळे पाहून लाळ गाळण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. हे ठिकाण आहे तरी काय? याचे कोणी उत्तर देईल का असा प्रश्न मनात घेऊनच एकेक पाऊल पुढे टाकत होते. काही अंतरावर गेल्यावर तिथे एक सुंदर संगमरवरी वास्तू दिसली. छोटीशी, पण अतिशय देखणी! आता हा कोणता नवा भुलभुलैय्या असावा का? या विचारात मी त्या वास्तूत कधी पोहोचले हे कळलेच नाही. शुभ्र पांढऱ्या दगडात बांधलेल्या त्या इमारतीत सगळीकडे काही अक्षरे कोरली होती. एका भिंतीवरील अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करताच त्यातून आवाज आला, ‘जे तुझ्यात आहे तेच माझ्यात आहे, जे माझ्यात आहे, तेच तुझ्यात आहे.’

पुढच्या एका भिंतीतून आवाज आला, ‘मीच तुझेच विराट रूप आहे, तू माझा एक इवलासा अंश आहेस.’

‘स्वतःला शोधशील तरच मी तुला सापडेन. मला शोधशील तर हाती फक्त निरर्थकता लागेल.’

 

‘जे आहे ते तुझेच आहे.’

‘या मोहजालाच्या पलीकडे तुझे खरे अस्तित्व आहे.’

‘तू आनंद आहेस, मी आनंदाचा असीम स्त्रोत आहे.’

 

एकेका भिंतीतील आवाज ऐकत आता त्या पांढऱ्या शुभ्र वास्तूतून बाहेर पडले. मी-तू, तू-मी अशा शब्दांची ती गहिरी वचनं अधिकाधिक बुचकळ्यात टाकत होती.

 

तिथून बाहेर पडताच पुढे होता तो घट्ट काळोख! शुभ्र प्रकाशाचे तेजस्वी पर्व आता संपले होते. आता फक्त काळाकभिन्न अंधार माझी वाट पाहत होता. कितीही अंतर चालले तरी अंधार संपण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. नजर जाईल तिकडे फक्त काळाकुट्ट अंधार. वर-खाली, मागे-पुढे, डावीकडे-उजवीकडे, चारीबाजूला फक्त अंधार!

 

मी चालत होते, चालत होते, चालत होते, किती दिवस, किती महिने, किती वर्षे, आता यांचा हिशेबही लागत नव्हता. आता तो काळोखच माझा रक्षणकर्ता, तारणहार, पालनहार होता. त्या अंधारात माझे अस्तित्व हळूहळू विरघळत चालले होते. संपूर्ण शरीर जणू हलके हलके होत शरीर नसल्याचाच भास होत होता. मी म्हणजे तो अंधार आणि तो अंधार म्हणजे मी. त्या अंधाराशी मी एकरूप झाले होते. अंधारात मी आणि माझ्यात अंधार!  आमच्यात कसलेच वेगळेपण उरले नव्हते.

 

मी अंधाराला शरण जात होते. मी अंधाराला शरण जात होते. मी अंधाराला शरण जात होते.

 

 मेघश्री श्रेष्ठी 


source : Google Image


Post a Comment

2 Comments

छान !
अनाकलनीय वाटत असले तरी फार गूढ अर्थ आहे याला !
खूप छान
सुंदर लेखन,लेखनाला गूढतेची झालर