कोलाज भाग दुसरा

हातातील साखळदंड रुतत होते. खरचटून मनगटाला जखमा झाल्या होत्या. एकाच ठिकाणी बंदिस्त राहून सुरुवातीला चिडचिड, नंतर अगतिकता आणि हताशता वाटू लागली, पण हळूहळू त्या बंदिस्तपणाची सवय झाली. इतकी सवय की, तिथून बाहेर पडण्याची कल्पनाही भितीदायक वाटू लागली. 
एका ठिकाणीच असं किती दिवस पडून राहणार? खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या एकाच तुकड्यावर किती दिवस समाधान मानणार? हवेची ‘एकच झुळूक’ त्यात दिवसाच्या वेळेनुसार तापमानात होणारे बदल एवढं सोडलं तर आयुष्यात नाविन्य असं काहीच नाही. 




बाहेर पडण्याचा विचार केला तर वाट दिसेलही. पण त्या अनोळखी वाटेचीच तर भिती वाटते. कसं असेल इथून बाहेर पडल्यावर दिसणारं जग? आणि खरंच ते ‘तो’ सांगतोय तसं असुरक्षित असेल तर...

तसंही इथं बंदिस्त राहून एक दिवस मरणारच आहेस... आणि बाहेरचं जग असुरक्षित असलं तर तिथंही मरणारच आहेस... दोन्हीकडेही मृत्यू हा आहेच... पण न जाणो बाहेर पडल्यावर मरण्यापूर्वी ‘जगण्याची संधी’ मिळेल.

हा दुसरा आवाज... पण हा इतका क्षीण असतो की, त्याचं ऐकावं वाटत नाही...त्यात दम असत नाही... ना जरब आणि जबरदस्ती असते... ऐकलं तर ऐक नाही तर राहूदे असा एक विचित्र अलिप्तपणा असतो त्यात...

तरीही,
‘जगण्याची संधी’ हे शब्द ऐकल्यावर तिचे डोळे चमकले आणि हातातील साखळदंडाकडे पाहून ती मोठ्याने हसली.
पण, ती तोडायची कशी.. ‘त्याला’ कळलं तर... तो शोधत येईल आणि ठेचून टाकेल जिथं असू तिथंच...

असं काहीही होणार नाही... फक्त एकदा तोडून बघ... स्वतःला संधी दे... भीतीचा राक्षस फक्त मनात असतो, त्याला आतच मारून टाकायचं...

मनातील या द्वंद्वात नेमकं कुणाचं ऐकायचं? हा प्रश्न सुटत नव्हता.

इतक्यात तिला आणखी एक आवाज आला... खाडकन कानाखाली आवाज काढल्याचा आवाज...

पोराने मोठ्याने भोकाड पसरलं आणि तो राक्षस त्याच्यावर अजूनच खेकसत होता... रडू नको म्हणून


आता खरंच इथून मुक्त होणं फार फार गरजेचं आहे. रस्ता ओळखीचा असो की, अनोळखी... खरी गरज आहे ती इथून निसटण्याची... 

पुन्हा एक प्रवास... पुन्हा एक धाकधूक... एक नवी अनिश्चितता... एक नवा डाव...


क्रमशः 

Post a Comment

0 Comments