ध्यानाबद्दलचे हे प्रश्न तुम्हालाही पडतात का?

सर्वांसाठीच ध्यान करणे फायद्याचे आहेच. त्यातही चिंता, अतिविचार, नैराश्य, निद्रानाश अशा मानसिक विकारांनी ग्रस्त लोकांसाठी ध्यान करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. एकदा ध्यानाला सुरूवात केल्यानंतर ध्यान दिवसातून कितीवेळा आणि कितीवेळ करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. सुरूवात करताना तुम्ही अगदी कमी वेळ घेतला तरी हरकत नाही. हळूहळू तुम्ही ही वेळ वाढवू शकता. अमुक इतका वेळ ध्यान केलं तरच त्याचा फायदा होतो असा काही नियम नाही. ध्यान करण्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचं सातत्य. सुरुवातीलाच जर तुम्ही फार मोठी अपेक्षा ठेवली तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे म्हणून सुरुवातीला ध्यानामध्ये सातत्य राखणे हेच ध्येय ठेवा. ध्यानातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार लगेच करू नका. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने याचे फायदे दिसून येतात. 




सुरुवातीलाच तुम्ही तास किंवा अर्धा तास तरी ध्यान करणारच असा हट्ट करून बसलात तर तुमचं ध्यान व्यवस्थित होणार नाही आणि त्याचे अपेक्षित परिणाम पण दिसून येणार नाहीत. ध्यान करून झाल्यानंतर तुम्हाला अधिक उत्साही आणि फ्रेश वाटलं पाहिजे. ध्यान सुरू केल्यानंतर अपेक्षित परिणाम लगेच दिसणार नाहीत. त्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागेल. तुम्हाला याचे फायदे अनुभवायचे असतील तर सातत्य आणि संयम या दोन गोष्टी पाळणे खूप आवश्यक आहे. तुमच्या अपेक्षा तुम्हाला निराश करू शकतात. त्यामुळे सुरुवातीलाच फार मोठ्या अपेक्षा ठेऊ नका.

ध्यानाचे परिणाम मिळवण्यासाठी किती वेळ ध्यान केले पाहिजे?

ध्यानाचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी सलग 8 आठवड्यांसाठी किमान 13 मिनिटे तरी ध्यान करणे गरजेचे आहे. इतका वेळ तुम्ही दिलात तरच नकारात्मकता आणि अतिविचारापासून तुम्हाला थोडी सुटका मिळू शकते. किमान दोन महिने जेव्हा तुम्ही सलग ध्यान कराल तेव्हा तुम्हाला काम करण्यासाठीची एकाग्रता, क्षमता आणि उत्साह यात वाढ झाल्याचे दिसून येईल. 

अर्थात सर्वांनाच हे लागू होईल असे नाही. पण दिवसातून किमान 10 मिनिटे तरी तुम्ही ध्यान केले पाहिजे. इतका वेळ देऊनही तुम्हाला काही फरक जाणवत नसल्यास तुम्हाला वेळ वाढवण्याची गरज भासू शकते. प्रत्येकासाठी हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. तुमच्यासाठी योग्य कालावधी किती हे समजण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयोग करून पाहणे गरजेचे आहे. 

ज्यांना ध्यानाची सुरूवात करायची आहे त्यांनी किती वेळ बसले पाहिजे?

ध्यानाला सुरूवात करणाऱ्यांनी आधी 1-2 मिनिटापासून सुरूवात करावी. त्यानंतर रोज किमान 5 मिनिटे तरी ध्यान करणे अपेक्षित आहे. इथून पुढे हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता. मनावरील ताण हलका करण्यासाठी इतका वेळ पुरेसा आहे. 5 मिनिटे एकाठिकाणी शांत बसण्याची सवय झाल्यानंतर तुम्ही दर आठवड्याला एक मिनिट याप्रमाणे ही वेळ वाढवू शकता. वेळ वाढवतानाही हळूहळू वाढवत न्या. आज 5 मिनिटे बसल्यावर उद्या लगेच 10 मिनिटे बसण्याचा प्रयत्न करू नका. 

10 मिनिटांसाठी ध्यान करणे पुरेसे आहे का?

तुम्ही ध्यान कशासाठी करत आहात आणि कोणत्या पद्धतीने करत आहात यावर अवलंबून आहे. शिवाय ध्यान करण्याचा तुमचा उद्देश काय हेही महत्वाचे आहे. तुम्ही आत्ताच ध्यानाला सुरूवात केली आहे आणि तुम्हाला फक्त तणावमुक्त व्हायचे असेल तर 10 मिनिटांचा कालावधी ठीक आहे.

पण तुम्ही एकाग्रता वाढवण्यासाठी, मन शांत करण्यासाठी ध्यान करणार असाल तर तुम्ही रोजची 30 मिनिटे इतका तरी वेळ द्यायला हवा. या 30 मिनिटात तुम्ही श्वसनाचे विविध प्रकार करू शकता. ज्यामुळे तुमचे मन शांत होईल आणि डोक्यातील अतिविचार थांबतील. 

तुम्ही 10 मिनिट करा किंवा 30 मिनिट करा पण तुम्ही दररोज ध्यान करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या मनाला शांत होण्याची सवय लागते. किती वेळ बसता यापेक्षा ध्यानातील सातत्य जास्त महत्वाचे आहे.

दिवसातून किती वेळा ध्यान केले पाहिजे?

खरे तर दिवसातून एक वेळा जरी तुम्ही ध्यानाला बसलात तरी पुरेसे आहे. तुम्ही एकवेळ ध्यान करणे पुरेसे आहे की दोन वेळा ध्यान केले पाहिजे हे तुमची दैनंदिनी कशी असते यावर  अवलंबून राहील. तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी ध्यान करू शकता.

ज्यांना मन शांत करायचे आहे, मनात येणारे अतिविचार (overthinking) थांबवायचे आहेत त्यांनी दिवसातून दोन ते तीन वेळा ध्यान केल्यास जास्त फायदा होऊ शकतो. मन स्थिर आणि शांत करण्यासाठी थोडा जास्त वेळ आवश्यक आहे. दिवसातून दोन-तीन वेळा ध्यान केल्यास मनाला शांत होण्याची सवय लागते. विचारांकडे तटस्थपणे पाहण्याची सवय होते. ज्यामुळे मनात येणारे विचारही मंदावतात. overthinkingची सवय असणाऱ्या लोकांना याचा चांगला फायदा दिसून येईल. 




ध्यान करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

जी तुम्हाला आरामदायी वाटेल तीच वेळ योग्य असते. शिवाय तुमचे रोजचे शेड्युल कसे असते त्यानुसार तुम्ही ध्यानाची वेळ निश्चित करू शकता. मात्र, त्याच वेळेत रोज ध्यान करणे शक्य होईल अशी वेळ निवडा. तुम्ही दररोज सकाळी ध्यान करू शकत असाल सकाळच्या वेळेत करा किंवा दररोज दुपारी किंवा रात्री वेळ मिळणार असेल तर त्यावेळेत करू शकता. महत्वाच हे आहे की, ध्यानासाठी निवडलेली ही वेळ तुम्हाला दररोज पाळता आली पाहिजे. 
काही लोकांना ध्यान करताना झोप येते कारण, त्यांचे मन आणि शरीर दोन्ही पूर्ण निवांत आणि शांत झालेले असते अशा लोकांनी सकाळच्या वेळी ध्यान न करता रात्री झोपण्यापूर्वीची वेळ निवडावी. 

ज्यांना ध्यानातून दिवसभरासाठी लागणारी उर्जा मिळवायची असते अशा लोकांनी  सकाळच्या वेळेत ध्यान केले तर चालते. यासाठी ध्यानाची योग्य ती पद्धत निवडणेही महत्वाचे आहे.

तुम्ही कोणत्या पद्धतीने ध्यान करता आणि ध्यान केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येतो त्यानुसार तुम्ही तुमची वेळ ठरवू शकता.
 
वेळ ठरवता येत नसेल तर आधी दिवसातील वेगवेगळ्या वेळी ध्यान करून बघा आणि मग जो अनुभव येईल त्यानुसार एक वेळ निश्चित करा. 

अँक्झाइटी किंवा तणाव कमी करण्यासाठी कितीवेळ ध्यान केले पाहिजे?

अँक्झाइटी किंवा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने ध्यान करणार असाल तर यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. दिवसातील कमीतकमी 45 मिनिटे तरी तुम्ही ध्यान करायला हवे. एकाच वेळी 45 मिनिटे एका ठिकाणी बसणे शक्य नसल्यास तुमच्या सोयीनुसार दिवसभरात थोडा थोडा वेळ विभागून ध्यान करू शकता. म्हणजे सकाळी 10 मिनिटे, दुपारी 15 मिनिटे आणि रात्री 10 मिनिटे अशी वेळ विभागून तुम्ही ध्यान करू शकता. पण दिवसभरात तुम्ही 45 मिनिटे पूर्ण करायला हवीत.




ध्यान केल्याने आपल्या मेंदुच्या कार्यप्रणालीत काही बदल होतो का?

याबद्दल अजूनही संशोधन सुरू आहे. परंतु दीर्घकाळ ध्यान करत राहिल्याने आपल्या काही सवयी बदलतात. निर्णय क्षमता, विचार करण्याची पद्धत, एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देण्याची पद्धत यात फरक पडतो. पण हे तेव्हाच होते जेव्हा ध्यान हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक सहज भाग बनतो. वर्ष-सहा महिने नियमित ध्यान केल्यानंतरच हे परिणाम जाणवू शकतात. 

हा फरक सुद्धा तुम्ही किती वेळ आणि कशा पद्धतीने ध्यान करता आणि त्यात सातत्य आहे का यावरच अवलंबून राहील. 

थोडक्यात

तुम्ही आत्ता ध्यानाला सुरूवात करणार असाल तर दररोज तासभर ध्यान झालेच पाहिजे अशी सक्ती स्वतःवर करू नका. सुरूवात करताना अगदी 1-2 मिनिटापासून करून दररोजची 10-15 मिनिटे जरी तुम्ही नियमित ध्यान केले तरी पुरेसे आहे. 

यात सातत्य ठेवल्यास ध्यानाचे फायदे तुम्हाला निश्चित जाणवू लागतील.

Post a Comment

2 Comments

ध्यानाबद्दलची खूप सुंदर माहिती
Priya said…
Meditation is good for health