प्रसंग येतो पण तो घर करून राहत नाही!

आज लीना खूप म्हणजे खूप खुश होती. तिला बढती मिळाली होती. स्वप्न पूर्ण झाले म्हणून लीना खूप म्हणजे खूपच आनंदात होती. आपले बॉस, सहकारी, कार्यालायातील इतर कर्मचारी या सगळ्याबद्दल तिला मनोमन कृतज्ञता वाटत होती.

 

Image Source : Google

काही दिवसांनी लीनाचे रुटीन काम सुरु झाले. बढती मिळाली होती म्हणजे अर्थातच जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. कामात ती इतकी बुडाली होती की दुसऱ्या कशासाठी तिला वेळच नव्हता. आपला फोनही तिने दुसऱ्या टेबलवर ठेवून दिला होता, कामात व्यत्यय नको म्हणून. इतक्यात तिला ऑफिसच्या फोनवर एक फोन येतो, आणि तिच्या सासूबाई घरातल्या घरातच पाय घसरून पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे तिला समजते. अर्थातच खूपच गंभीर बाब असल्याने ती आपल्या वरिष्ठांशी याबाबत बोलते आणि ऑफिसमधून बाहेर पडते.

बाथरूम मधल्या स्टूलवर बसून पाय स्वच्छ करायला गेल्या आणि स्टूल निसटून तिथल्या तिथे जोरात आपटल्या. तिथल्या तिथे पडल्या असल्या तरी त्यांच्या खुब्याचे हाड मोडले होते आणि त्याचे तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते. ऑपरेशन नंतरही त्यांना ऊठ-बस करायला जमेल की नाही याची शंकाच होती.

आता त्यांच्यासोबत दवाखान्यात कोण थांबणार आणि घरात कोण बघणार हे दोन मोठे प्रश्न लीना समोर आ वासून उभे होते.  कारण उमेश, लीनाचा नवरा परदेशी होता आणि त्याला लागलीच येणे अजिबात शक्य नव्हते.

 

हॉस्पिटलचे नाव काढले तरी कोणी फिरकणार नाही अशी परिस्थिती. आता काय करावं हा प्रश्न तिला आतून पोखरत होता. ऑपरेशन होईपर्यंत तरी चार दिवस तिला ऑफिसला जाता येणार नव्हते. तिने तसा मेल ऑफिसला पाठवला आणि किमान चार दिवसांसाठी तरी थोडी निर्धास्त झाली.

 

सुमनताईंना उमेश एकटाच. धाकटी सुलभा परवाच कोव्हीडने गेली होती. तरण्याताठ्या मुलीचा मृत्यू त्यांना खूपच धक्का देऊन गेला होता. लीना काही मुलीपेक्षा कमी नव्हती पण तरीही पोटची पोर गेल्याचं दुःख कुणाला सोसलं असतं?

 

तिकडे जावईही दोन मुलांसोबत कशीबशी कसरत करत होता अजून त्यांचीच गाडी रुळावर आली नव्हती.

 

चार दिवस लीनाला घर आणि हॉस्पिटलमध्ये फेऱ्या घालून घालून अक्षरश: जीव नकोसा झाला होता. नशीब मुलांनी तरी आल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन नीट साथ दिली होती.

एकट्या राधाला आता आईंची, मुलांची आणि घरातली इतर कामं उरकणार कशी?

सासूबाईचं सगळं करून ऑफिसवर जाणे, म्हणजे मोठी दगदग पण लीनाने कसलीही तक्रार केली नाही. राधाच्या हाताखाली दुसरी कोणी मदतनीस आणि आईंसाठी केअर टेकर मिळेपर्यंत सगळं काही आपल्यालाच हँडल करावं लागणार हे तिला चांगल ठाऊक होतं.

नेहमीपेक्षा एक तास आधी उठून तिने दहा पंधरा मिनिटे ध्यान केलं आणि आपली ग्रॅटीट्युड जर्नल लिहायला घेतलं, अशा कठीण काळातही लीना आपल्या डायरीत लिहित होती,

१) आई पडल्या असल्या आणि त्यांचं मुख्य हाडच फॅक्चर झालं असलं तरी त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि काही दिवसातच त्या पुन्हा आपल्या पायावर उभ्या राहतील याची खात्री असल्याने मी कृतज्ञ आहे.

२) सध्या घरातील काम आणि ऑफिसची वाढलेली जबाबदारी यांचा मेळ घालताना माझी ओढाताण होणार असली तरी राधा, माझी मदतनीस वेळेवर येते आणि तिलाही माझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे.

३) अजूनही आम्हाला चांगला केअर टेकर भेटला नसला तरी तो लवकरच भेटेल आणि आईना घराच्याघरी उत्तम ट्रीटमेंट मिळेल याबद्दल मला खात्री आहे, म्हणून मी कृतज्ञ आहे.

४) या अवघड काळातही मला माझे ऑफिसमधील सहकाऱ्यांनी समजून घेतलं माझ्या अनुपस्थितीतही माझ्या वाटणीची कामं पूर्ण केली याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचे, माझ्या बॉसचे आभार मानते.

५) परिस्थिती ओळखून माझ्या मुलांनीही स्वतःमध्ये बदल केले. स्वतःची कामं स्वतः उरकण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे.

६) माझा नवरा या काळात इथे येऊ शकत नसला तरी या सगळ्या परीस्थितीत जी आर्थिक ओढाताण निर्माण झाली असती ती झाली नाही कारण तो सगळे आर्थिक व्यवहार कुशलतेने हाताळतो. त्यांनी सर्वांची हेल्थ पॉलिसी आधीच काढलेली असल्याने आईंच्या ऑपरेशनचा निर्णय वेळेत घेता आला आणि वेळेत त्यांना चांगले उपचार मिळाले. माझ्या नवऱ्याच्या या हुशारीबद्दल मी कृतज्ञ आहे.

७) डॉक्टरांनी ऑपरेशन यशस्वी केले म्हणून मी त्यांच्याबद्दलही कृतज्ञ आहे.

८) ही सगळी परिस्थिती हाताळण्यास मला निसर्गाने सक्षम आणि कुशल बनवले म्हणून मी त्या निसर्गशक्तीचे आभार मानते.

त्यानंतर तिने पटकन स्वतःची अंघोळ उरकली आणि आईना अंघोळ घालून त्यांच्यासाठी नाश्ता तयार करून दिला.

राधा नेहमीपेक्षा लवकर आणि हल्ली ती लवकरच येते आणि जायला उशीर झाला तरी काही कुरबुर करत नाही. त्यात राधाने आपल्या हाताखाली उद्यापासून आपली मावसबहिण येईल अशी चांगली बातमी आणली होती. त्यामुळे लीनाचे काम आणखी सोपे झाले.

 

लीना घरातील सगळी कामे उरकून ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमधील शिपायांनी तिच्यासाठी चहा आणला. चहा टेबलवर ठेवता ठेवता त्याने विचारले, “मॅडम कुठे होता चार दिवस दिसला नाही का? तब्येत बरी नव्हती का?”

“नाही, माझी तब्येत ठीक आहे पण माझ्या सासूबाईचे ऑपरेशन झाले त्यामुळे मला त्यांच्यासोबत दवाखान्यात थांबावं लागलं ना म्हणून चार दिवस येऊ शकले नाही. एका बाजूला पर्स ठेवून चहाचा कप तोंडाला लावत लीना म्हणाली.

“गंभीर काही आहे का?” त्याने विचारले.

“हो, त्यांच्या खुब्याचे हाड मोडले आहे, त्याचे ऑपरेशन झाले असले तरी काही दिवस त्यांना हालचाल करता येणार नाही. या काळात त्याच्याकडून कुणीतरी योग्य पद्धतीने हालचाल करवून घेऊन त्यांची देखभाल करणारं माणूस हवं आहे.”

“अहो मॅडम माझ्या मुलीने नुकताच नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे आणि तिने केअर टेकिंगमध्येही स्पेशलायझेशन केले आहे. तुम्हाला वाटल्यास तिच्याशी बोलू शकता.” तिचे व्हिजिटिंग कार्ड लीनाच्या टेबलवर ठेवले आणि तो चहाचा कप उचलून बाहेर पडला.

Image source : Google


दुपार पर्यंत काम झाल्यावर तिला निरोप आला की अतुल सर तिचे बॉस तिच्याशी काही तरी बोलणार आहेत,

लीना त्यांच्या केबिनमध्ये गेली.

“गुड आफ्टरनून सर, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं होतं असा निरोप मिळाला.”

“हो, लीना हल्ली तुझी धावपळ होतेय हे दिसतेय मला, म्हणून तुला काही सुचना द्यायच्या आहेत. तुझं काम जबाबदारीचं आहे आणि ते तू उत्तमरित्या पार पाडत आहेसच. पण समज कधी अचानक तुला घरी थांबावं वगैरे लागणार असेल तर निसंकोच विचारू शकतेस, एखाद आठवडा तू वर्क फ्रॉम होम देखील करू शकतेस, नाही तरी लॉकडाऊन काळात आपण सर्वांनीच अॅडजस्ट केलं नाही का? तसच समजू.” अतुल सर म्हणाले,

“नाही सर त्याची काही गरज नाही आता मला दोन चांगली माणसं भेटली आहेत जी माझ्या माघारी माझ्या घराची, मुलांची आणि सासूबाईंचीही योग्य काळजी घेतील. आणि तस काही वाटलंच तर मी नक्की तुमच्याशी बोलेन. मला कसलाही संकोच वाटणार नाही.”

 

इतकं बोलून लीना अतुल सरांच्या केबिन मधून बाहेर पडली. खरच आजचा दिवस किती तरी चांगला होता तिच्यासाठी कारण, तिच्या डोक्यातील निम्मी टेन्शन्स आज कमी झाली होती. राधाला मदतीसाठी तिची बहिण येणार होती त्यामुळे घरातील वाढत्या कामांची चिंता मिटली आणि आईंच्या देखभालीसाठीही खात्रीतील केअर टेकर मिळाला होता. तो उद्यापासूनच कामावर येणार होता. म्हणून तीही चिंता मिटली.

 

संध्याकाळी लीना घरी आली तेव्हा सासूबाई आणि मुले संध्याकाळचा नष्टा करून गप्पा मारत बसले होते. आजी झोपून असली तरी तिच्याकडून गोष्टी ऐकणं हा नातवंडांचा हक्कच नाही का?

राधा आणि तिची बहिण रूपा देखील त्यांच्या गप्पात सामील झाल्या होत्या. त्यांनी अर्धा स्वयंपाक आवरला होता आणि रात्रीच्या पोळ्या केल्या की झालं सगळं. इतक्यात लीना घरी पोहोचली.

 

राधाने तिच्यासाठी चहा आणला. “ताई तुम्ही म्हणाल तर एकदिवस मी आणि एक दिवस रुपा आळीपाळीने रात्रीच्या देखील थांबायला तयार आहोत.”

अगं इतकं कशाला तुम्ही दोघींनी दिवसभर जरी साथ दिली तरी पुरेशी आहे, शिवाय उद्यापासून केअर टेकर येईल. त्यामुळे आईंची कामं तुमच्यावर पडणार नाहीत. रात्री काही लागलं सावरलं तर मी आहेच की.”

“हो पण आम्हाला वाटलं आपलं बोलून बघावं तुम्हाला तेवढी मदतच होईल आमची. घरं जवळच आहेत ना त्यामुळे फार काही आम्हाला त्रास होणार नाही.”

आता तर लीनाला अजूनच हायसं वाटलं.

परिस्थिती कठीण होती पण लीनासमोर मोठं मनुष्यबळ उभं राहिलं होतं ज्याच्या जीवावर ती हा प्रसंग लीलया पार पाडू शकत होती.

पाच-सहा महिने सर्वांनीच आपली कामे चोख बजावली आता सुमन ताई थोड्या फार चालायला लागल्या होत्या. डॉक्टरही त्यांच्या प्रगतीवर खुश होते. काही दिवसातच त्या स्वतःची सगळी कामे स्वतः करतील अशी अशा डॉक्टरांना होती. तरीही दूरच्या अंतरावर फिरायला जाणे जिने चढ उतार करणे हे काही जमलं नसतंच यासाठी त्यांना कायमच मदतीची गरज लागणार होती.

त्यांच्या केअर टेकरची मेहनत फळाला आली असली, तरी आता तिची गरज नव्हती. लीनाने तिच्यासाठी दुसरीकडे नोकरी शोधली.

राधा आणि रूपा दोघीच घराची आणि सुमनताईंची काळजी घेत होत्या.

लीना आता आपल्या ऑफिसच्या कामात पुन्हा आधीच्याच जोमाने रुळली होती.

लीनाला कळून चुकलं होतं, प्रसंग येतो पण तो घर करून राहत नाही.

Post a Comment

2 Comments

वाह... प्रसंग येतो पण तो घर करून राहत नाही.❤️
लिहीत रहा. साहित्याची सेवा करत रहा.