स्वप्नात दाटले प्राण!
जीवन
आणि मनन हे दोघे भाऊ खूप हुशार होते. जीवनला चित्रकलेत रस होता. त्याला नेहमी मोठा
झाल्यावर एका मोठ्याशा सभागृगात आपल्या चित्रांचे प्रदर्शन लागले असल्याचे स्वप्न
पडायचे. चित्रकलेत तो इतका डुंबून गेलेला असायचा की, त्याला इतर कोणत्या गोष्टींचे
भानच नसायचे. मग आपला अभ्यास मागे राहतो. शाळेत आपल्याला शिक्षक ओरडतात. घरात आई-बाबांची
बोलणी खावी लागतात, हेही त्याच्या गावी नसे. हातात कागद आणि पेन्सिल यायचा अवकाश
की जीवनचे अख्खे जगच बदलून जाई. या जगात कोण असे तर फक्त कागद, पेन्सिल, रेषा आणि
जीवन. या जगात हरवल्यानंतर त्याला ना शाळा आठवे, ना शाळेतील अभ्यास, ना शिक्षकांची
आणि आई-बाबांचा ओरडा.
मनन अभ्यासात
हुशार होता. त्याला खेळाची आवड होती. मात्र शाळेतून घरी आल्या आल्या तो कधीच दप्तर
टाकून खेळायला बाहेर पडत नसे. तो आधी आपला अभ्यास पूर्ण करी आणि मग वेळ मिळाला तरच
मित्रांच्यात खेळायला जाई. त्याचा अभ्यास वेळेत पूर्ण होत असे त्यामुळे शिक्षक
त्याचे कौतुक करत. आई-बाबा त्याला प्रेमाने वागवत. कुणी नातेवाईक घरी आले की, आई
तर त्याचे कौतुक सांगता सांगता थकत नसत.
दोघेही
भाऊ हळूहळू मोठे होत होते. दिवस जातील तसे जीवनची चित्रकलेबद्दलची आसक्ती वाढत
होती. त्याला त्यातील अधिकाधिक सखोल ज्ञान घेण्याची ओढ वाढत होती. मनन मात्र
आई-बाबा आणि शिक्षकांच्या अपेक्षेखाली दबून गेला होता. त्याला आपल्या आयुष्याचे
चित्रच स्पष्ट होत नव्हते. आपल्यातील खऱ्या गुणांना त्यानेच कधी वाव दिला नव्हता
त्यामुळे शिक्षक आणि आई-बाबांनाही त्याच्यातील इतर कलागुणांची कधी ओळखच झाली
नव्हती. खेळण्याची इच्छा असूनही तो फक्त अभ्यास पूर्ण करण्याच्या आणि परीक्षेत
जास्तीत जास्त मार्क्स मिळवून सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरण्याचा प्रयत्न करत राहिला.
यात त्याच्या स्वतःच्याच इच्छा कधी गुदमरून गेल्या हे त्यालाही कळले नाही.
पुढे
जीवन आई-बाबांच्या मनाविरुद्ध एटीडीसाठी प्रवेश घेतला. मननने आई-बाबांच्या
इच्छेनुसार सायन्सला प्रवेश घेतला. अर्थात याला आई-बाबांची सक्ती म्हणताच येणार
नाही कारण, मननने कधीच आपल्या इच्छा, स्वप्नं कुणासमोर उघड बोलून दाखवली नाहीत.
त्याच्या आतील जग आणि त्याच्या बाहेरील जग यात त्यानेच एक दरी निर्माण करून ठेवली
होती. हळूहळू मनन निराश होऊ लागला. नैराश्याच्या लाटेत गटांगळ्या खाऊ लागला.
दहावीत ८०% मार्क्स मिळवणारा मनन अकरावीत ५०%वर आला. मननची अशी अवस्था का झाली हे
कुणाच्याच लक्षात येईना.
मननची
ही अवस्था जीवनला समजली तेव्हा तो सुट्टी काढून आपल्या भावाला भेटायला आला. जीवन
म्हणाला, “दादा तू शाळेत असल्यापासूनच स्वतःचे कलागुण मारत राहिलास म्हणूनच आज
तुझी अशी अवस्था झाली आहे. तुला कुठलीही शारीरिक व्याधी नसतानाही शरीराने कमजोर
झाला आहेस कारण, तुझ्या मनाचं तू कधी ऐकलंच नाहीस. हे बघ, तुला मैदानी खेळ आवडतात
मला माहीत आहे. शाळेतील कित्येक मैदानी स्पर्धेत तू क्रमांक मिळवलेस पण फक्त
मार्क्स मिळवण्याच्या नादात तू त्यावर कधीच फोकस केलं नाहीस. आत्ता यावेळी ही तू
जर स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष केलस तर तू नैराश्याच्या अशा खाईत बुडशील जिथून तुला
कधीही कुणीही वर काढू शकणार नाही. तू तुझ्या आवडत्या स्पोर्टच्या ट्रेनिंगसाठी
प्रवेश घे आणि बघ महिन्याभरात तुझा कायापालट होऊन जाईल.”
जीवनने
आपल्या आई-बाबांनाही हेच सांगितले, “दादाला पुन्हा हसताना खेळताना पाहायचे असेल तर
त्याला त्याच्या आवडत्या स्पोर्टला जाऊ द्या. खेळल्याने त्याचा अभ्यास कमी होणार
नाही पण जर त्याला असेच मन मारत जगावे लागले तर निश्चितच एक दिवस तो जिवंत मढ बनून
जाईल.”
लाडक्या
लेकाच्या उदासवाण्या चेहऱ्याकडे पाहत बसण्यापेक्षा त्याला त्याच्या इच्छेने जगू
देण्याची मुभा दिली पाहिजे हे मननच्या आई-बाबांच्याही लक्षात आले. त्यांनी
दुसऱ्याच दिवशी मननला जवळच्या स्पोर्ट अकॅडमीत प्रवेश घेतला. मनन आता रोज प्रॅक्टिससाठी
जाऊ लागला. विविध मैदानी खेळ खेळण्याने त्याच्या शरीराची मेहनत होत होती आणि
त्याचा आत्मविश्वासही वाढत होता. आता तो पुन्हा पूर्वीसारखा मन लावून अभ्यास करू
लागला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आत्मविश्वासाची चमक झळकू लागली. त्याचे
नैराश्य कुठल्या कुठे पळून गेले होते.
जीवनच्या
आत्ममग्न राहण्याचा ज्या आई-बाबांना आधी चिंता वाटत होती तेच आई-बाबा जीवनच्या
अचूक सल्ल्याचे कौतुक करू लागले. आपल्या दोन्ही मुलांचे भविष्य वेळीच सावरले
याबद्दल त्यांनी जगनियंत्याचे मनोमन आभार मानले.
Comments