कोलाज

खिडकीतून बाहेर पाहिलं तर फक्त रणरण ऊन दिसत होतं. उन्हाच्या तडाख्यानं झाडं मलूल झालेली. ते दृश्य पाहून तिचंही मन कदाचित मलूल झालं होतं. ती नव्या जगाच्या शोधात निघाली होती. पण निर्धास्त मन नव्हतं. नव्या क्षणांवरही आपल्या आधीच अपशकुनी सावल्यांनी घर केलं असावं अशी धास्ती होती. मध्येच आपल्यातील ही विषण्णता झटकून तिने दीर्घ श्वास घेतला. बाजूला बसलेल्या मुलाचा हात हातात घेऊन घट्ट दाबला आणि त्याच्यावर ओठ टेकवले. ओल्या पापण्या मिटून शांत होण्याचा प्रयत्न केला.



तरीही मनातील द्वंद्व संपत नव्हतं. आतील धडधड थांबत नव्हती. मनात उठणाऱ्या प्रश्नांना ती कुठल्याच प्रकारे समाधानकारक उत्तरे देत नव्हती. होईल, बघू, अशा अर्धवट शक्यातांवर आधारलेली तिची उत्तरं तिलाच पटत नव्हती. तरीही अल्लडपणा न शोभणाऱ्या वयात तिला आणखी एक आंधळी कोशिंबीर खेळायची होती.

कशासाठी? तिलाही माहीत नव्हतं.

ऊन झेलणारी झाडं बघून तिला हसू येत होतं. या झाडांच्या जागी आपण असतो तर इतकं ऊन झेलून सावली देऊ शकलो असतो का? असा एक पोकळ अतिमानवी विचार स्पर्शून गेल्यावर तिचं तिलाच तिच्या मूर्खपणाचं हसूही आलं.

रस्ता पळत होता पण थांबण्याचं नाव घेत नव्हता. लांबलचक ऊन बघून बाजूला बसलेलं पोरही वैतागलं. ती त्याला मांडीवर घेऊन थोपटून झोपवण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्यालाही डोळे मिटण्याचं धाडस होत नव्हतं.

जणू अज्ञाताच्या कुतूहलानं दोघांचीही शांतता हिरावून घेतली होती. पण खरंच ही परिस्थिती ओढवून घेण्याची गरज होती का? स्वतःच्या आयुष्याचा पुन्हा एक जुगार खेळण्याची गरज होती का?

नाही आपण उगीच हा विचार करतोय. सगळं काही ठीक होईल. आता इथून पुढचे दिवस आपले असतील. मनात चुकचुकनाऱ्या पालीला झटकून तिने नव्या आशेवर विश्वास ठेवण्याचा पर्याय स्वीकारला. नवा रस्ता, नवी लोकं आणि नवं आयुष्य याचं एक सुरेख स्वप्न चितारण्याचा ती प्रयत्न करू लागली.

खरंच मनातील नकारात्मकता झटकली म्हणजे आयुष्यातील नकारात्मक घटना टाळता येतात. हे खरं असेल का? का हा सुद्धा मानवी मनाचा कल्पनाविलासच? भूतकाळातील चटके विसरून नव्या आयुष्याचं रंगवलेलं सुखी चित्र वास्तवात उतरू शकतं?

सुख पकडायला निघालेल्या मुठीत ते खरंच सामावतं का?

इतके प्रश्न का निर्माण व्हावे पण? कसलं लक्षण हे? स्वतःवरचा अविश्वास की नियतीवरचा?

तुम्हाला काय वाटतं? तिचं अस्वस्थ मन तिला कसला संकेत देतंय?


क्रमश:


Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing