कोरा कागज भाग -२

 


दहावी झाली आणि हातात चुडा भरला. तोपर्यंत टीव्हीतील हिंदी पिक्चरातील हिरो-होरोईनचं प्रेम म्हणजे संसारच असा तिचा समज होता. पण, तीला कधीच नवरा कुठे बागेत फिरायला घेऊन जात नव्हता. दोघांनी कधी हॉटेलात जाऊन एका ग्लासात दोन स्ट्रॉ टाकून ज्यूस प्यायला नव्हता. कधी दोघांनी एकमेकांना खेटून बागेतल्या बाकावर बसण्याचा आनंद घेतला नव्हता. हातात हात घालून एकमेकांच्या श्वासात हरवल्याचा अनुभव घेतला नव्हता. अनुभव होता तो फक्त एखाद्या शारीरिक कसरती प्रमाणे होणाऱ्या दोन देहांच्या झटापटीचा. महिन्या पंधरा दिवसातून घरी येणाऱ्या सुधीरला बायकोच्या देहाची गरज मात्र होती. पण, तिच्या भावनांची कदर करण्या इतपत वेळ अजिबात नव्हता. शिवाय, दहावी शिकलेली अडाणी बायको. कुठे चार चौघात नेली तर आपलीच मान खाली. काय सांगणार आणि कसं सांगणार आपली बायको अशी एकमद काकू बाई टाइप आहे म्हणून!

दहावी हे शिक्षण फक्त सांगण्या पुरतंच झालं होतं. नाही तर शिकल्या सवरल्या मुलीसारखा गुड लुकिंग चार्म कुठे होता तिच्यात? मग, त्यालाच मान खाली घालावी लागणार नाही का?

सरला काकूला सुषमाची होणारी घालमेल कळत नव्हती असे नाही. पण, जाणूनबुजून डोळ्यांवर कातडं ओढलेल्या व्यक्तीला काही दिसतं का? तीच अवस्था सरला काकूची. शिवाय, कुठे एवढ्या मोठ्या पोराशी अशा गोष्टी बोलून त्याला आणि स्वतःलाही कमीपणा घ्यायचा? त्यापेक्षा सुषमावर नजर ठेवणं, तिला धाकात ठेवणं त्यांना सोपं होतं.

कुठल्याच भावनांचा निचरा होण्याची सोय नसलेली सुषमा अगदी वेंधळ्यासारखीच वागत होती. तिचा वाढता वेंधळेपणा पाहून सासूला तिला बोलायला अजूनच संधी मिळत होती.

पण, सुधीरला तिच्या वाढत्या वेंधळेपणाची जराही काळजी नव्हती. अशाने आपल्या संसाराची काय हानी होते आहे आणि पुढे जाऊन आपल्याला काय किंमत चुकवावी लागेल याचीही त्याला बिलकुल फिकीर नव्हती. तो आपल्याच तालात वावरत असे. सुषमाचा विचार, तिच्या भावनांचा विचार या सगळ्या गोष्टी त्याला जराही महत्वाच्या नव्हत्या.

मग, शेवटी तो कमावता होता. तिला कुठेही घराबाहेर पडून काम करण्याची तसदी त्याने दिली नव्हती. घरासाठी जे काही लागेल ते आणून दिले की त्याचे कर्तव्य संपले.  घरात बसून तिला काही कामं नसतात म्हणून फुकट डोक्याला ताप करून घेते. बायकांना काय एकाच गोष्टीवर पन्नास वेळा विचार करण्याची सवयच असते. त्यांच्या असल्या किरीकीरीकडे लक्ष दिले तर त्या वाढतच जाणार त्यापेक्षा सरळ दुर्लक्ष करणे उत्तम. आयते खाऊन यांना नासके विचार सुचतात.

सुदीप याच वातावरणात मोठा होत होता.

“सुदीप,” सरला काकूंनी सुदीपला आवाज दिला. तो टीव्ही पाहत बसला होता. टीव्हीत गुंग झालेल्या सुदीपने आजीचा आवाज कानावर पडूनही त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यांनी परत परत त्याला दोन तीन वेळा आवाज दिला. बाहेरच्या पडवीत सुषमा कपडे धूत होती. ती आपल्या कामात आणि विचारातच गुंग होती. सुदीपने लवकर प्रतिसाद दिला नाही म्हणून सरला काकू चिडल्या आणि सुदीपला बोलू लागल्या, “काय रे आक्कल नाही काय तुला? किती वेळा हाक मारली मी? टीव्ही बघून काय पोट भरतंय? ऐकू येत नाही कधीपासून तुला  हाका मारतेय?” असा एकामागून एक काहीबाही बोलत त्यांचा आवाज चढतच गेला.

बाहेरचं काम आटोपून सुषमा घरात आली. “काय झालं आत्या?” आधीच काम करून आलेला थकवा त्यात सासूचा असा अचानक चढलेला पारा बघून तीचाही आवाज थोडा त्रासिक झाला.

बस्स सरला काकूला निमित्तच मिळालं, “का? त्याला काय बोलायचं नाही काय? लगेच त्रास झाला काय तुला? तुझ्यासारखच की तुझं पोरगं पण, मंद बुद्धीचं. त्याला काय वळण हाय? इतक्या हाक मारल्या आत बसून एकदा ओ दिली नाही. हाताखाली जरा काय तरी मदत करील म्हंटल तर कायम ह्येची बोंब ऐकायला नको अजिबात.”

सुदीपवर चिडता चिडता त्यांचा मोर्चा आता सुषमाकडे वळला.

क्रमशः...

Post a Comment

4 Comments

दर्जेदार लिखाण....💙
आपलं साहित्य वाचताना पुढे काय होईल ही आतुरता लागून राहते. खूप चांगल्या पद्धतीची शब्द मांडणी. पुढचा भाग लवकर पाठवा ही विनंती.
Ravi Dhaware said…
मस्त❤️❤️