तेच तेच काम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येतो? मग हा कंटाळा कसा घालवाल?

काही लोकांना कामावर जाण्याचा किती उत्साह असतो तर दुसरीकडे काही लोकांना कामावर जाणं म्हणजे मोठी शिक्षा वाटते. दोन्ही प्रकारचे दिवस आपण कधी न कधी अनुभवत असतोच. कधीकधी आपणही ऑफिसमध्ये जाण्यासाठी इतके उतावीळ असतो की वेळेआधीच आवरून तयार असतो. कधीकधी मात्र घरातून बाहेर पाऊलही टाकावं वाटत नाही.



अचानकच आपल्याला कामाबद्दल अनास्था का निर्माण होते आणि अशावेळी आपण काय करू शकतो याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. या प्रकारचा अनुभव तुम्हीही घेतला असेल किंवा घेत असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

कामाबद्दल अनास्था वाटण्याची किंवा काम करू नये असं वाटण्याची अनेक कारणं आहेत.

झोप पूर्ण झाली नसल्यास – पुरेशी झोप झाली नसेल तर आपल्याला ताजतवानं वाटत नाही. त्यामुळे कामावर जाण्याची इच्छा होत नाही, हे खरं आहे. ऑफिसचं काम तर सोडाच पण घरातली साधी-साधी कामं करण्याचाही कंटाळा येतो. झोप पूर्ण न झाल्याने तुम्ही कामाच्या ठिकाणी एकाग्र होऊ शकत नाही. आज आपल्याला काय करायचं आहे, हे आठवताना मेंदूवर अधिक जोर द्यावा लागतो. पटपट निर्णय घेता येत नाहीत. कामाच्या ठिकाणी ही सगळी कौशल्ये आपल्याला दररोज वापरावी लागतात. पण मेंदूला नीट विश्रांती मिळाली नसेल तर, या सगळ्यासाठी लागणारा उत्साहच मावळून जातो.

तुम्हाला कामाचा वैताग आला असेल – तुम्ही ज्या प्रकारचं काम करत आहात ते जर फारच फार कंटाळवाणं किंवा त्रासदायक असेल तर तुम्हाला ते करण्याचा उत्साह राहणार नाही. या सततच्या तणावाने आपल्यातील काम करण्याची उर्जा आणि इच्छा देखील मरून जाते.

Image souce - Google


तुम्ही तणावाखाली असाल – अनेक लोकांना रोजचे काम करताना कितीतरी गोष्टी हाताळाव्या लागतात. अति जोखमीची कामं आपला तणाव वाढवतात. इतरांच्या दबावाखाली काम करण्यामुळेही आपला ताण वाढतो. कामातील उरक आणि सर्जनशीलता वाढण्यासाठी थोडा ताण चांगला असला तरी प्रमाणाबाहेर जर तुमच्यावर दबाव आणला जात असेल. क्षमतेपेक्षा जास्त काम करण्याची अपेक्षा ठेवली जात असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचे आहे ते कामही करावं असं वाटणार नाही.

तुम्ही करता ते काम आवडत नसल्यास – तुम्ही जे काम करत आहत त्यात तुम्हाला आनंद किंवा मानसिक समाधान मिळत नसेल तर तुम्हाला तुमचं काम कांटाळवाणं वाटू शकतं. तुम्हाला जे करायचं आहे त्याऐवजी तुम्ही दुसरंच काही करत असाल, तुम्ही जिथे काम करत आहात तिथलं वातावरण आवडत नसेल, तुमच्या कामातून तुमची काही प्रगती होत नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्हाला काम करण्यासाठी फारसा उत्साह जाणवणार नाहीच, उलट काही दिवसांनी तुम्ही रडतखडत काम करण्यासही कुरकुर कराल.

जिथे काम करत आहात ते वातावरण – तुमच्या ऑफिस मधील एखाद्या सहकाऱ्याशी तुमचं पटत नसेल तुमच्या बॉसच्या तुमच्याकडून जास्त प्रमाणात अपेक्षा असतील, कामाची पद्धत तुम्हाला पटत नसेल, तर अशा सगळ्या कारणाने मानसिक तणाव वाढतो आणि कामावर जाण्याचा कंटाळा येतो.

कामाचा कंटाळा येणे साहजिक आहे, तो कुणालाही येतोच. पण, हा कंटाळा वारंवार येत असेल. कामाच्या विचारानेच तुम्हाला थकवा येत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे.

काम करू वाटत नाही अशावेळी काही ट्रिक्स अवलंबायच्या. शक्य असल्यास एखादी सुट्टी घेणं आणि निवांतपणा अनुभवणं ही देखील चांगली गोष्ट आहे. पण, सुट्टी घेऊ शकत नसाल तर या टिप्स फॉलो करून बघा. कदाचित तुमच्या मूडमध्ये फरक पडेल आणि तुम्हाला काम करण्याचा उत्साह येईल.

काम करू नये असं का वाटतं यावर थोडा विचार करा. आज एकच दिवस तुम्हाला हा अनुभव येतोय की ठराविक दिवसाच्या अंतराने तुम्हाला तोच तोच अनुभव येतोय याचंही थोडं निरीक्षण करा. तुम्हाला खरंच थकवा जाणवतोय की तुमच्या कामाच्या ठिकाणामुळे तुमच्यात ही अनास्था निर्माण झाली आहे, याची पडताळणी करू पहा.

सकाळच्या वेळी व्यायाम - झोप पूर्ण न झाल्याने तुम्हाला थकवा आला असेल आणि म्हणून तुम्हाला काम करण्याची इच्छा होत नसेल तर थोडा व्यायाम करा. शरीराला थोडी चालना द्या. थोडं फिरून या, सायकलिंग करा, किंवा जे तुम्हाला आवडेल ते ज्यामुळे शरीराची हालचाल होईल. शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग वाढला की आपला उत्साहदेखील वाढतो. यामुळे नक्कीच तुमच्या मूडमध्ये फरक पडेल.

व्यायामामुळे तुमची एनर्जी वाढते, एकाग्र होण्याची क्षमता सुधारते त्यामुळे तुम्ही तुमचं काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल.

जागा बदलून पहा –

शक्य असल्यास तुमची ऑफिसमधील जागा, टेबल बदलून पहा. आजूबाजूचे वातावरण बदलल्याने तुम्हाला फ्रेश वाटू शकेल. घरातून काम करत असाल तर, तुमची रूम बदला. शक्य असल्यास एखाद्या दिवशी सीसीडीत बसून काम करून बघा. किंवा एखाद्या बागेत. जे तुमच्या सोयीचं असेल आणि जे तुम्हाला आवडेल तो बदल करून पहा. वातावरण बदलल्याने देखील तुमचा उत्साह परत येऊ शकतो.

सहज सोप्या गोष्टी आधी करा –

प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यापूर्वी सहज आणि सोप्या असतील अशा गोष्टी आधी करून घ्या. जसे की कालचं काही पेंडिंग काम आहे का, हे तपासणं, एखादी मिटिंग शेड्युल करणं, अशा सोप्या सोप्या गोष्टी करून झाल्या की मग हळूहळू तुमचं मन कामात लागेल आणि मग तुम्ही पुढील गोष्टी सहजपणे करू शकाल.

थोडा ब्रेक घ्या –

एकसारखं काम करण्यानं थकवा येतोच. त्यात तुमचं काम जर बैठ्या स्वरूपाचं असेल तर आणखीनच कांटाळवाणं. म्हणून दर एक-दोन तासांनी खुर्चीतून उठा आणि थोडा फेरफटका मारा. चालत-फिरत राहिल्यानं कंटाळा निघून जातो. अगदीच अशक्य असेल तर बसल्या जागी काही स्ट्रेचिंग किंवा दीर्घ श्वसनाचे प्रयोग करू शकता. ज्यामुळे तुमच्या मेंदूला आणि मनाला थोडी विश्रांती मिळेल.

तुमच्या दैनंदिनीत काही बदल करणे शक्य आहे का पहा –

सतत थकवा वाटत असल्यास तुमचा ब्रेकफास्ट बदलून पहा. ब्रेकफास्टमध्ये अधिक पौष्टिक आणि चांगला आहार घेण्यावर भर द्या. तुमचे रुटीन चेंज करून त्यात काही नाविन्य आणणे शक्य आहे का ते पहा. रोजच्या त्याच त्याचपद्धतीच्या कामातून थोडा विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा – तुम्ही काम करण्यामागे काही तरी निश्चित हेतू असला पाहिजे. कधीकधी आपण आपल्या मूळ उद्देशापासून भरकटतो. तुमचे ध्येय काय आहे? हातात घेतलेले काम पूर्ण केल्याने तुमचा काय फायदा होणार आहे? ते आठवा. यामुळे तुमचे मन कामात लागेल. मनात आलेले इतर विचार झटकून तुम्ही स्वतःला कामात गुंतवाल आणि जास्त फोकस ठेवून काम कराल. हाती घेतलेले काम पूर्ण झाल्यावर स्वतःला छोटेसे बक्षीस द्या. त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच समाधान मिळेल.

एखादी सुट्टी घ्या आणि फिरून या – रुटीन बदलण्यासाठी हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. ज्यामुळे तुम्ही आलेला थकवा घालवू शकाल. सुट्टीवरून परत आल्यावर तुम्ही नव्या उत्साहाने कामाला लागला. यामुळे तुमची एनर्जी लेवल देखील भरून निघेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मन प्रफुल्लीत आणि प्रसन्न राहते.

काम बदला – कोणतेही पर्याय वापरले तरी तुम्हाला काम करूच नये असं वाटत असेल तर काम बदला. कामाचे ठिकाण बदला. दुसरीकडे प्रयत्न करणार असाल तर करून पहा. कधीकधी आजूबाजूचे वातावरण इतके त्रासदायक असते की, कितीही प्रयत्न केले तरी अशा वातावरणात आपण काम करू शकत नाही. तुम्हाला जर योग्य वाटत असेल आणि दुसरी संधी मिळत असेल तर नोकरी बदलायलाही हरकत नाही.

आरोग्य तपासणी करून घ्या – सततच्या थकव्याचे कारण अनेकदा काही शारीरिक व्याधींचे लक्षण असू शकते. अशावेळी स्वतःची संपूर्ण आरोग्य तपासणी केलेली बरी पडेल. शिवाय गरज असल्यास समुपदेशकांचीही मदत घ्या. अतिरिक्त ताण, चिंता, औदासिन्य, नैराश्य अशा मानसिक स्थितीतही आपण कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.

कामाचा कंटाळा तर सर्वांनाच येतो पण तुम्हाला जर सततच असा कंटाळा येत असेल किंवा सततच कामात लक्ष लागत नसेल, काम करू वाटत नसेल तर यामागे नक्कीच काही ना काही शारीरिक किंवा मानसिक कारण असू शकते. तेव्हा वेळ न दवडता मदत घ्या.  

 

 

 

 

 

Post a Comment

1 Comments

Anonymous said…
खूप छान टिप्स