किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing

 सगळेच प्राणी कामक्रीडा करतात, प्रजनन क्रियेतील तो एक अविभाज्य भाग आहे. पण, प्रणयाच्या बाबतीतही माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगळाच आहे. प्रत्यक्ष प्रणयाइतकंच प्रणयाची सुरुवात आणि शेवट या दोन्ही गोष्टी माणसासाठी आणि नात्यासाठी महत्वाच्या आहेत. प्रणयाची सुरुवात तर नेहमीच मिठीने आणि किसने होते. आज ‘किस डे’ आहेच तर, आपण किस करण्याचे फायदे बघूया…

जवळच्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करताना कधीकधी शब्द अपुरे पडतात तेव्हा आपसूकच आपण ते स्पर्शातून व्यक्त करतो.



लहान मुलं जेव्हा रडतं तेव्हा ते आईकडे दिल्यावरच शांत होतं. कारण, त्याला त्या स्पर्शातून जाणवतं की आपण सुरक्षित आहोत. आई आणि मुलातील हा सुरक्षित बंध सुद्धा किस मुळेच जपला जातो. सुरुवातीला फक्त आपल्याला आईचा स्पर्श माहित असतो. मोठे होऊ तसे आपल्याला स्पर्शाची भाषा समजायला लागते. मग हा सगळा प्रवास येऊन ठेपतो पहिल्या किसपर्यंत!

आयुष्यातील पहिल्या किस विषयी आठवून जर तुम्ही आजही मोहरून जात असाल तर, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात!

किस हा विषयच इतका गोड आहे, की त्यांनतर सगळंच गोड वाटू लागतं.

‘किसिंग’ या पुस्तकाच्या लेखिका अँड्रिया डिमर्जियन हिने तर आपल्या पुस्तकात लिहिलंच आहे, “a kiss a day really can keep the doctor away.” (म्हणजे किस ‘अॅपल’ला पर्याय ठरू शकतो. स्वस्त आणि मस्त!)

किसिंगमुळे तुमचा वाढलेला ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो. कारण, किस केल्यानंतर रक्तवाहिन्या प्रसारण पावतात, ज्यामुळे रक्तावरील दाब कमी होतो. जर तुमचे डोके दुखत असेल किंवा पाळीच्या दरम्यान कंबर पोट दुखत असेल तर, यावरही किस हा एक चांगला उपाय आहे. कारण, रक्तवाहिनी प्रसारण पावल्याने या भागातील रक्तप्रवाह सुरळीत होऊ शकतो. म्हणजेच हृदयाच्या आरोग्यासाठीही ‘किस करणं’ खूप चांगला आहे. (आता डोक्यावर किस करून, “मेरे बाबू का दर्द खात्म हुआ?,” असं विचारणारी लाडिक जोडपी कुठं दिसली तर उगाच त्यांच्यावर हसू नका.) बाबू-शोनाच कशाला लहान मुल पडल्यावर त्याला लागतं म्हणून ते रडतं. यावेळी तुम्ही त्याला पटकन जवळ घेऊन त्याच्या गालावर हलकं किस करत राहिलात तरी ते रडायचं थांबंत.

आपले ओठ हा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहे. त्यामुळे जेव्हा ओठांना स्पर्श होतो तेव्हा मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्स अॅक्टिव्ह होतात आणि मेंदूला सकारत्मक संदेश पोचतो.



जेव्हा तुम्ही किस करता तेव्हा तोंडात अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते. ज्यामुळे सगळं तोंड स्वच्छ होऊन जातं. दातावर साचेलेले कण सुद्धा निघून जातात. (म्हणजे तुम्ही ब्रश नाही केला तर चालेल असं अजिबात गृहीत धरू नका. ब्रश करूनच किस करा.) त्यामुळे दातात कॅव्हीटी निर्माण होण्यासारख्या समस्याही अपोआप लांब राहतील.

किस केल्यावर आनंद तर होतोच. म्हणजेच किसिंगमुळे तुमच्यातील सेरोटीन, डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन असे हॅप्पी हार्मोन्स स्त्रवतात ज्यामुळे तुमचा ताणताणावही निवळतो. तुमच्या एकट्याच्या आनंदासाठी नव्हे तर तुमच्या जोडीदाराच्या आनंदासाठीही हे खूप महत्वाचं आहे. यामुळे तुमच्यातील नातं आणखी दृढ होऊ शकतं. (नव्हे होतंच!)

यातील ऑक्सिटोसिन हे हार्मोन आपल्याला प्रेम व्यक्त करण्यास मदत करतं. हे हार्मोन जितकं अधिक निर्माण होईल तितकी प्रेम करण्याची, देण्याची आपली क्षमता वाढते. ज्यांना प्रेमात कमिटेड राहता येत नाही त्यांच्यात ऑक्सिटोसिनचं प्रमाण कमी असतं, अस अभ्यासकांचं मत आहे. ऑक्सिटोसिनमुळे आपल्याला निवांत आणि चांगलं वाटू लागतं.

किसमुळे शरीरातील कार्टीसोल हार्मोनचे प्रमाण कमी होते जे तणावास कारणीभूत ठरते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. घराच्या सुरक्षित वातावरणातून पहिल्यांदा बाहेर पडून शाळेच्या अनोळखी जगात प्रवेश करणारी छोटी मुलं पहिल्यांदा खूप घाबरलेली असतात. त्यात आपण त्यांना काही शिकवायला जातो तेव्हा तर ते आणखीन नाखूष आणि नाराज होतात. मुलांना फक्त शाळेच्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून त्यांना जवळ घेणं, हाताची पापी घेणं इतकं केलं तरी त्यांचा आपल्यावर (शिक्षकांवर) विश्वास बसतो. पुढेही जेव्हा मुलं एखादी नवी गोष्ट करायला घाबरत तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणून, त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या कृतीला दाद म्हणून मी हाताचीच पापी घेत असे. खरं तर मुलांमधील आत्मविश्वास जागवण्याचा यापेक्षा दुसरा कोणता चांगला मार्ग असू शकतो असं मला तर वाटत नाही. त्यांना बक्षीस म्हणून चॉकलेटची नाही तर कौतुकाची, आपलेपणाची आणि प्रेमाची गरज असते.

एखाद्या महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल तर, तत्पूर्वी किस करून निघायला हरकत नाही. सकाळी घरातून बाहेर पडताना ज्या जोडप्यांना किस करायची सवय असते, त्यांच्या कार्यक्षमतेतही चांगली वाढ होते असं दिसून आलं आहे.

किसमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. (कोरोना कळात घरात बसा असं सगळे का म्हणत होते ते कळलं का?) एखाद्या अलर्जीविरुद्ध लढतानाही याचा फायदा होतो. विशेषत: ज्यांना त्वचा आणि नाक यांची अलर्जी असेल त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

 


किस केल्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंचाही व्यायाम होतो आणि आपल्या चेहऱ्याची ठेवण सुधारते. कारण, किस करताना चेहऱ्यावरील ३४ स्नायूंचा व्यायाम एकाच वेळी घडून येतो. चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम झाल्याने कोलॅजेन वाढते, ज्यामुळे वयानुरूप त्वचेत होणारे बदल हळूहळू होऊ लागतात. म्हणजे संतूर मॉम (किंवा डॅड) होण्यासाठी साबणाची नाही तर किसची गरज आहे.

किस केल्याने शरीरातील गुड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

सगळ्यात महत्वाचं किस केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होतात. तुम्ही जर किती पॅशनेटली किस करता यावर हे अवलंबून आहे. सो किस करायचं म्हणून करू नका. त्यात जास्तीत जास्त भावना ओता. यातून एका मिनिटाला किमान २६ कॅलरीज तरी तुम्ही खर्च करू शकता. महत्वाची बाब म्हणजे हे सगळे फायदे एकाच वेळी दोन्ही व्यक्तीला होणार आहेत.

आता विचार करा, जगात पहिला किस कुणी केला असेल? तर अभ्यासकांच्या मते, जगातील पहिला किस हा आई आणि मुलामधील किस आहे. खूप सुरुवातीला कीस फीडिंग नावाची एक संकल्पना होती. ज्यात आई आपल्या तोंडात घास घोळवून तो बाळाला भरवत असे. यातून बाळाला आईचे प्रेम आणि आईकडून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती दोन्हींचा फायदा होत असे.

 

किस दोन व्यक्तींना जवळ आणणारा एक दुवा आहे. ज्याने आपसातील प्रेम वृद्धिंगत होते. पण, किस करणं ही एक कलाही आहे. नाहीतर किस नंतर बरीच रिस्क निर्माण होऊ शकते.

तर आजच्या दिवशी हे किस पुराण इथंच थांबवूया.

बाकी, Happy Kiss Day!

किस करा, स्वस्थ राहा!

 ❤️ मेघश्री.

 

 

 

 

 

Post a Comment

1 Comments

Anonymous said…
योग्य व सुस्पष्ट माहिती