नकोशा आठवणींचा ससेमिरा कसा टाळावा, यासाठी काही टिप्स./Tips to release painful memories.

आठवणी चमत्कारिक असतात. आठवणी आपल्याला उलट्या पावलांनी भूतकाळात जायला भाग पाडतात. भूतकाळातील आठवणी आपला वर्तमान आणि भविष्यकाळही प्रभावित करत असतात. काही आठवणी सुखद असतात. ज्या आपल्याला आनंद देतात, तर वाईट आठवणी मात्र विंचवासारख्या डसत राहतात.

एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले, शिक्षकांनी कौतुक केले, नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी झाली, अशा आठवणी आपल्याला प्रेरणा देतात. पण एखाद्या व्यक्तीशी झालेले भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादा अपघात, कुणीतरी केलेली फसवणूक, प्रेमभंग अशा आठवणी आपल्याला आणखी कमजोर बनवतात.

आठवणींचा हा खेळ जर जास्तच त्रासदायक होत असेल, तर काय करावं? या वाईट आठवणींच्या जंजाळातून सुटण्याचा काहीच मार्ग नसेल का? होतं काय घटना भूतकाळात घडून गेली असली तरी तिचे व्रण वर्तमानातही खुपत राहतात. काहींसाठी या आठवणी डिप्रेशनचे कारणही ठरतात. या आठवणींच्या दुष्ट पंजातून सुटका करून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तसा निश्चय करावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. तुमच्या या आठवणी आठवणीत राहिल्या तरी त्या  तुम्हाला छळणार नाहीत.

भूतकाळातील आठवणी बाजूला सारून तुम्हाला जर आजच्या कामावर फोकस करता येत नसेल तर याचा तुमच्या दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. कधीकधी आत्मविश्वास नाहीसा होतो. मग आपण काय करतो तर आपण अगदी तत्परतेनं या आठवणी बाजूला सारून स्वतःला कामात गाडून घेतो. पण, जितक्या वेगात तुम्ही त्या बाजूला कराल तितक्याच वेगात त्या तुमच्या मनपटलावर उमटत राहतात.

आठवणी आणि त्याच्याशी निगडीत भावना यांना जबरदस्तीने दूर सारता येत नाही. जबरदस्तीने त्यांना नाकारलं की वेळीअवेळी त्या केव्हाही वाकुल्या दाखवू लागतात. यात तुमची बरीच ऊर्जा खर्ची पडत राहते.

वाईट आठवणी कशाच्याही असू शकतील. भूतकाळात घडलेली कुठलीही वाईट घटना तुम्हाला सतत सतावत असेल तर तिला जबरदस्तीने बाजूला सारण्याऐवजी तिला येऊ द्या. किती काळ ती तुम्हाला छळत राहणार? त्या आठवणींवर नीट लक्ष द्या. त्यातील कोणती गोष्ट तुमच्या मनाला जास्त खटकते नेमकी ती आठवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याही मागे जाऊन त्या आठवणीमागील एखादी सुखद आठवण अचानक तुम्हाला आठवू शकते आणि त्या घटनेचा विसर पडू शकतो. म्हणून जबरदस्ती ऐवजी स्वीकार करून तिचे स्वागत केले तर, तिच्यामुळे होणारा त्रास कमी होतो. त्यातून येणारी अस्वस्थता हळूहळू कमी होत जाते. स्वीकार आणि तिच्यापासून त्रास न करून घेण्याचा निश्चय या दोन सूत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या मानेवरील हे आठवणींचे भूत पळवून लावू शकता.

शांतपणे बसून ती घटना आठवण्याचा प्रयत्न करा. ती आठवताना निश्चितच त्रास होणार आहे. हा त्रास सहन करूनच आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकतो. त्रास झाला तरी त्या क्षणी तो अटळ आहे. एकाच वेळी काय त्रास होऊन जायचा तो होऊ दे. पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती नको. ती घटना आत्ता घडत असल्याप्रमाणे पुन्हा आठवा. आता स्वतःला सांगा की, माझ्यासोबत अमुक एक गोष्ट घडली असली तरी, आत्ता या क्षणी मी सुरक्षित आहे. ती घटना कित्येक अंतर मागे टाकून मी आता पुढचा प्रवास करत आहे. अशावेळी स्वतःशीच बोलण्यासाठी काही मंत्र म्हणजेच सकारात्मक विधाने तयार ठेवा.


मेंदूला एक गोष्ट सतत सांगत राहिल्यास त्यावर मेंदूचा विश्वास बसतो. म्हणून आठवणीतून येणारी अस्वस्थता, असुरक्षितता, भीती, ताण या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही सकारात्मक विधाने किंवा मंत्रांचा सतत जप करत राहा. “मी सुरक्षित आहे,” “मी माझ्या आयुष्यात प्रगती करत आहे,” असे काही सकारात्मक मंत्र बनवा जे तुम्हाला अशावेळी उपयोगी येतील. यामुळे आठवण पुसली गेली नाही, तरी त्यासोबत येणारी नकारात्मक भावना पुसली जाते. पुन्हा कधी त्या गोष्टी आठवल्या तरी त्याचा त्रास होत नाही. एखादा चित्रपट पाहताना आपण समोरील पडद्यावरील हालचाली ज्या तटस्थतेने पाहतो त्याच तटस्थतेने आठवणींकडे पाहणे जमू लागते.

कृतज्ञतेचा सराव करा. रोजची सकाळ एक नवी अशा घेऊन उगवते. त्या सोबत नव्या संधी मिळतात. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. 

काही चांगल्या आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला, सिनेमाला, एखादे प्रदर्शन पाहायला किंवा जत्रेत जा. या आठवणी तुम्हाला तुमच्या मागील आठवणींमुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत करतील. चांगल्या आठवणींचा खजिना कसा भरता येईल ते पहा. पुढच्या काळातही या आठवणी तुम्हाला प्रेरणा देत राहतील.

ती दु:खद, त्रासदायक,घटना जेव्हा केव्हा काल्पनिक रुपात समोर उभी राहील तेव्हा, तिच्यापासून न पळता स्वतःला एखाद्या चांगल्या कामात गुंतवा. गाणं ऐका, चित्र काढा, पुस्तक वाचा, चित्रपट पहा. यातून तुमचं मन दुसऱ्या विचारांकडे आकर्षित होईल आणि ती आठवण मागे पडेल. आठवणीने अस्वस्थ न होता इतर कामात लक्ष लावण्याचं हे कौशल्य जर तुम्ही शिकाल तेव्हा, हळूहळू त्या वेदनांचा विसर पडू लागतो. भूतकाळातील घटना, प्रसंग किंवा व्यक्तींपेक्षा तुम्ही स्वतः आणि तुमची स्वप्नं जास्त महत्वाची आहेत.

हलकासा व्यायाम, पौष्टिक आहार, भरपूर पाणी पिणे आणि चांगल्या सकारात्मक लोकांत मिसळणे अशा गोष्टींमुळे तुमच्यातील सकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे दडपण, चिंता, भीती यांचे प्रमाण थोडे कमी होते.

एखाद्या वाईट प्रसंगाने आपल्याला नक्कीच काही तरी चांगला धडा दिलेला असतो. जेव्हा या आठवणी त्रास देतील तेव्हा त्यातून तुम्हाला काय धडा शिकायला मिळाला ते आठवा. त्यावर लक्ष केंद्रित करा आणि पुन्हा आपल्या हातून चुका होऊ नयेत म्हणून तो धडा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे आठवणी त्रासदायक नाही तर उलट प्रेरणादायक होतील.



तुमच्या जवळच्या विश्वासू मित्रांशी याबद्दल बोलण्याने तुम्हाला हलकं वाटणार असेल तर बोलून घ्या. त्यांच्या दोन समजुतीच्या शब्दांमुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. गरज असेल तर समुपदेशकांची मदत घ्या.

ध्यान केल्यानेही अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. अपराधीपणाची बोच कमी होते. त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यालाही फायदा होतोच.

ती घटना विसरण्यासाठी ती व्यक्त होणं गरजेचं आहे. मग एखाद्या कलेच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करा. चित्र काढणे, लिहिणे, संगीत, अशा कोणत्या तरी कलेशी जोडून घेतल्याने मनावरील ताण हलका होतो.

आठवणी विसरण्यासाठी म्हणून दारू पिणे, सिगारेट ओढणे, नवीन नाते जोडणे, जंकफूड खाणे, झोपून राहणे, अशा वाईट सवयींच्या आहारी जाऊ नका. यामुळे तुम्हाला आधीपेक्षाही जास्त वाईट अनुभव येऊ शकतात. तुमच्या शरीरावर, मनावर याचा विपरीत परिणाम होऊन तुम्ही तुमच्या ध्येयापासून भरकटण्याची शक्यता वाढते.

 सकारात्मक विचार स्वीकारून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्यात त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. तुम्हालाच जाणीव होईल की आठवणी किंवा घडून गेलेले प्रसंग कितीही वाईट असले तरी नव्याने सुरुवात करता येते.

आयुष्यात चांगलं-वाईट असं काही तरी घडतच राहणार. पुढे त्याच घटना आठवणींच्या रुपात त्रास देत राहणार. म्हणून घडून गेलेल्या गोष्टींवर जास्त विचार न करता पुढे काय करता येईल, हा विचार जास्त आशादायी आहे. अशा घटनांतून मिळणारे धडे लक्षात ठेवून आपण पुढील निर्णय घेतले पाहिजे. तेव्हाच आपल्यातील पश्चातापाची भावना कमी होते आणि आठवणींचा त्रासही.

 #Positive_mindset, #Release_painful_memories #ways_to_release_painful_memories, #Positive_affirmation 

 

 

 

Post a Comment

2 Comments

Unknown said…
प्रसंग कितीही वाईट असले तरी नव्याने सुरुवात करता येते.
माहितीपूर्ण आणि प्रत्येकालाच उपयुक्त असा हा लेख आहे. तुमची भाषा सोपी सहज समजणारी तर आहेच पण लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक गोष्टी तुम्ही छान पद्धतीने मांडता हे मला फार महत्वाचे वाटते. 👍