दोन दिसांची नाती



आयुष्यात अनेक प्रकारच्या नात्यांनी आपण जखडलेले असतो. मनुष्य जन्म घेण्यापूर्वीच त्याची नाती जन्माला येतात. बाळ जन्म घेण्यापूर्वीच त्याचं प्रत्येक व्यक्तीशी असणारं नातं जन्म घेतं. आजी-आजोबा आतुरतेनं आपल्या नातवाची वाट पाहत असतात. त्याला खेळवण्याची, त्याच्याशी बोबडे बोल बोलण्याची अतूट इच्छा तीव्र झालेली असते; आणि एका नव्या जगात प्रवेश करत ते बाळ आपल्या ठरलेल्या भूमिका वठवायला आलेलं असतं. कुणाचा नातू म्हणून, कुणाचा मुलगा म्हणून; तर कुणाचा भाचा, पुतण्या म्हणून. ही नाती रक्ताची असतात, प्रेमाची असतात, विश्वास मैत्री आणि स्नेहपूर्ण असतात. विश्वासाच्या रेशीमधाग्यांनी घट्ट बांधलेली असतात. दिन जीवांचा स्नेह एकमेकांशी विश्वासाने बांधला जातो. असा स्नेहबंध म्हणजे नाती.

रक्ताच्या नात्याप्रमाणे काही मानलेली नाती असतात. मनानं जुळलेली, जवळ आणणारी ही नाती आयुष्यात खूप वेळा जोडण्याची संधी आपल्याला मिळत राहते; पण ती टिकवणं, योग्य जबाबदारीनंनिभावून नेणं खूप अवघड असतं. मैत्री, प्रेम, विश्वास, आस्था, सहानुभूती यांनी ओतप्रोत भरलेली नाती कधी संपत नसतात; आणि संपलीच तर त्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठलीच नसते. प्रेमानं बांधलेले हृद्यपाश म्हणजे नातं, म्हणून नातं तुटणं हे हृदयभंगाहूनही भयानक असतं.

अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या निमित्तानं, तऱ्हेतऱ्हेच्या लोकांच्या संपर्कात येतो. शाळा, कॉलेज, नोकरीचे ठिकाण, पर्यटनस्थळी, प्रवासात कळत-नकळत आपल्या ओळखी होतात. ओळख वाढते आणि एक अनामिक भावबंध तयार होतो. हेच ते नातं जे फक्त हृदयाचं हृदयालाच कळतं. कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींशी असणारं नातं, नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी असणारं नातं, साहेबांशी असणारं नातं, प्रवासात भेटलेल्या व्यक्तीचं, एखाद्या गैरसोयीच्या ठिकाणीही आपल्याला मदत करून जाणारी एखादी व्यक्ती, यांच्याशी आपला काही तरी ऋणानुबंध असतो.

कॉलेजच्या सोनेरी दिवसांत तर ओळखी, मैत्री, प्रेम, विश्वास या शब्दांच्या अनोख्या वलयातच आपण वावरत असतो. या दिवसांत या भावनांना, या नात्यांना वेगळाच अर्थ अभिप्रेत असतो. ही अशी नाती असतात जी सांगून समजत नसतात; पण अनुभवून उमजत असतात. या सोनेरी दिवसांत भेटणारे काही सह्प्रवासी अचानक आयुष्यात येतात आणि तसेच निघूनही जातात; पण जाताना सतत दरवळत राहणारा आठवणींचा मंद सुगंध ठेवून व कधीही ण तुटणारा एक प्रेमबंध निर्माण करून जातात; तर कधी ओळखीच्या वाटेवरील प्रवासीही अनोळख्यासारखं वागू लागतात.

अगदी जाता-जाता ओळखी होतात आणि मनाच्या बंदिस्त पेटीत आठवणी साठू लागतात. काही लक्षात राहतात, काही विसरतात; पण माणसाचं माणसाशी असणारं माणुसकीचं नातं कधीही विसरून चालत नाही. माणसाशीच काय, पण प्राण्यांशीही असा भावबंध तयार होतो. त्यांच्यावरही असं प्रेम जडतं. बाहेरगावी गेल्यावर आपल्या घरातल्याच व्यक्तींच्या आठवणीनं आपण जसे अस्वस्थ होतो, तसेच अगदी घरातल्या टॉमीच्या आणि मनीच्या आठवणीनंही आपण अस्वस्थ होतो; कारण त्याचाही आपल्याला एक लळा लागलेला असतो.

शेतकऱ्याचं त्याच्या जमिनीशी असणारं नातंही आपल्या आईशी असणाऱ्या नात्याप्रमाणे अद्भुत असतं. तिच्यावरही तो जीवापाड प्रेम करत असतो. आपल्या उरातून पिक फुलवून ती आयुष्यभर त्याच्या उदरनिर्वाहाचा भार स्वत: उचलते; आणि त्याला आपल्या प्रेमपाशात गुंतवून ठेवते. प्रत्येक मनुष्याचंही निसर्गातील घटकाशी असणारं नातं अद्भुत, रम्य, दिव्य आणि भव्य असतं. पशु-पक्ष्यांवरील प्रेम, निसर्गाची ओढ, हिरवळीला भुलणारं मन, ही सगळी उदाहरणं म्हणजे विश्वातील चैतन्याचे मानवाच्या अंत:करणातील चैतन्याशी जडलेलं नातंच होय.

संताचं प्रेम जडतं त्या निर्विकार ईश्वरावर. मीरेचं जडलं सावळ्या कृष्णावर. ती आयुष्यभर त्याच्यासाठीच जगली आणि त्याच्यासाठीच मेली. असंच असतं नातं आणि हेच त्यातील मर्म. न ये बोलता, न ये दावता, अनुभव चित्ता चित्त जाणे.

आपण आयुष्याच्या वाटेवरील काही काळाचे सहप्रवासी. एखाद्या ठिकाणी दोन-तीन दिवसांसाठी एकत्र येतो. त्यातूनच आपला परिचय घडतो; आणि तो ऐकमेकांच्या मनात एक स्थान निर्माण करतो. हेच ते नातं जे कधी निर्माण झालं, कधी सुरु झालं ते कळत नाही. मनाच्या या गाभाऱ्यात कधी आठवणींच्या पाखरांनी घर केलं समजत नाही.

काही काळाचा प्रवास आपण एकमेकांबरोबर करतो. जिथंपर्यंत ध्येयाचा मार्ग एक असेल, तिथंपर्यंत हातात हात गुंफून चालत राहतो; पण रस्त्यांना फाटे फुटतात तेव्हा एकमेकांपासून काही काळ दूर राहण्याचा कटू प्रसंग सर्वांवरच ओढवतो. आपापला मार्गक्रमण करणं खूप आवश्यक असतं. काही काळ विरह सहन करावा लागतो. अशा विरहातही आठवणींची पणती जपून ठेवावी लागते. कारण तोच नात्यांचा खरा आत्मा असतो.

आपण काही काळापुरते एकत्र आलेले सहप्रवासी असतो, तरी त्या प्रवासात आपण एकमेकांना समजून घेऊन, बरोबर चालून, प्रवास केलेला असतो; आणि परतीच्या वाटेवर आठवणींची शिदोरी घेऊन चालायला लागतो. ती शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरवायची असते, तेव्हा नकळत आपण गुणगुणतो –

अशी पाखरे येती

आणिक स्मृती ठेवुनी जाती

दोन दिसांची रंगत-संगत

दोन दिसांची नाती’

ही दोन दिसांची नाती आठवणींच्या कुपीत बंद करून ठेवली म्हणजे हवा तेव्हा त्यांचा सुगंध दरवळत राहतो.

मेघश्री श्रेष्ठी

हा लेख १८ एप्रिल २००४ च्या सकाळ/सप्तरंग पुरवणीत पूर्वप्रकाशित झालेला आहे.

 

Post a Comment

0 Comments