असुरक्षित मातृत्वाच्या व्यथित कथा..!

प्रसंग – १

माझं सिझेरियन झाल्यानंतर मला एका मोठ्या हॉलसारख्या ठिकाणी ठेवलेल्या बेडवर आणून टाकलं. हो अक्षरश: ‘टाकलं’ हाच शब्दप्रयोग इथे चपखल बसतो. जसं आपण केळीची सालं डस्टबिनमध्ये टाकतो. कारण, केळ खाल्ल्यानंतर तिच्याशी आपलं काही देणं घेणं नसतं. खरं तर सुरक्षित सिझेरियन करून सीपीआरच्या त्या डॉक्टरनी एकप्रकारे उपकारच केले होते.

चित्र स्रोत: गुगल


खरंच इतकी विदारक, असुविधाजनक, असुरक्षित परिस्थिती आपल्याच नशिबी असावी का असा विचार करत करत अर्धवट शुद्धीत ती रात्र तशीच काढली. दुसऱ्या दिवशी भूल उतरली आणि मी पूर्ण शुद्धीत आले. स्वतःच्या परिस्थितीची फारच कीव वाटत होती. मी उठून बसण्याचा प्रयत्न केला. उठून बसल्यावर जे दिसलं ते जास्त शुद्धीवर आणणारं होतं. समोरच्या बेडवर एक पेशंट होती जिचं पहाटे-पहाटे सिझेरियन झालं होतं. दुसरी मुलगीच झाली म्हणून ती प्रचंड नाराज होती. दोन-तीन तास होत आले तरी तिनं मुलीला जवळ घेतलं नव्हतं, की तिला दूध पाजलं नव्हतं. तिच्या सासरचं कुणीही माणूस दवाखान्यात फिरकलं नव्हतं. तिच्यासोबत तिची कुणीतरी मावशी होती, ती कितीदा तिची समजूत काढत होती. मुलीला पाजण्यासाठी. भुकेनं व्याकूळ झालेला तो कोवळा निष्पाप जीव रडून रडूनच झोपून गेला. त्याची काय चूक? पण, दुसरीही मुलगीच झाली, आता सासरी कोणीही किंमत देणार नाही या भीतीनं ती आई स्वतःही रडत होती.

मला दुसरा मुलगा झाला होता. त्याला मी लाडानं उचलून घेतलं. मुके घेतले. त्याला फ्रेश केलं कपडे बदलले दूध पाजलं आणि झोपवून मी पण झोपी गेले. सिझेरियनच्या टाक्याच्या वेदना इतक्या होत्या की, त्यापुढे त्या उपाशी बाळाचं आणि तिच्या आईचं रडणं मी सहज दुर्लक्षित केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धवट जागेत असताना मी बघितलं की, ती आई नाईलाजाने आपल्या मुलीला पाजत होती.  

दुपारी एक विशीतली बाई कानाला मफलर बांधून माझ्या बेडसमोरून येरझाऱ्या घालत होती. तिला मी विचारलं तुम्हाला काय झालंय? माझ्या विचारण्यात एक छुपा शब्द दडला होता... मुलगा की मुलगी? तिनं मला काहीच उत्तर दिलं नाही. ती तशाच फेऱ्या मारत राहिली. मी उठले. बाळाला पाजलं. त्याला फ्रेश केलं झोपवलं आणि मी पण झोपले. नंतर मला कळालं की, त्या फेऱ्या मारणाऱ्या मुलीला स्वतःलाच माहित नव्हतं की तिला मुलगा झाला होता की मुलगी... पाहिलटकरीण होती. अपुऱ्या दिवसातच कळा सुरू झाल्या. योग्य वेळी दवाखान्यात न पोचल्यामुळं तिचं बाळ गुदमरून  मेलं होतं.

स्वतःच्या नशिबाला कोसणं बंद करून मी आहे त्या परिस्थितीशी तोंड द्यायला तयार झाले. कारण, नशिबाला कोसायला माझ्याकडे तोंडच नव्हतं. तिथल्या इतर बायकांशी तुलना करता एकतर माझी डिलिव्हरी सुखरूप झाली होती. मी आणि बाळ दोघेही सुखरूप होतो.

 

प्रसंग २रा

पलिकडच्या गल्लीतील एक पोरगी पहिल्याच बाळंतपणासाठी माहेरी आली होती. माहेर आणि सासर यात तिच्यासाठी फारसा फरक नव्हता. कारण, इकडे सावत्र आई आणि तिकडे सासू. ज्या वयात इतर पोरी फॅशनेबल स्टायलीश, बो, कानातले, बांगड्या, पर्स सापडत नाही म्हणून टेन्शनमध्ये असतात, त्या वयात ही पोटात एका जीवाचं ओझं वागवत होती. नवव्या महिन्यापर्यंत सगळं काही ठीक होतं. डिलिव्हरीची तारीख जवळ आली आणि हिला अचानक फिट आली. वेळेत दवाखान्यात नेता न आल्यानं बाळासह तिचाही जीव गेला.

 

प्रसंग ३ –

पहिली मुलगी होती. किमान दुसऱ्या वेळी तरी वंशाला दिवा हवा हा सासूचा आणि नवऱ्याचा हट्ट. सरकारी कायद्यामुळे गर्भलिंगनिदान करणं शक्य नव्हतं. इथं तिथं हातापायापडून कसं तरी त्याबद्दल माहिती मिळवली. तर, दुसरा गर्भही मुलीचाच. कायदेशीर गर्भपात करावा तर, कायद्याचा धाक. डॉक्टर आणि घराचे दोघांनाही. अशातच तिचे दिवस भरत आले. सातवा महिना संपत आला तरी, गर्भपात करून देणारा कुणी डॉक्टर भेटला नाही आणि उलटल्यानं आता गर्भपात शक्यही नव्हतं. तर घरच्यांच्या डोक्यात कल्पना आली की, घराच्या घरीच मोकळी करू. आणि त्यांनी काही क्रूर प्रयोग केले. या प्रयोगात बाळासह तिचाही जीव गेला.

 

प्रसंग ४ –

वीस वर्षाच्या सरीला आता दोन मुलं आहेत. पाहिलं मुल झालं तेव्हा ती फक्त पंधरा वर्षांची होती. दोन्ही मुलं कुपोषित. कारण, आईचीच वाढ झालेली नसताना मुलांची वाढ कुठून होणार?

 

हे सगळे प्रसंग आठवण्याचं कारण म्हणजे पुढच्या पंधरा दिवसात आपण राष्ट्रीय मातृत्व सुरक्षा दिन साजरा करणार आहोत. शहरातील फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये आता काही इव्हेंट होतील. आईच्या महात्म्य सांगितलं जाईल. पण, आई आई होण्याआधीच कशी आणि का मरते? यावर विचार केला जाणार आहे का?

माता-बाल मृत्युचं प्रमाण कमी करण्यात यश आलेलं आहे हे आपण ऐकूच. पण, ते थांबलेलं नाही, हे छुपं वास्तव कधीतरी अधोरेखित होणार आहे का?

अंधश्रद्धा, पितृसत्ताक परंपरेचं वर्चस्व, स्त्रियांच्या आरोग्य समस्यांना मिळणारं दुय्यम प्राधान्य, याविषयी आपण बोलणार आहोत का?

जिथं पोहोचायला हव्यात तिथंपर्यंत पायाभूत सुविधा का पोहोचलेल्या नाहीत? हा प्रश्न आम्हाला कधी पडणार आहे का?

एकीकडे शहरातील चकचकीत आणि महागडे दवाखाने दुसरीकडे ती न परवडणारी खेड्यातील जनता. बेभरवशाची सरकारी आरोग्यसेवा, या सगळ्यातील अंतर कमी करण्याबद्दल आपण विचार करणार आहोत का?

वर लिहिलेला एकही प्रसंग काल्पनिक नाहीये. हे प्रसंग माझ्या एकटीच्या परिसरात घडलेले. त्या पलीकडचं वास्तव अजून काही वेगळं असू शकतं. दरवर्षी किती माता-बाल मृत्यू होतात याची आकडेवारी गुगल सांगेलच. हे वास्तव असताना आपण मातृत्व सुरक्षा दिन नेमका कुणासाठी आणि कशासाठी साजरा करणार आहोत?

दोन स्त्रियांनी भारताला ऑस्कर मिळवून दिला म्हणून गर्व बाळगताना, कित्येक स्त्रिया भारतात केवळ मुलभूत सुविधांच्या अभावानं मरतात हे वास्तव आपण डोळ्याआड करायला नकोय.   

मेघश्री.

 

 

 


Post a Comment

2 Comments

Anonymous said…
खूप छान
Unknown said…
खूप छान