तणाव तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यासोबतच तुमच्या आनंदाचाही बळी घेऊ शकतो.


दररोज आपण कितीतरी गोष्टी हाताळत असतो. घरची बाहेरची ऑफिसची दैनंदिन कामं करत असताना आपल्याला सतत काही विचार करावा लागतो, निर्णय घ्यावे लागतात, कुटुंबीय, ऑफिस कलीग यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यांची मदत घ्यावी लागते. कधी त्यांना मदत करावी लागते. या सगळ्या गोष्टी नेहमीच अगदी सुरळीत होतात असं नाही. कधी कधी यात काही उन्नीस-बीस होत राहतं. कधी घरच्यांशी खटकतं, कधी ऑफिसमध्ये तर कधी अगदी प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तीसोबत. आपल्याला यावर एक तर काही कृती करावी लागते किंवा आजूबाजूला काय घडतंय यावर सतत लक्ष ठेवून असावं लागतं. यातूनच निर्माण होतो तणाव.



हा तणाव जर प्रमाणाबाहेर जायला लागला तर मात्र त्याचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम दिसायला लागतात. सरळसध्या आयुष्यावरही हा तणाव वाईट परिणाम घडवून आणतो. आपण सतत तणावात असतो किंवा तणाव आपल्यावर हावी होत आहे, हे ओळखायचं कसं पण?

 

आपण तणावात आहोत हे आपल्याला त्या-त्या क्षणी जाणवतंच पण हा तणाव निवळला गेला की साचून राहिला हे कसं ओळखायचं? वाढलेल्या अतिरीक्त तणावाची काही लक्षणे आहेत. जी आपल्या मानसिकतेतून, शारीरिक व्याधीतून आणि भावनिक असमतोल यातून ओळखता येतात. 

तणावाची लक्षणे –

१.       मूड बदलणे

२.       हाताच्या तळव्यांना पाणी सुटणे, थंड पडणे.

३.       लैंगिक इच्छा कमी होणे.

४.       अपचन किंवा अतिसार होणे.

५.       झोप न येणे किंवा पुरेशी गाढ झोप न लागणे

६.       सतत थकवा किंवा पेंग येणे.

७.       चिडचिड होणे

८.       वरचेवर आजारी पडणे

९.       डोकेदुखी

१०.    दात खाण्याची सवय

११.    थकवा जाणवणे.

१२.    विशेषत: मान आणि खांद्याचे स्नायू दुखणे.

१३.    शारीरिक वेदना, हातपाय दुखणे.

१४.    हृदयाचे ठोके वाढणे.

१५.    शरीर कंप पावणे.



 

ही सगळी किंवा यापैकी कोणते ना कोणते लक्षण तुम्हीही कधी अनुभवले असेलच.  बरेचदा आपण तणावाकडे दुर्लक्ष करतो किंवा आलेले प्रेशर निभावून नेऊ अशा अविर्भावात आपण टाळत राहतो. पण, त्याचे नेमके काय परिणाम होतात हे आपल्याला दिसत नाही. तणाव रोजच्या आयुष्यात असतो पण तो फारसा जाणवत नाही. कधीकधी तो अचानक वाढतो आणि मग मात्र आपण भांबावून जातो. आपल्याला तणाव आहे आणि तो आपल्याला हाताळता येत नाही हे कसं ओळखायचं मग?

तणाव नेहमीच ओळखता येतो असं नाही. परंतु, याची काही लक्षणं आपल्याला जाणवतात. घर, शाळा, मित्र यांच्यासोबत वावरत असताना आलेला तणाव देखील आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्रभावित करू शकतो. पुढील काही गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिल्यास तुम्हाला अतिरिक्त तणाव आलेला नाही न याची तुम्ही खात्री करू सक्त.

१.       मानसिक लक्षणे – एकाग्रता कमी होणे, चिंता वाढणे, चिडचिड होणे आणि गोष्टी आठवता न येणे किंवा विसरून जाणे.

२.       भावनिक लक्षणे – राग येणे, चिडणे, मूड बदलत राहणे, निराश वाटणे

३.       शारीरिक लक्षणे – उच्च रक्तदाब, वजन वाढणे किंवा कमी होणे, सतत आजारी पडणे, सर्दी होणे, मासिक पाळीचे चक्र विस्कळीत होणे, कामभावना कमी होणे.

४.       वर्तनातील लक्षणे – स्वतःची योग्य ती काळजी घेतली न जाणे, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींना वेळ देता ण येणे, मद्यपान किंवा व्यसनाच्या आहारी जाणे.

 

बरेचदा चिंता आणि तणाव या दोन्ही गोष्टी एकच अशा गृहीत धरल्या जातात. अत्याधिक प्रमाणात तणाव आल्याने चिंता वाढते हे खरं आहे. चिंता वाढल्यावर आपल्याला तणाव हाताळणे आणखीन कठीण जाते. तणाव वाढल्याने इतरही समस्या निर्माण होतात. यातून कदाचित नैराश्य, औदासिन्य, असे मानसिक आजार आणि पोटदुखी, अपचन अशा शारीरिक समस्या निर्माण होतात.

तणावाचे कारण बरेचदा बाह्य परिस्थितीत दडलेले असते तर चिंता ही आपण या परिस्थितीला कसे सामोरे जातो यातून निर्माण होते. मूळ परिस्थिती निवळल्यावर तणाव निवळू शकतो मात्र चिंतातूर वृत्ती तशीच राहते.

तणावाचे चार प्रमुख प्रकार आहेत.

१.       तीव्र तणाव – या प्रकारचा तणाव हा फार कमी वेळेसाठी राहतो. फार फार तर महिनाभर. पण, परिस्थिती पूर्ववत झाली की तुम्हाला तणाव जाणवत नाही कारण तो बाह्य परिस्थितीतून निर्माण झालेला असतो. या प्रकारचा तणाव आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा अनुभवतो.

२.       गंभीर तणाव- गंभीर तणाव हा असा प्रकार आहे जो परिस्थितीमुळे निर्माण होत असला तरी परिस्थितीसोबत संपत नाही. बरेचदा परिस्थितीच अशी असते की त्यामुळे आपण सतत तणावात राहतो. उदा. जोडीदाराशी न पटणे, किंवा कौटुंबिक कलह, ऑफिसमधील कामाची न आवडणारी पद्धत किंवा जोखमीचे काम. अशा परिस्थितीमुळे निर्माण होणारा तणाव हा दीर्घकाळ राहतो, बरेचदा याची इतकी सवय होऊन जाते की, तणाव हाच आपल्या आयुष्याचा भाग बनून जातो. मग त्यासोबत येणारे इतर परिणामही आहेतच.

३.       ठराविक कालांतराने जाणवणारा तीव्र तणाव – याला एपिसोडिक स्ट्रेसही म्हटले जाते. कारण, हा तणाव ठराविक अंतराच्या कालावधीने पुन्हा पुन्हा जाणवत राहतो. यामुळे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतेच पण आयुष्य अधिकच निराश आणि हताश वाटू लागते.

४.       युस्ट्रेस – हा सकारात्मक तणाव आहे. एखादा प्रोजेक्ट पूर्ण करताना आपण उत्साहात असतो. दडपण असले तरी त्याचा दबाव न घेता आपण कामातील आनंद घेण्यावर फोकस करतो. शरीरातील अॅड्रेनालिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कामात अतिउत्साह किंवा जोश जाणवतो.

 

तणावामुळे कधी कधी दैनंदिन कामे हाताळणेही अवघड होऊन जाते. याचा तुमच्या नातेसंबंधावर तर परिणाम होतोच. पण तुमच्या आरोग्याला याची जास्त किंमत मोजावी लागू शकते.

पैसा, नातेसंबंध, किंवा नावडती परिस्थिती अशा कारणाने येणारा तणाव हा आरोग्यासाठी घातक ठरतो. तर कधी कधी शारीरिक व्याधी देखील मानसिक तणावाला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे आपण आपले मानसिक स्वास्थ्य हरवू शकतो. तुमच्या मेंदूवर जेव्हा अतिरिक्त ताण येतो तेव्हा तुमचे शरीरही त्याच पद्धतीने रीअॅक्ट करते.

तुम्ही अतिरिक्त तणावाखाली असाल अशा वेळी आलेली एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा एखाद्याशी झालेली शा‍ब्दिक चकमक देखील हृद्यविकारामध्ये परावर्तीत होण्यास पुरेशी आहे. सततच्या अतिरिक्त तणावामुळे नैराश्य, औदासिन्य किंवा सततचा थकवा अशा मानसिक विकारांना आमंत्रण मिळते.

शिवाय तणावाचे शरीरावर होणारे परिणामही फार घातक असू शकतात.

मधुमेह

उच्चरक्तदाब

हृदयरोग

केसगळती

लठ्ठपणा

आतड्यातील जखमा

अशा अनेक गंभीर शारीरिक आजारांमागे अतिरिक्त मानसिक तणाव कारणीभूत असू शकतो.

कोणत्याही वैद्यकीय चाचणीत तणावाचे निदान होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यावर एक निश्चित उपचार प्रणाली किंवा औषधोपचारही अस्तित्वात नाही. या ताणतणावाची लक्षणे ओळखून वेळीच त्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.  

यासाठी मानसोपचारात दोन पद्धती अवलंबल्या जातात एक म्हणजे सीबीटी (cognitive behavioral therapy (CBT)) आणि दुसरी म्हणजे तणाव कमी करण्यासाठी जागृतीपूर्वक प्रयत्न करणे (mindfulness-based stress reduction (MBSR)). सीबीटीमध्ये लोकांना नकारात्मक विचार करण्याची पद्धत ओळखण्यास शिकवली जाते तर एमबीएसआर मध्ये मेडिटेशण आणि जागरूकता याद्वारे तणाव हलका करण्याचा प्रयत्न केला जातो.

याशिवाय, योगा, मसाज, अरोमाथेरपी आणि अक्यूपंक्चर यांचाही वापर केला जातो.

अर्थात या थेरपीज त्यात्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीकडूनच घेतल्या पाहिजेत.

तणाव दूर ठेवून दररोजच्या आयुष्याशी तडजोड करणे प्रत्येकालाच जमेल असं नाही. पण, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असलं पाहिजे. मानसिक आरोग्याला प्राथमिक प्रध्यान देऊन त्यानुसार आपल्या दैनंदिनीत बदल करणे आवश्यक आहे. या गोष्टी स्वतःच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहेत.  

 

 

 

Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing