आयुष्य फक्त काटेच वाट्याला देतं असं नाही, कधीकधी फुलंही देतं!

लिहू की नको असा विचार करत होते पण लिहीतेच. आयुष्य कधीकधी क्रूर चेष्टा करतं तसंच ते कधीकधी आपल्याला भरभरून देतही असतं, यावर विश्वास बसावा म्हणून लिहिण्याचा हा अट्टाहास! आयुष्याने दिलेली संधी एकदा डोळसपणे पाहता आली पाहिजे बस्स!



कौन्सिलिंगसाठी अनेक फोन येत असतात. मेसेज येत असतात, यात काही खरंच खूप गरजू असतात, काही लोकांना फक्त टाईमपास करायचा असतो. कालही असाच एक फोन आला. कौन्सेलिंग घ्यायची आहे. मी फी घेऊन कौन्सिलिंग करते म्हटल्यावर, त्या मुलीने फोन ठेवला. पुन्हा अर्ध्या तासांनी तिचा मेसेज आला, फी किती घेता? मी तिला आकडा सांगितल्यावर ती पुन्हा गप्प झाली. तिने परत फोन केला आणि म्हणाली, तुम्ही काही कमी नाही का करू शकत फी मध्ये? मी म्हटलं तू किती देऊ शकतेस तितके दे. पण यावेळी मी तिची थोडी चौकशी केली, “कशासाठी घ्यायचं आहे कौन्सेलिंग?” “डिप्रेशनसाठी,” तिचं उत्तर. जरा सविस्तर सांगशील का? म्हटल्यावर, तिने सांगितलं, “माझा साखरपुडा झालाय आणि पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. पण माझ्या पास्टचे काही इस्स्यू आहेत, ज्यातून मला बाहेर पडता येत नाहीये.”

मला वाटलं असेल काही, तरी प्रेमप्रकरण आणि ‘तोच हवा’ असं काही असेल. लग्न आणि पास्ट म्हटलं की आपली झेप एवढीच.

तिचा काही वेळाने पुन्हा मेसेज आला की, मला बोलायचं आहे, पण मी पैसे नाही देऊ शकत. तिने एक रक्कम सांगितली आणि त्यापेक्षा जास्त मी नाही देऊ शकत म्हणाली.

तिचं म्हणणं तरी ऐकून घेऊ, म्हणून मी ओके म्हणाले. तिने फोन केला.

तिने सांगितलं, “माझा साखरपुडा झालाय आणि पुढच्या दीड-दोन महिन्यात माझं लग्न आहे.”

“बरं मग, पास्ट बद्दल काही तरी बोलणार होतीस तू.” (माझ्या डोक्यात अजूनही पास्ट रिलेशन आणि हिला मुलगा आवडला नसणार एवढीच कल्पना होती पण नंतर तिने जे सांगितलं ते ऐकून डोक सुन्न झालं थोडा वेळ)

ती सांगत होती. सांगताना मध्येच हुंदके देत होती. मध्येच गप्प होत होती. तिला बोलतं करणं पण अवघड होतं.

लहानपणी काही कारणांनी आई-वडिलांनी तिला तिच्या आजोळी शिक्षणासाठी ठेवलेलं. आजोळी, आज्जी, मावशी आणि ही अशा तिघीच राहायच्या. लहानपणापासून मावशीसोबतच मोठी झालेली. त्यामुळे मावशीवर हिचा खूप जीव. नंतर मावशीचं लग्न झालं आणि ही एकटी पडली. मावशीतच आपण आपल्या आईचं प्रतिरूप बघतो ना? मावशीचं लग्नही काही कारणाने ठरत नव्हतं, पण ते कसंबसं ठरलं आणि ती तिच्या नवऱ्याकडे गेली.

मावशीशिवाय हिला करमत नव्हतं. मग मावशीनेही भाचीला ये राहायला माझ्या घरी म्हणून बोलावून घेतलं. किती साधी सरळ घटना, पण पुढे काय वाढून ठेवलेलं असतं ते कळणं अवघड. तेव्हा हीची नुकतीच दहावी झालेली. म्हणजे फक्त सोळा-सतरा वर्षांची.

मावशीने असच बोलावलं असेल चार दिवसांसाठी असा हिचा समज, पण तिकडे त्यांनी काही वेगळंच ठरवून ठेवलेलं. मावशीकडे गेल्यावर मावशीने हिला तिच्या नवऱ्याशी सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली. कारण, काही कारणाने ती नवऱ्याला ते सुख देऊ शकत नव्हती.

हिने रडून गोंधळ घातला पण दोघांनीही ऐकलं नाही. अतिशय भेदरलेल्या अवस्थेत मावशीनंच पुन्हा तिची समजूत घातली आणि तिला कुणाला काही सांगू नको, असा दम पण दिला. झालेल्या फसवणुकीतून आणि धक्क्यातून सावरणं हिच्यासाठी किती कठीण गोष्ट असेल याची कल्पनाही करवत नाही.

जेव्हा जेव्हा तिला ती गोष्ट आठवे तेव्हा तेव्हा ती मावशीशीच बोले. मावशी पुन्हा तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाई आणि पुन्हा तेच.

नंतर हिची बारावी झाली आणि शिक्षणाच्या निमित्ताने, आजोळ सोडून ही दुसऱ्या शहरात गेली. शाळेत हुशार होती, पण ऐन बारावीच्या वर्षात हे सगळं घडल्याने अभ्यास झाला नाही. इंजिनियरिंग करण्याची इच्छा असूनही तिला डिप्लोमाला प्रवेश घ्यावा लागला. इथे नव्या मैत्रिणी-मित्र अशा वातावरणात तिला मागच्या काही गोष्टी विसरणं सोपं गेलं. मन लावून अभ्यास करू लागली. अशातच क्लासमधील एका मुलाशी मैत्री झाली. अभ्यास, पैशाची कमतरता अशा काही गोष्टींमुळे एकमेकांना मदत करणं, बोलणं अशी ओळख वाढत गेली. पण झाला प्रकार कुणाशी तरी शेअर करणं, गरजेचं होतं म्हणून तिने झालेलं सगळं काही त्याच्याशी शेअर केलं. त्यानेही तिला समजून घेतलं.

हळूहळू दोघांमधील नातं अधिक घट्ट होत गेलं. साखरपुडाही त्याच्याशीच झाला आहे.

मग आता स्टोरीला Happy ending आला असताना हिरोईन दुखी का?

कारण, इतक्या वर्षात तिचं कुणी ऐकून घेणारं नव्हतं. आपल्याला ऐकलं तरी आपल्यालाच दोषी ठरवलं जाणार या धास्तीनं तिने झाला प्रकार कित्येक वर्षे मनातच दाबून ठेवला. सतत तेच तेच आठवून तिला स्वतःविषयीच घृणा आणि तिरस्कार निर्माण झाला. तिच्या मित्राने तिला सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी, इतक्या चांगल्या मुलाला आपल्यासारखी (म्हणजे व्हर्जिनिटी गमावलेली) मुलगी मिळावी, हे तिला पचत नव्हतं. नैतिक-अनैतिकतेच्या तकलादू कल्पनांनी तिच्या मनात इतका गोंधळ माजलाय की, ती स्वतःला माफ करू शकत नाहीये.

तिचे प्रश्न होते, त्यानं समजून घेतलं, तो खूप प्रेम करतो, पण उद्या लग्नानंतर त्याच्या मनात आलं आपली बायको व्हर्जिन नाही तर? लग्नानंतर त्याला आपल्याशी लग्न केल्याचा पश्चाताप झाला तर? तिचे प्रश्न  valid असले तरी, सगळं काही जर-तर वर अवलंबून होतं. शेवटी आयुष्यात काही चांगलं होत असताना, त्याच्यासाठी आपणच पात्र नाही असं वाटणं साहजिक आहे.

“ज्याने चार वर्ष सांभाळून घेतलं. नुसताच रिलेशनशिपवर न थांबता लग्नापर्यंतचा निर्णय घेतला तो लग्नानंतर बदलेल असं तुला क वाटतं? तुझा विश्वास नाही का त्याच्यावर?” मी विचारलं.

खूप विश्वास आहे, पण मागच्या गोष्टी विसरल्या जात नाहीयेत. त्यामुळे लग्नानंतर सेक्स करताना मी किती कम्फर्टेबल असेन माहिती नाही. मला मागच्या चार वर्षात काही वाटलं नाही, पण आता त्या गोष्टी खूप आठवतात आणि ते आठवलं की छातीत धडधडतंय, अंग थरथरायला लागतं. खूप भीती वाटते.


खरं तिला तिला ‘डीप हिलिंग थेरपी’ची गरज होती.

“पण शेवटी, हे असं होईल ते तसं होईल अशा वाईट कल्पना करण्यापेक्षा काही तरी चांगलं होतंय आयुष्यात त्यावर विश्वास ठेव. स्वतःला आणि इतरांनाही माफ कर. पुढे काय होईल आणि मागं काय झालं यात घुटमळण्यापेक्षा, वर्तमानात सुख आहे. प्रेमाने स्वीकारणारं कुणी भेटलंय, त्यावर विश्वास ठेव आणि सगळं चांगलं होईल असं समजून पुढे जा. तू सतत अशी उदास किंवा डिप्रेशनमध्ये राहायला लागलीस, तर हळूहळू कदाचित तुला सावरण्याची त्याची शक्ती आणि संयम संपू शकतो. आपण आनंदी राहिलो तरच आपण आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकतो. हा नियम दोन्हीकडे लागू होतो. दोघांनी मिळून चांगली स्वप्नं बघा, ती पूर्ण करा आणि चांगला संसार करा,” एवढंच तिला सांगू शकले.

तिला हे पटावं आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या स्वतःच्या पात्रतेवर विश्वास निर्माण व्हावा एवढीच प्रार्थना आहे.

आयुष्य फक्त काटेच वाट्याला देतं असं नाही, कधीकधी फुलंही देतं; ती घ्यायला आपला पदर सक्षम हवा. वाईट अनुभव आले म्हणून चांगुलपणावरील विश्वास कमी होऊ देऊ नका. कदाचित या नाही तर पुढच्या वळणावर तुमच्यावरही फुलांचा वर्षाव होऊ शकतो. ज्यांनी ज्यांनी आयुष्यात कोरडा दुष्काळ सोसलाय त्यांच्यासाठी हा एक दाखला. प्रत्येक शुष्क उन्हाळ्यानंतर, बहरणारा पावसाळा येतोच. फक्त संयम आणि विश्वास हवा.  

Post a Comment

1 Comments

लखन जोतिराम चौधरी said…
अशी खूप लोकं असतात ज्यांचं डिप्रेशन हे त्यांच्या पश्चात कळतं. कधी कधी माणूस तोंडावर हसू दाखवत असतो चार चौघात पण आतून तो तुटत चाललेला असतो. सुटलेला असतो. अशा लोकांना एक स्टेप स्वतः हून पुढं यावं लागतं तरच ते जगू शकतात.
माझी विनंती आहे तुमच्या ब्लॉग तर्फे वाचकांना की आयुष्यातील भूतकाळ सहज विसरणं कठीण असतं त्यामुळे शक्य तितके तुम्ही वर्तमानात व्यस्त रहा. स्वतःचे कौन्सेलिंग करून घ्या.