आयुष्यातील कोणताही संघर्ष स्वप्रेमाच्या बळावरच जिंकता येतो!

संपूर्ण आयुष्यात उलथापालथ घडवून आणणारी एखादी घटना आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम करून जाते की आपला स्वतःवरीलच विश्वास डळमळीत होतो. परिस्थिती बदलते पण तिच्या खुणा/व्रण मनावर कायम राहतात. अशावेळी हताश न होता पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहणं यालाच तर संघर्ष म्हणतात. लक्षात ठेवा आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग येतील जातील या प्रसंगात कोणी तुमची साथ देईल कोणी सोडून जाईल. पण, या सगळ्या प्रसंगात एक साथ महत्वाची...ती म्हणजे स्वतःची साथ.

 


सगळं काही संपलं असं वाटत असतानाच पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास आणि स्व-प्रेम. पण आत्मविश्वासच नसेल तर स्वत:वर प्रेम तरी कसं होणार.

त्यासाठी आधी आत्मविश्वास पुन्हा मिळवावा लागणार. तो आपल्यातच कुठे तरी दडी मारून बसलेला असतो. हरलेला असतो. त्याला पुन्हा शोधून बळ देणं हे आपलंच काम. त्यासाठी कुणाची वाट पाहत बसलात तर ते कधीच शक्य होणार नाही. गमवलेला आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवायाचा आणि स्वतःवर प्रेम कसं करायचं? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर, हा संपूर्ण लेख वाचाच.

 

आत्मविश्वास नसेल तर स्वतःबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि सहानुभूती कमी होते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संघर्षाच्या काळात स्वतःवर प्रेम करण्यासाठी आणि हरवलेला आत्मविश्वास मिळवण्यासाठी इथे काही खास टिप्स शेअर करत आहे.

१)       तुलना करू नका – इतरांसोबत तुलना करणं हे आत्मविश्वास नसल्याचं लक्षण आहे. आपण जेव्हा इतरांशी स्वतःची तुलना करतो तेव्हा आपसूकच स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण होते. आपण इतरांपेक्षा कुठेतरी कमी पडतो असं वाटू लागतं. तुम्ही स्वतःलाच कमी लेखता. आपल्याकडं जे आहे ते पुरेसं नाही किंवा आपण हे करू शकत नाही, अशी नाकर्तेपणाची भावना निर्माण होते. म्हणून इतरांसोबतची तुलना थांबवा. प्रत्येकाचा मार्ग आणि प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. तेव्हा तुलना करून काही होणार नाही. तुम्हाला जे आवडतं, तुम्ही जे करू शकता ते इतरांशी तुलना न करता करायला लागा. ती गोष्ट करताना होणारा आनंद अनुभवा. त्यात यश येईल अपयश येईल, जमेल किंवा जमणार नाही यासगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आधी तुम्ही सुरुवात तर करा. जेव्हा पण तुम्ही ठरवलेली एखादी गोष्ट तुमच्याकडून पूर्ण होईल तेव्हा स्वतःचं कौतुक आणि अभिनंदन करायला विसरू नका.

२)       मर्यादा आखून घ्या – मर्यादा घालून घेणं आणि देणं या गोष्टी स्वतःच्या वर्तन व्यवहारासाठी आणि भावनिक नियंत्रणासाठी फार महत्वाच्या आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तुम्हाला असहज वाटत असेल किंवा त्यांच्या वर्तनाने तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्यांना त्याची जाणीव करून द्या आणि अशा व्यक्तींपासून योग्य ते अंतर राखायला शिका. असे केल्याने ज्या गोष्टी तुम्हाला खरोखर आवडतात त्या गोष्टींवर फोकस करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि एनर्जी देता येईल. अनावश्यक गोष्टींवर तुमचा वेळ आणि एनर्जी वाया जाणार नाही.

३)       स्वतःच्या शरीराबद्दल अनाठायी न्यूनगंड बाळगू नका – आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारी गोष्ट म्हणजे शरीर. आपल्या शरीरामुळेच आपल्याला एक विशिष्ट ओळख मिळालेली आहे. तेव्हा तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा. तुमच्या शरीरातील दोष न्याहाळण्याऐवजी त्यातील चांगल्या गुणांची कदर करा. असे केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या शरीराबद्दल अभिमान वाटेल. स्वतःच्या शरीराबद्दल चांगल्या भावना निर्माण करण्यासाठी तुम्ही अफर्मेशन म्हणजेच सकारात्मक स्वसंवादाचाही वापर करू शकता. स्वतःच्या प्रेमात पडण्याची पूर्वअट आहे स्वतःच्या शरीराच्या प्रेमात असणं.

४)       तुमच्यात दडलेल्या लहान मुलाला प्रोत्साहन द्या – बालपण सरलं तरी आपल्यातील लहान मुल जिवंत असतंच. महत्वाचं म्हणजे बालपणी आलेले कटू अनुभव आपल्यातील या लहान मुलाने अगदी जीवापाड सांभाळून ठेवलेले असतात. हेच कटू अनुभव आपल्याही नकळत आपली दुखरी नस बनून राहतात. जेव्हा त्या अनुभवाशी निगडीत एखादी गोष्ट आपल्या समोर येते तेव्हा आपसूक आपल्यात तणाव आणि चिंतेची भावना निर्माण होते. ज्याने आत्मविश्वास कमी होतो. आपल्यातील या लहान मुलाला आधी गोंजारा. त्याने धरून ठेवलेल्या कटू आठवणी आता भूतकाळात जमा झाल्यात याची त्याला खात्री पटवून द्या आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगण्यासाठी या लहान मुलात दडलेली भीती, नकारात्मकता काढून टाकावी लागेल आणि त्यासाठी भरपूर काम करावं लागेल.

स्वत:च्या बालपणात जाऊन पुन्हा एकदा स्वतःला पत्रं लिहा. बालपणातील एखाद्या गुणाचं कौतुक करा. तेव्हा मिळवलेल्या अचिव्हमेंट्सची दखल घ्या. त्यासाठी पुन्हा एकदा स्वतःची पाठ थोपटा. त्यावेळी जोपासलेले, आवडणारे छंद आवर्जून पुन्हा एकदा जपण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय तुमची स्वतःशी पुनर्भेट होणार नाही. कटू भूतकाळ तर आठवण्याचा प्रयत्न न करताही आठवतो पण चांगले क्षण पुन्हा पुन्हा जगण्यासाठी ते आवर्जून आठवावे लागतात. यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला अधिक बळ मिळेल.

५)       स्वतःला माफ करा – चुका करणं हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. सगळ्यांकडून त्या होत असतात. त्यासाठी स्वतःला दोष देणं किंवा रोष ठेवणं अनाठायी आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात. चुकल्याशिवाय आपण शिकत नाही. म्हणून स्वतःला माफ करून पुढील मार्गक्रमण करा. स्वतःतील अपराधीभाव काढून टाकून त्याऐवजी स्व-संवेदना, सहानुभूती आणि प्रेमाची भावना जोपासा.

६)       संयम ठेवा- स्व-प्रेम ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. त्यासाठी आवर्जून काही वेळ द्यावा लागेल. तुम्ही स्वतःसाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ देत आहात हीच गोष्ट पुरेशी आहे. त्याचे परिणाम कदाचित लवकर मिळणार नाहीत. पण, कधी ना कधी नक्की मिळतील. यासाठी संयम ठेवा. गोष्टी एका रात्रीत बदलतील अशी अपेक्षा करू नका. कोणत्याही गोष्टीवर काम करत असाल तरीही, लगेच परिणाम आणि तेही सकारात्मक परिणामच मिळतील अशी अपेक्षा करू नका.

कधी ना कधी तुम्हाला याचे परिणाम मिळणार आहेत. तोपर्यंत स्वतःला वेळ द्या आणि संयम बाळगा.

७)       इतरांकडून अपेक्षा ठेवू नका – आयुष्यात नाती असणं ही सुखाची बाब आहे. पण ती निरपेक्ष असावीत.  तुम्हाला आनंद देणं ही दुसऱ्यांची जबाबदारी नाही. ती फक्त तुमची जबाबदारी आहे. लोकं फक्त तुमच्या आनंदात सहभागी होऊ शकतात. तेही त्यांची इच्छा असेल तर. तुम्ही जेव्हा स्वत:बद्दल समाधानी असाल आणि स्वतःवर भरभरून प्रेम कराल तेव्हा तुम्हाला इतरांच्या सहानुभूतीची, त्यांना काय वाटतं किंवा काय वाटेल याची शंका राहणार नाही. इतरांच्या मताचा तुमच्यावर फरक पडणं बंद होईल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्व-प्रेमात आहात असं म्हणायला हरकत नाही. कुणाची परवानगी कुणाकडून मिळणारं कौतुक, यांची अपेक्षा न करता काम करत राहा.

८)       इतरांच्या मतावर स्वतःची किंमत ठरवू नका- कुणाला तुमच्याबद्दल काय वाटतं यावरून तुम्ही चांगले किंवा वाईट ठरत नाही. इतरांच्या मताचा आपल्यावर परिणाम नक्की होतो. कधी कधी त्यांचं मत हेच आपल्याबद्दलचं सर्टिफिकेट अशीही भावना निर्माण होते आणि आपण स्वतःकडे त्याच नजरेने पाहायला लागतो. इतरांना काय वाटतं यावर तुमची किंमत ठरत नाही. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि त्यानुसार ते इतरांबद्दलचं मत ठरवतात. दुसऱ्याला काय वाटेल असा विचार करण्याऐवजी ते त्यांचं मत असू शकतं असा विचार करून त्यात गुरफटणं सोडून द्यायचं. शेवटी तुम्ही कसे  हे तुम्हाला स्वतःला जास्त चांगलं माहित आहे. तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगावं हे ठरवण्याचा अधिकारही फक्त तुम्हालाच आहे.

९)       तुमची बलस्थानं ओळखा – आत्मविश्वास डळमळीत झाल्यावर आपल्याला स्वतःतील उणिवांचीच जास्त जाणीव होते. अशावेळी आपण आपल्या बलस्थानांकडे फार दुर्लक्ष करतो. म्हणून तुमची कौशल्ये, तुमच्यातील चांगल्या गोष्टी काय आहेत त्या शोधून त्यावर फोकस करा. या सगळ्या चांगल्या गोष्टी लिहून काढा. यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रगतीसाठी उपकारक ठरणार आहे, हे लक्षात घ्या आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण, या गोष्टी एकतर तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळालेल्या आहेत किंवा तुम्ही त्या प्रयत्नपूर्वक कमवलेल्या आहेत. अशा गोष्टींवर फोकस करा ज्या तुम्हाला प्रगतीपथावर नेतील.

१०)   सकारात्मक स्व-संवाद – तुम्ही स्वतःशी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या भाषेत बोलता याचा तुमच्या आत्मविश्वासावर खूप फरक पडतो. म्हणून स्वतःशी सकारात्मक स्व-संवाद साधने खूप खूप गरजेचे आहे.

दररोज सकाळी स्वतःतील सगळ्या चांगल्या गोष्टी आठवा आणि तुमच्यासाठी तुम्ही स्वतः, तुमचा आजचा दिवस किती महत्वाचा आहे याबद्दल बोला. स्वतःतील क्षमतांवर विश्वास वाढवतील, स्वतःवरील विश्वास वाढवतील अशी अफर्मेशन्स तयार करा. दररोज दिवसाची सुरुवात करताना या सकारात्मक विधानांची पुनरावृत्ती करा.

सगळ्यात शेवटी एवढं सांगावसं वाटतं की, आपण आहोत म्हणून जग आहे, हे ध्यानात घ्या. आपल्यानंतर हे जग कसंही असलं तरी आपल्याला फरक पडणार नाही आणि आपण नसलो म्हणून जगाला फरक पडणार नाही. तेव्हा तुम्ही स्वतः स्वतःचं जग आहात आणि या जगात तुम्हाला स्वतःला कायम प्राधान्य असेल हे लक्षात घ्या.

स्व-प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी तुम्ही यापेक्षा काही वेगळ्या ट्रीक्स आणि टेक्निक्स वापरता का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

Post a Comment

0 Comments