कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy) म्हणजे काय? CBTचे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून!

कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy) म्हणजे काय? CBTचे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून!



आपली विचार करण्याची पद्धती, आपले अनुभव त्यातून आपण काढलेले निष्कर्ष, आपल्या श्रद्धा-भावना-दृढविश्वास, यांचा परिणाम आपल्या वर्तनावर होत असतो. विचार, भावना यात काही  बिघाड निर्माण झाल्यास आपले मानसिक संतुलन बिघडते. मग विचार आणि भावनांतील हे संतुलन राखण्यासाठी काय करता येईल? मानसिक तणाव, नैराश्य, निद्रानाश,  Anxiety, mood swings अशा मानसिक, भावनिक समस्यांवर उपाय करण्यासाठी समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ जी पद्धत वापरतात ती म्हणजे  कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy).

आज आपण या प्रभावी पद्धतीबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आपल्या विचारातील, भावनांमधील नकारात्मकता शोधून तिच्यावर सकारात्मक काम करण्याचे तंत्र म्हणजे कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy). या तंत्रामुळे आपण आपले विचार, भावना तर सोडाच पण वर्तन देखील बदलू शकतो. पण यासाठी खूप कष्ट घेण्याची तयारी हवी हे नक्की!

आपले नकारात्मक विचार, भावना कशा ओळखायच्या आणि त्यातून प्रेरित वर्तन बदलून त्याऐवजी सकारात्मक विचार, भावना यांच्या सहाय्याने सकारात्मक प्रतिसाद कसा द्यायचा हे शिकण्यासाठी या पद्धतीत कॉग्निटिव्ह थेरपी आणि बिहेवियरल थेरपी अशा मानसोपचारातील दोन तंत्रांचा एकत्रित वापर केला जातो.

आपले मानसिक संतुलन ढळण्यास कारणीभूत असणारे, नकारात्मक विचार ओळखून त्यांना बदलण्यावर या पद्धतीत भर दिला जातो.  नकारात्मक विचार काढून त्याऐवजी अधिक तार्किक आणि वास्तववादी विचार करण्याची सवय अवलंबिली जाते.  

सायकोथेरपिस्ट जेव्हा एखाद्या व्यक्तीवर काम करतात तेव्हा ते CBTच्या अनेक प्रकारांचा वापर करतात. प्रत्येक व्यक्तीच्या अवश्यकतेनुसार थेरपीचा प्रकार ठरवला जातो. आपण इथे CBTचे चार प्रमुख प्रकारांची ओळख करून घेणार आहोत.

१)       कॉग्निटिव्ह थेरपी – नकारात्मक विचार आणि त्यांचा भावनिक परिणाम तसेच त्यातून प्रेरित वर्तन यांचा शोध घेऊन ते अधिक वास्तववादी आणि तार्किक विचारांनी विस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.

२)       डायलेक्टल बिहेवियरल थेरपी (DBT) – भावनिक संतुलन राखण्यासाठी नकारात्मक विचार ओळखून त्यांच्या ठिकाणी योग्य तार्किक विचार स्थापित करताना ध्यान, माइंडफुलनेस अशा थेरपीची मदत घेतली जाते. या पद्धतींच्या सहाय्याने आपल्या विचारांचे निरीक्षण केले जाते.

३)       मल्टीमॉडल थेरपी – या पद्धतीनुसार मानसिक समस्यांचे निराकरण करताना वेगवेगळ्या पण परस्पराशी निगडीत असणाऱ्या विविध पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो. यात वर्तन, त्याचा परिणाम, संवेदना, प्रतिमा, संज्ञापन, औषधे अशा घटकांचा विचार केला जातो.

४)       रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी (REBT) – आपल्या अवास्तव आणि अतार्किक श्रद्धा-विश्वास-मान्यता यांचा शोध घेऊन त्यांची पडताळणी केली जाते. यामध्ये आपली विचार पद्धती तपासून ती बदलण्याला प्राधान्य दिले जाते.

विचार पद्धती तपासण्यासाठी CBTमध्ये अनेक तंत्रांचा वापर केला जातो. आपली विचारांची पठडी तपासून तिच्यातून बाहेर येण्यासाठी या सगळ्या पद्धती आणि तंत्रे उपयुक्त ठरतात. इथे आपण यातील काही मोजक्या टेक्निक्स पाहणार आहोत.

नकारात्मक विचार ओळखणे – नकारात्मक विचार, भावना आणि परिस्थिती किंवा घडणाऱ्या घटनांना दिला जाणारा प्रतिसाद यातून आपले एक विशिष्ट वर्तन दिसून येते. हे वर्तन जर तुमच्यासाठी, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर व्यक्तींसाठी धोकादायक असेल तर ते बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी मनात येणारे नकारात्मक विचार कोणते? ते का येतात? हे पाहावे लागेल. यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. अर्थात आत्मटीका आणि आत्मपरीक्षण यातील अस्पष्ट फरक न जाणवणाऱ्या व्यक्तीसाठी हे परीक्षण जमणे थोडे अवघडच आहे. परंतु थोडा वेळ घेऊन हे विचार शोधण्याचा आणि ते बदलण्याचा प्रयत्न केल्यास, नक्कीच आपल्या मानसिक स्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो.

नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे –

बाहेरच्या जगात वावरताना कसे वागावे, बोलावे हे कळण्यासाठी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा उपयोग होऊ शकतो. एखाद्या नावडत्या ठिकाणी किंवा परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःवर नियंत्रण कसे मिळवावे, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे समजून घेण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी याचा वापर केला जातो. एखाद्या परिस्थितीमुळे जर आपले डिप्रेशन, Anxiety ट्रिगर होत असेल तर अशा परिस्थितीला तोंड देण्यास या तंत्राची मदत घेता येऊ शकते.

ध्येय ठरवणे – मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ध्येय सेट करण्यास प्राधान्य दिले जाते. आपले ध्येय ठरवण्यासाठी CBTचा वापर करता येतो. अनेकांना ध्येय ठरवण्यात अडचणी येतात. त्यांना नेमकं काय हवं ते ठरवता येत नाही, त्यामुळे गोंधळलेले असतात. अशा लोकांसाठी CBT एक वरदान आहे.

शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल, स्मार्ट (specific, measurable, attainable, relevant, and time-based) गोल सेट करण्यासाठी CBT चा वापर केला जातो.

समस्यांचे निराकरण करण्यासाठी –

आयुष्यात निर्माण होणार्‍या छोट्या मोठ्या समस्यांचे निराकरण करताना, त्या कशा निर्माण झाल्या, याचा शोध घेऊन त्यानुसार त्यावर काम केले जाते. या समस्यांचा आपल्या मानसिक आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम रोखण्यासाठीदेखील CBTची मदत घेतली जाते. यासाठी पुढील पाच पायऱ्यांचा वापर केला जातो.

१.       समस्या ओळखणे

२.       त्यावर कोणते उपाय योजता येतील त्यांची यादी करणे

३.       प्रत्येक उपायाचा चांगला वाईट परिणाम तपासून पाहणे

४.       शोधलेल्या उपायांपैकी जो जास्त चांगला वाटेल  त्या उपायाची अंमलबजावणी करणे

स्वतःचे निरीक्षण

स्वतःचे निरीक्षण करणे ही CBTमधील एक प्रभावी पद्धत आहे. या टेक्निकमुळे आपले वर्तन, भावना, विचार, लक्षणे यांचा योग्य ट्रॅक ठेवला जातो. थेरपिस्टशी चर्चा करताना या ट्रॅकचा चांगला वापर केला जाऊ शकतो. यामुळे थेरपिस्ट त्या व्यक्तीला सूट होईल तशी ट्रीटमेंट देतात. अगदी आपण काय खातो पितो, खाताना आपली मानसिकता कशी असते, काय विचार येतात, इथंपासून प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्ड ठेवता येते.

याशिवाय, CBTमध्ये जर्नलिंग, रोल-प्लेयिंग, रीलॅक्सिंग टेक्निक यांचाही गरजेनुसार वापर केला जातो.

CBTचा वापर कोणकोणत्या समस्येमध्ये केला जाऊ शकतो आणि याचे काय फायदे आहेत हे आपण पुढील लेखामध्ये पाहू.

 

Post a Comment

0 Comments