सात्विक कॉफी

दिवस पहिला


आज आईला अस्वस्थ वाटत होतं. भावासाठी नाष्टा घेऊन जाता जाताच ती खाली कोसळली. 


दिवस दुसरा


आज आई शुन्यात नजर लावून बसले. तिला काही तरी बोलायचं आहे बहुतेक. आता घाई आहे. जावं लागेल. आधीच तिच्या आजारपणात भरपूर खाडे झालेत. संध्याकाळी बघू.


घरात कधी संध्याकाळ होतंच नाही. होते ती थेट रात्र. रात्रीचं जेवण उरकणं आणि मग आपापल्या जगात निवांत. आई शुन्यातून बाहेर आलेली दिसली. म्हणजे ठिक असावी.


दिवस चौथा


आज आई गेली. तिच्या पोस्टमार्टचं कारण‌ काय‌ पण? मरण्यास कारणं बरीच असतात.


दिवस आठवा/दहावा/कोणताही


आई आठवणीतून जात नव्हती. म्हटलं थोडा वेळ काढून सांत्वन करावं स्वतःचं. सीसीडीत जाऊन कॉफी घेतली. निवांत स्क्रोल करून काही रिल्स लाईक केले.


अर्धातास निवांत घालवण्यासाठी हजार-पाचशे घालवायला लागतात.


रम, व्हिस्कीनी दुःख हलकं झालं असतं. पण आईला ते पटलं नसतं. त्रास झाला असता. 


सात्विक आईसाठी सात्विक कॉफी. 


Image source: Yahoo!



बस्स आईसाठी इतकंच. हजार-पाचशे, निवांत अर्धा तास आणि सात्विक कॉफी.


©मेघश्री



Post a Comment

0 Comments