दोन मनं एक अंतर!
तिचे डोळे एकाच वेळी हसतातही
आणि उदासही होतात. जणू त्या डोळ्यांना क्षितीजपल्याड झेपावायचं असतं. पण जमत नाही.
वारंवार प्रयत्न करूनही! तरीही ती प्रयत्न सोडत नाही. जितके दूरपर्यंत नजर फेकता
येईल तिथपर्यंत ती जाण्याचा प्रयत्न करते. नजर आहे तोवर नजरेचा टप्पा संपणार नाही
हे माहित असूनही. आपल्याच नजरेच्या विळख्यात गढून गेलीये ती.
मागे एकदा कधीतरी ती म्हणाली
होती की आता एक माणूस हवंय....
ती माणसात रमणारी नव्हे आणि
तरीही तिला मित्र का हवा होता? आजूबाजूला कित्येक लोक असतात. त्यांच्याशी हसावं,
बोलावं हे एक वर्तन व्यवहार म्हणून ठीक आहे. पण.... काही गोष्टी जुळत नसतात. कधीच
जुळत नसतात.
पूर्वीही ती अनेकदा हे बोलली
आहे. तिचं हे मागणं तरी खरं कि खोटं हेही कळत नाही.
तिच्या सोबत असले तरी आपण
तिच्यात नाही... हे मला फार वेळा जाणवलेलं आहे. कधीकधी वाटतं तिच्या-माझ्यातील हे
अंतर फार बरं आहे. त्यामुळे मला तिच्या झळा सोसाव्या लागत नाहीत.
हल्ली बरेचदा तिच्यातील
अधुरेपणाची जाणीव गडद होत जाते. इतकी की ती मलाही जाणवावी. मला नेहमी वाटतं ती
स्वतःला हरवत चालली आहे.
एकदा तिला विचारलंच कसा मित्र हवा तुला. (माझ्यासारखा हे
तिचं उत्तर नसावं, असं फार आतून वाटत होतं. झेपलंच नसतं ते मला.) आम्ही एकत्र चहा
घेतो, फिरायला जातो, दिवसातल्या सगळ्या
शहाण्या-अल्लड-मूर्ख-धूर्त अनुभवांवर, हसतो हे खरं असलं तरी मला ती
आणि तिला मी पूर्णपणे नको आहोत. आम्ही फक्त आमच्यातील अर्धा अर्धा हिस्सा
एकमेकांसोबत वाटून घेतलाय. यात ‘अंतर’ आहे आणि ते आहे म्हणून आम्ही आहोत.
पूर्वी कधीच हे विचारण्याचं
धाडस मी केलं नव्हतं. गरजही वाटली नाही. पण, आता मात्र अगदी
नकळतपणे माझ्या तोंडून हा प्रश्न गेलाच. खरं तर नेहमी जसं ती काही प्रश्न टाळते
तसंच याही वेळेला तिने ते टाळलं असतं तर बरं झालं असतं. पण ती बोलली. ती बोलली आणि
कळलं की तिच्या-माझ्यात केवळ अंतर नाही तर एक प्रचंड मोठी पोकळी आहे. ज्यात सगळं
विश्व जरी सामावलं तरी ती भरून निघणार नाही....
आता ती जे म्हणाली ते ऐकवतो, “मला मित्र हवाय.
जो मला फक्त कॉफी किंवा चहासाठी नाही बोलावणार. तो म्हणेल आज आपण मिळून एखादं
पुस्तक वाचू. मग आम्ही एकच पुस्तक वाचताना एकाच वेळी एकेक पान पालटत जाऊ. न त्याला
पुढे जाण्याची घाई, ना मला मागे रेंगाळण्याची हौस. एकेका शब्दाचे अर्थ शोधू. त्या
अर्थात दिसतील आम्हाला आमच्या आत्म्याच्या सावल्या. आम्ही त्यात अर्थाचे रंग भरू.
तो रंग विटेपर्यंत नवे अर्थ, नवे रंग शोधत राहू. पुस्तक संपलं तरी आमचं अर्थ शोधणं
संपणार नाही. नव्या पुस्तकासोबत आम्ही नव्या जगात प्रवेश करू. तिथे कदाचित रंग
नाही सापडणार किंवा अर्थही. पण, आमच्या सोबत असण्यालाच एक अर्थ आलेला असेल....
तिच्या पासूनच हे अंतर मला का
प्रिय आहे ते मला तेव्हा उमगलं. तिच्या अवकाशात आपल्याला शिरायचंच नाही पण ते अंतर
जपायचं आहे. देव तिचं भलं करो. असं म्हणत असलो तरी, देव खरंच अशा
लोकांचं भलं करतो का? मला थोडी शंका आहे..!
Comments