पुस्तकांच्या प्रेमात पडायला लावणारं पुस्तक - आडवाटेची पुस्तकं – निखिलेश चित्रे!

आडवाटेची पुस्तकं – निखिलेश चित्रे


Image source Google


हे पुस्तक म्हणजे एका अस्सल वाचकाचा प्रवास. वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहिलेल्या या पुस्तकात चित्रे, मी का वाचतो? या प्रश्नाचं उत्तर देताना लिहितात, ‘वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकाच्या आत अनेक सूक्ष्म बदल घडत असतात.... पुस्तकं केवळ आनंदच देतात असं नाही, वेळप्रसंगी भक्कम आधारही देतात.’

आडवाटेची पुस्तकं हे पुस्तक वाचतानाही अगदी असाच अनुभव वाचकाला येतो. हे पुस्तक वाचताना पुस्तकाच्या दुनियेची एक अद्भुत सफर घडते. या पुस्तकात ज्या पुस्तकाबद्दल लिहिलंय त्यातलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही. पण, त्या पुस्तकांच्या गोष्टी, त्या लेखकांच्या गोष्टी, लेखकाचे पुस्तक अनुभव आणि ते मांडण्याची पद्धत हे सगळंच आपल्याला खिळवून ठेवतं. वाचक म्हणून आपण अजून किती बालिश आहोत, आपल्या प्रगतीला किती वाव आहे हेही कळतं. एखाद्या भव्य आकृतीपाशी येऊन स्तिमित होऊन जावं तसं हे पुस्तक वाचल्यावर होतं. हा प्रवास आपणही करून पाहू शकतो, हा आत्मविश्वास हे पुस्तक देतं. पुस्तकाच्या या आडवाटा खरोखर एकदा अनुभवायला हव्यात. यातून फिरताना नक्कीच काहीतरी वेगळं आपल्यासोबतही घडू शकतं आणि ते घडू द्यायला हवं, असं वाटू लागतं.

माझ्यावर तरी या पुस्तकाने जादू केलेली आहे. परत परत वाचलं तरी वाचण्याचा कंटाळा येत नाही. उलट प्रत्येकवेळी असं वाटतं, ‘अरे मागच्या वेळी हे आपल्या नजरेतून सुटलं कसं?’ दरवेळी काही तरी नविन सापडत राहतं. पुस्तकांवर लिहिता येतं, हे माहित होतं. पुस्तकांवर लिहिलेलं यापूर्वीही वाचलंय. पण, पुस्तकांवर लिहिलेलं पुस्तक वाचताना पुस्तकांच्या प्रेमात पडायला लावणारं हे पुस्तक आहे.

 

या पुस्तकात ज्या पुस्तकांबद्दल लिहिलंय ती सगळी पुस्तक वेगवेगळ्या देशातील, भाषेतील आहेत. त्यांचे सांस्कृतिक संदर्भ, लेखकांची पार्श्वभूमी आणि त्यांची घडणावळही वेगळी आहे. यातील काही मोजके लेखक फक्त तोंड ओळखीचे म्हणावे इतपत माहितीतले. पण, या पुस्तकातून आपल्या समोर रिता होणारा खजिना पाहून डोळे दिपून जातात. अलिबाबाला खजिन्यानी भरलेली गुहा पाहून जो आनंद झाला असेल तो आनंद हे पुस्तक वाचून होतो.

एका अपरिचित जगाशी होणारी ही ओळख आपल्याला आरपार बदलवून टाकते. वाचक म्हणून तुमचाही प्रवास कुठे तरी अडला असेल, कुंठला असेल तर, तो प्रवास पुन्हा नव्या जोशात सुरू करण्याची उमेद आणि प्रेरणा या पुस्तकात मिळते.

पुस्तकाच्या मनोगतात लेखक म्हणतात, ‘पुस्तकाच्या शोधात आडवाटेला वळल्यावर पुढे त्या आडवाटेला अनेक फाटे फुटतात. वाचनाच्या अंगणात पाऊल ठेवणाऱ्या वाचकानं त्या वाटेनं पुढे जाऊन स्वतःचे लेखक शोधले, त्यातून त्याला खास त्याच्या असा नव्या अडवता सापडल्या तर मला आनंद होईल.’

तर एक वाचक म्हणून मला असं वाटतं की, पुस्तकाच्या जगातील स्वतःच्या आडवाटा शोधण्याची प्रेरणा देण्यात नक्कीच हे पुस्तक यशस्वी झालेलं आहे. या सुंदर प्रवासाची ओळख करून दिल्याबद्दल या पुस्तकाचे आणि लेखकांचेही आभार. खरं तर हे पुस्तक तयार होऊन ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यात अनेक लोकांचा सहभाग आहे. तर, सवयीनुसार या साखळीतील प्रत्येक घटकाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.

हे काही पुस्तकाचं समीक्षण, परीक्षण, रसग्रहण नाही. तेवढी माझी कुवतही नाही. पुस्तक वाचल्यानं मिळालेल्या आनंदाचं हे व्यक्त होणं आहे, इतकंच!

मेघश्री

 


Post a Comment

1 Comments