तणाव हाताळण्याच्या काही प्रभावी पद्धती!

दररोजच्या थकवा आणणाऱ्या रुटीन कामापासून ते अचानक उभ्या राहिलेल्या एखाद्या संकटामुळे आपल्याला तणाव जाणवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामे अशी असतात ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकवा येतो. हा थकवा किंवा हा तणाव कमी करण्यासाठी आवर्जून वेळ दिला नाही तर तो वाढत जातो आणि एखाद्या दिवशी याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.  आपण नेहमीच बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण मनस्थिती जर नीट हाताळता आली तर येणारा तणाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शारीरिक-मानसिक गुंतागुंत आपण नक्कीच टाळू शकतो. तणाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. अतिरिक्त तणावामुळे तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीवरील ताण  हलका करणं खूपच गरजेचं आहे.



या लेखात आपण तणाव हाताळण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचा आनंद घेऊ शकाल आणि तणावाच्या गंभीर परिणामापासून स्वतःला दूर ठेऊ शकाल. आता तणाव निवळण्यासाठी प्रत्येकाला एकच मात्रा लागू होईल असे नाही. प्रत्येकाला येणाऱ्या तणावाचे कारण आणि त्याची तीव्रता भिन्न असू शकते. शिवाय, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीत आनंद मिळतो त्यामुळे तणाव दूर करण्यासाठीही प्रत्येकाला ज्याची त्याची एक पद्धत किंवा अनेक पद्धती निवडाव्या लागतील.

कल्पनाविलास – कल्पना करणे ही मानवाला मिळालेली एक दैवी देणगी आहे. पण बरेचदा याचा वापर सकारात्मक पद्धतीने होण्याऐवजी नकारात्मक पद्धतीने होतो आणि तणावात आणखी भर पडते. तणाव निवळण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या या कौशल्याचा तुम्ही सकारात्मक पद्धतीने वापर केला पाहिजे. यासाठी दिवसातील एक निवांत वेळ निवडा आणि फक्त पाच मिनिटे डोळे बंद करून बसा. आता मनातल्या मनात तुम्ही एक छोटीशी ट्रीप एंजॉय करायची आहे. डोळे मिटल्यानंतर तुम्ही अशी कल्पना करा की, तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी पोहोचलेला आहात. मग ते ठिकाण म्हणजे एखादं बीच असेल, जंगल असेल किंवा तुमचा आवडता ट्रेकिंग पॉइंट असेल. मनाने तुम्ही त्या जागी पोहोचला आहात. उदा. तुम्ही समुद्राकाठी असाल तर तुम्हाला समुद्राच्या उसळत्या लाटा दिसताहेत, त्या लाटांचा फेसाळणारा आवाज ऐकू येतो आहे, समुद्रावरची दमट हवा तुमच्या शरीराला स्पर्शून जात आहे. नजर जाईल तिथवर तुम्हाला पाणीच पाणी दिसत आहे. तुम्ही वाळूत उभे आहात. येणाऱ्या लाटा तुमच्या पायाला स्पर्श करत आहेत. तुमचे पाय वाळूत रुतले आहेत. यासाठी तुम्ही समुद्राची गाज ऐकू येईल अशा संगीताचीही मदत घेऊ शकता. ज्यामुळे तुमची ही छोटीशी काल्पनिक ट्रीप जास्त खरी वाटेल.



ध्यानधारणा – ध्यान केल्याने तुम्हाला तत्काळ तणाव निवळल्याचा तर फील येईलच पण, याचे काही दीर्घकालीन फायदेही आहेत. ज्यामुळे तुम्हाला ताणतणावाचे नियोजन करण्यास मदत होईल. मेडीटेशनचेही अनेक प्रकार आहेत. तुम्हाला जो प्रकार योग्य वाटेल, रुचेल, पटेल तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. मेडिटेशनसाठी फार वेळ द्यावा लागतो असेही नाही. यासाठी तुम्ही एखादा सोपा सुटसुटीत मंत्र निवडू शकता किंवा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करूनही ध्यान करू शकता.

स्नायू शिथिलीकरण – यामध्ये स्नायूंवरील ताण कमी करून त्यांना रिलॅक्स करणे अपेक्षित आहे. यासाठी थोडा वेळ झोपून राहा. आधी मनाला रिलॅक्स करा. त्यासाठी सुरुवातीला पाच वेळा खोल श्वासोच्छवास करा. मग कपाळावरील स्नायूंना तणाव द्या आणि रिलॅक्स करा. याच पद्धतीने एकेक अवयव ताणून पुन्हा रिलॅक्स करा. यामुळे मन आणि शरीर दोन्हीवरील ताण हलका होईल.

व्यायाम किंवा चालणे –

काही मिनिटांसाठी चालणे किंवा व्यायाम केल्यानेही मन आणि शरीर दोन्ही तणावमुक्त होत. थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरून आल्याने तुम्हाला रिलॅक्स वाटेल. ऑफिस सुटल्यावर जवळच्या एखाद्या बागेत फेरफटका मारल्यानेही तुमचा तणाव निवळू शकतो. किंवा घरातल्या घरात तुम्हाला आवडेल असा व्यायाम करू शकता. झुम्बा, एरोबिक्स, योगा, प्राणायाम असे तुमच्या आवडीचे प्रकार निवडून तुम्ही तणाव हलका करू शकता. ज्याचा फायदा तुमच्या शरीरासोबतच मनालाही होईल.

श्वसनक्रियेवर लक्ष केंद्रित करा

आपल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष दिल्याने किंवा श्वासोच्छवासात काही काळासाठी बदल केल्याने तुम्ही कमी वेळेत तणाव मुक्त व्हाल. यासाठी फक्त नाकपुडीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आत जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा उच्छवास यातील फरक जाणवेल. कधी श्वासोच्छवास संथ तर कधी जलद गतीने करून पहा यामुळेही तुम्हाला रिलॅक्स वाटेल. यामुळे मन आणि मेंदू दोन्ही फ्रेश होतील. विशेषत: कामाच्या ठिकाणी ही क्रिया तुम्ही आवर्जून वापरू शकता. थोड्याशा सरावाने तुम्हाला याची सहज सवय होईल.

तुमच्या आवडत्या छंदासाठी वेळ द्या – छंद जोपासणे हा तणाव दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. दिवसातील काही वेळ तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी राखीव ठेवा. यामुळे तुम्ही तणाव मुक्त तर व्हालच पण तुमच्यातील सर्जनशीलताही जिवंत राहील.

अगदी आरोगामीपासून फक्त चित्र रंगवण्यापर्यंत तुमचे छंद काहीही असू शकतात. जे आवडते ते मनापासून केल्याने मनाला एक नवी ऊर्जा मिळते. छंद जोपासणाऱ्या व्यक्ति नेहमी आनंदी आणि उत्साही असतात.

 

व्यायाम करणे, आवडीचे छंद जोपासणे आणि ध्यान करणे या गोष्टी जर तुमच्या दिनचर्येच्या भाग बनल्या तर नक्कीच तुम्ही दीर्घकाळ तणाव हाताळण्यास सक्षम व्हाल. एखाद्या अवघड प्रसंगीही तुमची निर्णय क्षमता आणि प्रसंगावधान शाबूत राहील. सकारात्मक पद्धतीने तणाव हाताळण्यास सक्षम व्हाल.

या शिवाय, तुमचा दैनंदिन आहार हा पोषक आणि चौरस असेल याकडेही लक्ष द्या. ताणतणाव आणि आहार यांचा फार जवळचा संबंध आहे. एखादा पदार्थ खाल्ल्याने तात्पुरते बरे वाटेल पण, नंतर त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात. सतत कोल्ड्रिंक्स, फास्ट फुड अशा आहाराने तत्कालीन समाधान मिळत असले तरी शरीराला त्याची किंमत मोजावी लागते. म्हणूनच आहार हा चौरस आणि पोषक असावा.

चांगल्या सवयी आत्मसात करण्यापूर्वी वाईट सवयी सोडाव्या लागतात. म्हणूनच जास्त काळ मोबाईल आणि सोशल मिडिया वापरणे, टीव्ही पाहणे, रात्री उशिरा पर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे, अशा नकारात्मक सवयी बदलाव्या लागतील. मद्यपान, सिगारेट अशी व्यसने तत्काळ आराम देत असली तरी त्याचा परिणाम खिशाला आणि शरीरालाही भोगावा लागतो. म्हणून अशा वाईट सवयींपासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करा.

 

तणाव दूर करण्यासाठी तुम्हाला यातील कोणता प्रकार आत्मसात करायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. याशिवाय तुमच्या अशा काही खास टेक्निक्स असतील तर त्या शेअर करायला विसरू नका.

 

Post a Comment

0 Comments