नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

नात्यातील Red flags बद्दल हल्ली सगळीकडेच चर्चा होताना दिसते. पण Red flags म्हणजे नक्की काय? ते कसे ओळखायचे आणि Red flags सह नातं टिकवता येतं की नात्यातून बाहेर पडणं हाच एक उपाय असतो? जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

लाल रंग म्हणजे धोक्याचं प्रतिक. त्याच अर्थानं नात्यात Red flags हा शब्द वापरला जातो. ट्रॅफिकचा red सिग्नल लागल्यावर आपण थांबतो, तसंच नात्यातही आपल्याला काही सिग्नल मिळतात. जे सांगतात की, हे नातं आपल्यासाठी चांगलं ठरणार नाही.

मुळात एकदा नातं जोडलं की, ते जन्मोजन्मी टिकवण्याच्या आपल्या संस्कृतीत नात्यातील Red flags बद्दल बोललं जाणं हीच मोठी क्रांती आहे. कारण आपला सगळा खटाटोप नातं टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठीच चाललेला असतो.

पण हल्ली नात्याच्या बाबतीतही आपला दृष्टीकोन बदलत आहे, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे.

एखाद्या व्यक्तीला नात्याचं महत्वच कळत नसेल, तर अशा व्यक्तीसोबत दीर्घकाळ नात्यात राहिल्याने आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. शिवाय करिअर, आर्थिक स्थैर्य, जीवनातील आनंद, समाधान यांनाही सुरुंग लागतो. एका नात्याचा परिणाम इतर नात्यांवरदेखील होतो. एका व्यक्तीसाठी आपण आपलं इतकं नुकसान का करून घ्यायचं, हा प्रश्न आहे.

प्रत्येक नात्यातील Red flags हे सहज दिसतीलच असं नाही. कधीकधी काही नाती सुरुवातीला एकदम छान, बेस्ट, मस्त चाललेली असतात पण, काही वेळ गेल्यानंतर ती डोके वर काढतात. काही नात्यात Red flags असतात पण ती स्पष्ट दिसत नाहीत.

यातील पहिली गोष्ट म्हणजे व्यसन  

टेन्शन आलं, मित्रांनी आग्रह केला, आठवड्यातून दोनदा चालतं, मला मानसिक ताण सहन होत नाही, त्याशिवाय माझं डोकं शांत होत नाही, अशी काहीही कारणं पुढे करून जर तुमचा पार्टनर स्वतःच्या व्यसनाचं समर्थन करत असेल, तर ही एक धोक्याची घंटा आहे, हे ओळखा आणि वेळीच सावध व्हा. मानसिक ताणतणाव, किंवा कुठलीही समस्या यावर व्यसन या उपाय नक्कीच नाही. जर ते तुमच्याशी किंवा इतरांशी बोलून, स्वतःमध्ये बदल करून समस्यांवर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार नसतील तर त्यांच्याकडे मानसिक तणाव, समस्या हाताळण्याचं कौशल्य नाही, हे स्पष्ट आहे. तुमच्या नात्यातही जेव्हा काही मोठ्या समस्या निर्माण होतील तेव्हाही ते असाच पळ काढतील. त्यामुळे व्यसनी पार्टनर पासून दूर राहा.

हिंसक किंवा आक्रमक होत असतील बरेचदा लोकांना अभद्र भाषा, शिवीगाळ करण्याची सवय असते. त्यांना कळत नाही की, अशी भाषा वापरून ते समोरच्याला मानसिकरित्या दुखावत आहेत. आता काही लोकं म्हणतील माझा पार्टनर शिवीगाळ करत असला तरी, तो माझ्यावर कधीच त्याचा प्रयोग करत नाही. नातं जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत हे मुखवटे टिकवणं जमतं, पण जेव्हा तुम्ही त्याला/तिला सोडून कुठेही जाऊ शकत नाही, याचा अंदाज आला की, इतरांशी हिंसक वागणारा व्यक्ती तुमच्याशी देखील हिंसक वागू शकतो. मुळात हिंसक वागणे हे त्याला/तिला मानसिक ताण आणि समस्या शांतपणे हाताळता येत नाहीत याचेच लक्षण आहे. त्यामुळे स्वतःसोबत असो की, दुसऱ्यासोबत असो, हिंसक वागण्याचे समर्थन करणे पूर्णतः चुकीचे आहे. आक्रमक होणाऱ्या, रागाच्या भरात स्वतःवर नियंत्रण ठेवू न शकणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहिलेलं कधीही उत्तम.

 नात्याबद्दलच्या तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील किंवा एकमेकांच्या विरोधात असतील तर –

म्हणजे तुम्हाला लग्न करायचं आहे पण तो/ती लग्नाबाबत साशंक आहे. त्याला/तिला इतक्यात लग्न करायचं नाही, पण पुढे जाऊन कदाचित त्याच्यात/तिच्यात बदल होऊ शकतो, अशा भाबड्या आशेवर राहू नका. लग्नाप्रमाणेच मुलं करिअर, कुटुंब याबाबतच्या तुमच्या कल्पना जुळतात का? की त्या थेट विरुद्ध दिशेच्या आहेत याची चाचपणी करा. पुढे जाऊन बदल होईल अशा अपेक्षा करू नका. कारण भविष्य हे नेहमीच अनिश्चित असतं. हे होईल, ते होईल, होऊ शकतं अशा शक्यतांवर विसंबून राहता येत नाही.

अविश्वास आणि इर्षा तुमच्या पार्टनरला तुमच्यावर विश्वास नसेल, तर हा देखील एक Red flag आहे. पण, तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, तुम्ही नीटनेटके, आकर्षक राहण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला खूप मित्र आहेत, तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं यासारख्या गोष्टींमुळे जर त्याला/तिला असुरक्षित वाटत असेल. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भीती किंवा असूया वाटत असेल तर, हा खूप मोठा Red flag आहे. कारण, त्या व्यक्तीला दुसऱ्याचा, त्यातही आपल्या पार्टनरचा आनंद वाटून घेता येत नाही. अशा कोडग्या मानसिकतेच्या व्यक्तीसोबत तुम्ही कधीच सुखी राहू शकणार नाही.

अविश्वास/ फसवणूकतुमच्या पार्टनरने तुमची किंवा तुमच्या आधी कुणाची तरी नात्यात फसवणूक केली असेल. ते वरचेवर सुधारण्याची खात्री देत असतील पण त्यांच्या वागण्यात तुम्हाला काहीच बदल दिसत नसेल. तुम्ही त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, कमिटमेंटबद्दल साशंक असाल, तर हे नातं दोघांसाठीही त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा कधीच त्यांच्यावर विश्वास दाखवू शकणार नाही आणि यामुळे सतत तुमच्यातील कुरबुरी वाढत राहतील.

सतत तुम्हाला कंट्रोल करत असेलतुम्ही कुणाला भेटायचं, तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे वापरायचे, तुम्ही किती वाजता घरातून बाहेर पडायचं, तुम्ही कुणाशी बोलायचं किंवा कुणाशी बोलायचं नाही याबद्दल जर ते सतत तुम्हाला टोकत असतील. तुमच्या प्रत्येक खाजगी गोष्टीत दखल घेत असतील, त्यात ढवळाढवळ करत असतील तर, अशा पार्टनरमुळे तुमची काडीचीही प्रगती होणार नाही. हे नातं म्हणजे तुमच्यासाठी मोठा मनस्ताप ठरणार हे नक्की.

त्यांच्या एक्सबद्दल सतत नकारात्मक बोलत असतीलत्यांच्या बोलण्यातून सतत त्यांच्या एक्सचा उल्लेख करत असतील आणि तोही नकारात्मक असेल तर अशा व्यक्तीपासून सावध राहा. त्यांच्या एक्सबद्दल ते कोणत्या भाषेत बोलतात त्याकडे लक्ष द्या. यावरून ते लोकांना माफ करू शकत नाहीत, हे स्पष्ट होते. त्यांच्या या वागण्यावरून त्यांना इतरांबद्दल आदर, काळजी आणि प्रेम वाटत नाही हेच स्पष्ट होते. नातं जेव्हा तुटतं तेव्हा ती दोघांचीही जबाबदारी असते पण स्वतःचं कुठं चुकलं हे न पाहता ते जर सततच दुसऱ्यावर खापर फोडणार असतील तर त्यांना त्यांच्या चुकांची जबाबदारी स्वीकारता येत नाही.



उतू जाणारं प्रेम आणि काळजी (Love bombing)  – सतत गोड बोलणं, नको तितकी काळजी घेणं, विनाकारण वस्तू खरेदी करून देणं, सतत तुमच्या संपर्कात राहण्यासाठी आटापिटा करणं, सतत माझं किती प्रेम, मला किती काळजी याचा शो ऑफ करणारी व्यक्ती प्रेमाच्या ओझ्याखाली तुम्हाला दाबून टाकत असेल तर, अशा व्यक्तीपासून सावध राहा.

तुम्ही सोडून आयुष्यात इतर गोष्टी आहेत याची जाणीव नसेलफक्त तुमच्यासोबतच वेळ घालवावा वाटतो, सतत तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणे, सतत तुमच्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी धडपडणे, सतत फक्त तुमच्यावर लक्ष ठेवून राहणे, या गोष्टी त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही घातक ठरू शकतात. याचा अर्थ असा होतो की, त्यांना त्यांच्या आयुष्यात काही ध्येय नाही, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. करिअर, आर्थिक स्थैर्य याबाबत फारसा गांभीर्याने विचार करत नाहीत. अशा व्यक्तीसोबतचे नाते म्हणजे रोलरकोस्टर राईड ठरू शकतो.

एकही मित्र-मैत्रिणी नसणे तुमच्याशिवाय त्यांच्या आयुष्यात कुणीही नाही, हे सतत सांगत असतील, त्यांना खरोखरच एकही जवळचा मित्र-मैत्रीण नसेल तर अशा व्यक्तीला नातं टिकवण्याची समज नाही हे लक्षात घ्या. अशा व्यक्तीसोबत कनेक्ट होताना तुम्हालाही त्रास होऊ शकतो. त्यांना जर इतर व्यक्तीबद्दल ओढ, आकर्षण, काळजी काहीच वाटत नसेल तर तुमच्याबद्दलही वाटणारी त्यांचं प्रेम काही काळाने कमी किंवा पूर्ण नाहीसं होऊ शकतं.



  ब्रेडक्रम्बिंग (Breadcrumbing) म्हणजे नात्याबाबतची कुठलीच गोष्ट स्पष्ट करायची नाही, पण तुम्हाला पुढे जाऊही द्यायचे नाही. कमिटमेंट नको पण नातं हवं. नात्याची जबाबदारी नको पण फायदे हवेत. थोडक्यात इथे व्यक्ती तुम्हाला ग्रहीत धरते. तेही त्याच्या सोयीनुसार. तुम्हाला कधी किती महत्व द्यायचं, केव्हा जवळ करायचं केव्हा सोडून द्यायचं, हे त्यांनी पक्क ठरवलेलं असतं. मात्र याउलट ते तुमच्याकडून या सगळ्या गोष्टींची मागणी करणार. तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे, ते राहू शकत नसले तरी. तुम्ही त्यांच्या सोयीनुसार वागला पाहिजे, ते वागू शकत नसले तरी. अशा नात्यातून मानहानी आणि मनस्ताप व्यतिरिक्त काही मिळत नाही.

गॅसलाईटिंगछोट्या-छोट्या गोष्टींचा बाऊ करणे, सतत तुमच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे, तुमची प्रत्येक गोष्ट संशयी दृष्टीने बघणे, तुमचा आत्मविश्वास कमी होईल अशाप्रकारची वक्तव्ये करणे, तुमच्या क्षमता, कौशल्य, यांची थट्टा करणे, तुम्ही कितीही चांगली वागण्याचा प्रयत्न केला तरी, त्यात खोत काढणे, अशा वागण्याला गॅसलाईटिंग म्हणतात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्या मुद्दाम करणे, ज्यामुळे तुम्ही दुखावले जाता हे अशा गोष्टी मुद्दाम करणे आणि त्या गोष्टी तुम्हीच करायला प्रवृत्त करण्याचा आरोप करणे, थोडक्यात चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार असतो. अशीव्यक्ती तुम्हाला फक्त फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन देऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून तर आधी पळ काढावा हे उत्तम.



हे Red flags फक्त प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको याच नात्यात असतात असे नाही. मित्र-मैत्रिणी, मैत्रिणी-मैत्रिणी, मित्र-मित्र अशा कोणत्याही नात्यात हे Red flags असतातच. नातं म्हटलं की आपण नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एवढीच चौकट गृहीत धरतो. पण तुम्हाला इतर नात्यातही हे Red flags दिसू शकतात. असे Red flags दिसले की, हळूहळू त्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही नात्यात मुस्कटदाबी, मनस्ताप सहन करणे, चांगली गोष्ट नाही. यामुळे तुमचा किंवा त्या व्यक्तीचा काहीच फायदा होणार नाही, तोटा मात्र होऊ शकतो.

 

  

Post a Comment

0 Comments