सतत सतावणाऱ्या चिंतेवर काय उपाय करू शकतो? कधी विचार केला आहे का?

आयुष्यात प्रत्येकालाच कशा ना कशाची चिंता लागून राहिलेली असते. कसलीच चिंता नाही असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. कुणाला शिक्षणाची, कुणाला नोकरीची, कुणाला लग्न होत नाही त्याची, कुणाचं कुटुंबीयांसोबत पटत नाही त्याची. दररोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चिंतेत नवी भर टाकत असतात.


आज ऑफिसमध्ये कुणी काही बोललं. घरात वाद झाले. आर्थिक फटका बसला. व्यवसायात कुणी फसवणूक केली. अशा मोठ्या घटना तर पार आपल्याला हादरवून टाकतात तेव्हा चिंता वाढते.



वाढलेली ही चिंता सावलीसारखी आपल्या पाठीशी चिकटून राहते. मग जिथे जाईल तिथे आपल्याला चिंता दिसायला लागते. यात-त्यात प्रत्येकात! 

चिंता किंवा काळजी वाटणं ही तशी फार सामान्य गोष्ट आहे. पण, हीच चिंता जेव्हा पाठ घेते तेव्हा मात्र ती फक्त एक भावना न राहता रोग बनून जाते.

अति तिथे माती होतेच. अति चिंता जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते, तुमच्या दैनंदिन कामात लुडबुड करते, तुमचा ताबा घेते, तेव्हा तिला Anxiety disorder म्हणतात.

तुम्हाला नेहमीच कशा ना कशाची चिंता वाटत असेल, त्यामुळे तुम्हाला भीती वाटणे, घाम फुटणे, अंग थरथरणे, घाम सुटणे, श्वास घेताना त्रास जाणवणे, सतत नकारात्मक विचार येणे, गोंधळ उडणे, अशी लक्षणे जाणवत असतील तर, तुमच्या चिंता रोगावर इलाज करण्या इतपत तो वाढला आहे; हे लक्षात घ्या.

Anxietyचे बरेच प्रकार आहेत. ज्यामुळे व्यक्तीला रोजची, सरावाची कामे करण्यातही अडचणी येतात.

सुरुवातीच्या काळातच जर स्वतः मध्ये होत असलेला बदल लक्षात घेतला तर या आजारावर लवकर काम करता येते.

व्यायाम, दिनचर्येतील बदल, पोषक आहार, स्वतःसाठी वेळ देणे, अशा गोष्टीतून वाढणाऱ्या चिंतेवर आपण मात करू शकतो. अफर्मेशन्स, मेडिटेशन, या गोष्टींचाही Anxiety disorder नियंत्रणात आणण्यासाठी फायदा होऊ शकतो.



१)       व्यायाम – दिवसातील काही वेळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी, शरीरासाठी द्या. हालचाल केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, ज्याचा फायदा मेंदूच्या आरोग्याला होतो. मानसिक शांतता मिळते. तणाव निवळण्यासाठी व्यायामाचा फार उपयोग होतो.

२)       व्यसनापासून दूर राहा – व्यसनामुळे तात्पुरत्या काळासाठी आपण आपल्या डोक्यातील विचार विसरून जातो. पण, हा काही या समस्येवरचा उपाय नव्हे. व्यसनामुळे तुम्हाला तात्काळ आराम मिळाला तरी, त्यामुळे समस्येत नवी भर पडू शकते. त्यामुळे काही झालं तरी व्यसनापासून दूर राहण्याचा निश्चय करा.

३)       झोप पूर्ण करण्यास प्राधान्य द्या- विचारामुळे, चिंतेमुळे आपल्या झोपेवर परिणाम होतो. पुरेशी झोप न घेता, मोबाईलवर वेळ घालवण्याने तुमची चिंता कमी होणार नाहीये. त्यामुळे पुरेशी झोप घेण्यास प्राधान्य द्या. ज्यामुळे मेंदूला विश्रांती मिळेल. दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या कामावर फोकस करू शकाल.

४)       तुमची नेमकी समस्या ओळखा – तुम्हाला चिंता कशाची आहे? कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला चिंता सतावते? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या चिंता वाढतात किंवा तुम्हाला त्याचा मानसिक त्रास होतो? त्या शोधा. त्या कशा टाळता येतील, त्यावर विचार करा. टाळता येणे शक्य नसेल तर त्याबाबतचा स्विकारात्मक दृष्टीकोन तयार करा.

५)       समुपदेशकांची मदत घ्या – तुमच्या चिंता कशामुळे वाढतात? कोणत्या गोष्टींचा तुम्हाला मानसिक त्रास होतो? याबाबत तुम्हाला स्पष्टता नसेल तर समुपदेशकांची मदत घ्या. त्यांच्या मदतीने तुमच्यातील चिंतेवर नियंत्रण मिळवण्याचे मार्ग शोधा.

६)       समुपदेशकांवर विश्वास ठेवा – तुमचे समुपदेशक ज्या गोष्टी सांगतील त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टींशी प्रामाणिक राहा. स्वतःत बदल करण्याच्या निश्चयाशी प्रामाणिक राहा.

७)       जर्नलिंग करा – दिवसभरात घडलेल्या गोष्टी शक्य असतील तर नोंदवून ठेवा. फक्त वाईटच नाही तर आवर्जून चांगल्या गोष्टींचीही नोंद घ्या. यामुळे तुमच्या भावनांमध्ये कुठल्या गोष्टींमुळे चढ-उतार होतो हे शोधणे सोपे जाईल. त्यावर काम करता येईल.

८)       प्रिय व्यक्तींपासून दूर जाऊ नका – बरेचदा आपल्याला चुकीचे समजले जाईल, आपल्याबद्दल गैरसमज करून घेतले जातील, या विचाराने आपण आपल्या कुटुंबियांपासून या गोष्टी लपवून ठेवतो. किंवा आपल्या बदलत्या वागणुकीमुळे नात्यात एक अंतर निर्माण होते. तसे होऊ न देता तुमच्या मनातील विचार तुमच्या कुटुंबियांजवळ बोलून दाखवा. त्यांना वेळ द्या. जास्तीत जास्त वेळ तुमच्या प्रिय व्यक्तींच्या सान्निध्यात राहा.

चिंता ही चिते समान असते. आतल्या आत पोखरत जाते. आपली मानसिक ताकद कमीकमी होत जाते. अतिचिंता, तणाव, विचार यामुळे आपल्या मनावरचे ओझे वाढत जाते आणि लवकर थकवा येतो. यामुळे नैराश्य येण्याचीही शक्यता असते. मानसिक ऊर्जा नकारात्मक ठिकाणी खर्च झाल्याने आपण सकारात्मक गोष्टींसाठी वेळ देऊ शकत नाही. म्हणून चिंताग्रस्त मानसिकतेकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यातून बाहेर पडण्याचे नियोजन करा.   

Post a Comment

0 Comments