नकारात्मक विचारांना सकारात्मक दिशा देता येते./Flip negative thoughts into positivity!

 दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येत असतात. यातील कित्येक विचार हे नकारार्थी आणि आपल्याला मागे खेचणारे असतात. ‘वैरी न चिंती ते मन चिंती,’ असं उगीच म्हटलेलं नाही. आपल्याबद्दल ते आपल्या वैऱ्याच्याही मनात कधी येणार नाही ते आपल्या मनात आधीच येऊन गेलेलं असतं. ‘रिकामं मन सैतानाचं घर,’ अशीही म्हण आपल्याकडे रूढ आहेच. या सगळ्या म्हणीतून हेच सांगायचं आहे की, मनातील विचारांकडे आपले लक्ष असेल तर आपल्या कितीतरी चिंता निर्माण होण्याआधीच दूर होतात.


आता प्रसादचंच उदाहरण घ्या. गाडी चालवायला शिकून त्याला आत्ता जवळपास दहा वर्षे तरी होत आली. अनेकदा त्याने दिवसरात्र प्रवास करून लांबचे अंतर कमी वेळेत पार केलेले आहे. पण, त्यादिवशी घरातून पार्टीला जाताना मध्येच त्याच्या मनात विचार आला, आपण इतकी फास्ट गाडी चालवतो पण, कधी कुठे अपघात झाला तर काय करणार? झालं या एका विचारातून त्याच्या मनात पुढे नकारात्मक विचारांची मालिकाच तयार झाली आणि अपघाताच्या नुसत्या कल्पनेनेच त्याला दरदरून घाम फुटला. खरं तशाही अवस्थेत तो गाडी चालवत होताच पण नुसत्या कल्पनेने त्याला हतबल करून सोडले. पण, अपघाताचा विचार त्याच्या मनात आला कुठून तिथे तर तशी कुठलीच परिस्थिती निर्माण झाली नव्हती. अचानक कुठून तरी त्याला अपघात आठवला आणि आपलाच अपघात झाला तर… या कल्पनेने त्याला अस्वस्थ केले. प्रत्यक्ष घटनेपेक्षाही घटनेची कल्पना कितीतरी भयानक असू शकते.




प्रसादच नाही तर आपणही आपल्या रोजच्या व्यवहारात कितीदा असे निरर्थक आणि नकारात्मक विचार करत असतोच. आपल्या मनात अचानक उगवणाऱ्या या विचारांवर आपले नियंत्रण नसले तरी त्यांचा प्रभाव आपण टाळू शकतो. यासाठी थोडे कष्ट घेऊन मनाला सवय लावावी लागेल. एकदा का ही सवय मनात रुजली की, आपल्याला मागे खेचणारे, हतबल करून टाकणारे नकारात्मक विचार निष्प्रभ होतील.

सकारात्मक विचारांच्या लोकांमध्ये कधीच नकारात्मक विचार येत नाहीत, असं होत नाही. पण त्यांना या नकारात्मक विचारांना नाकारून त्याठिकाणी सकारात्मक विचार पेरता येतात.

निव्वळ अपघाताच्या कल्पनेनं गारठून गेलेल्या प्रसादने जर त्याऐवजी, काही सकारात्मक विचार केले असते तर त्याला अस्वस्थता आली नसती. काही विशिष्ट मार्गाने आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना सकारात्मक दिशा देऊ शकतो.

१.       मन हलके होईपर्यंत रडून घ्या

रडणे म्हणजे दुबळेपणा आहे, या विचाराने आपल्याही व्यक्तिमत्वावर इतका प्रभाव टाकलेला असतो की, आपण सतत रडणे टाळत असतो. पण एखाद्या प्रसंगामुळे, पाहिलेल्या/ऐकलेल्या घटनेमुळे जर तुम्हाला रडू येत असेल तर रडून घ्या. याने मनातील नकारात्मक विचार अश्रूसोबत वाहून जातात. रडण्याने मन हलके होते. मूडमध्ये बदल होतो. रडण्याने चांगली झोप लागते. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न आणि आनंदी वाटू शकते. कोणत्याही दु:खद घटनेचा मनावरील प्रभाव कमी करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

२.       नकारात्मक विचारांच्या बदली सकारात्मक विधाने स्वीकारा –

कधी कधी आपण स्वतःच आपले न्यायाधीश होतो आणि स्वतःला अपराधी ठरवून मोकळे होते. आत्मपरीक्षण कधीकधी इतके टोकाला जाते की, आपल्याच नजरेत आपण गंभीर गुन्हेगार ठरतो. आत्मविश्वास गमावून बसतो. आपल्याला अक्कलच नाही, बिनडोकच आहोत, असला विचार करताना आपण स्वतःला जराही समजून घेत नाही. स्वतःबद्दलची ते तर्क किंवा विधाने आपल्यालाच महागात पडू शकतात. कारण, या नकारात्मक विधानांचा आपल्या अंतर्मनावर खोल परिणाम होत राहतो. हा परिणाम पुसून काढण्यासाठी,

मी शहाणा/शहाणी आहे.

मला योग्य निर्णय घेता येतात.

मी बढती/प्रेम/शाबासकी मिळवण्यास पात्र आहे.

मी एक चांगली व्यक्ति आहे.

माझ्यात बरेच चांगले गुण आहेत.

अशा सकारात्मक विधानांची घोकंपट्टी करावी लागते. यामुळे आपल्यातील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते.

तुमच्या मनाला जेव्हा तुम्ही सकारात्मक विचारांचं खाद्य देता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वावरही त्याचा प्रभाव दिसू लागतो.

३.       नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा-

तुमच्या आजूबाजूला जर नकारात्मक विचार करणारे लोक असतील तर त्याचा परिणाम तुमच्याही विचारांवर होत असतो. अर्थात, इतर लोक आपल्या विचारांना जबाबदार असत नाहीत पण ते आपल्यासमोर एखाद्या परिस्थितीचे भयानक रूप उभे करू शकतात जे वास्तवात असत नाही.

आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या, आपल्यातील आत्मविश्वास जगवणाऱ्या लोकांची आपल्याला गरज असते. अशा लोकांमुळे आपण आपल्या कामावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो.

४.      भूतकाळातील नकारात्मक अनुभवांकडे दुर्लक्ष करून वर्तमानावर लक्ष्ये केंद्रित करणे –

ज्या घटना, लोक, प्रसंग मागे टाकून आपण पुढे आलो आहोत त्यांचा विचार करण्यात आता अर्थ नाही. त्या अनुभवांनी तुम्हाला जो धडा दिला, त्यातून तुम्ही बरेच काही शिकला आहात. आता पूर्वीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही यात बरेच अंतर आहे, तेव्हा त्या घटना उगाळून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही. यामुळे तुमचे कामातील लक्ष कमी होऊन तुमच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. काम करण्याची इच्छा कमी होऊ शकते. तुम्ही किती चुका केल्या हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती धडे शिकले आणि त्यातील किती अंमलात आणले हे महत्वाचे आहे. तेव्हा भूतकाळातील नकारात्मक आठवणींना नाकारताना स्वतःची एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करा. तुमचे अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे तुमच्यासाठी लाख मोलाचे आहेत.

५.      नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा –

तुमच्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतील ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि पुढे जाता. नकारात्मक विचारांच्या बाबतीतही हाच नियम लागू करा. नकारात्मक विचार मनात आल्यावर त्याबद्दल सजग होऊन तो ओळखायला शिका. काही नाही हा फक्त माझ्या मनातील एक नकारात्मक विचार आहे, त्याकडे नंतर पाहता येईल, असा विचार करून त्याला थोडा वेळ बाजूला ठेवा आणि हातात घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

हळूहळू त्याचा प्रभाव नाहीसा होईल.

६.      सोशल मिडियापासून दूर राहा-

हल्ली आपले अडीच-तीन तास सोशल मिडिया स्क्रोल करण्यातच निघून जातात. हल्लीच्या काळात आजूबाजूच्या घटनांबद्दल जाणून घेणे, आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी संपर्कात राहण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी हा एक सोपा आणि चांगला मार्ग असला तरी, यातून अनेकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही दिसून आले आहे. सोशल मिदियावरील इतरांचे हसरे फोटो, पार्टी आणि सहलीचे फोटो, त्याबद्दल लिहिलेली पोस्ट वाचून आपण कुठेतरी नाराज होतो. इतरांजवळ जे आहे ते माझ्याकडे नाही, किंवा हे मी करू शकत नाही अशा नकारात्मक विचारांच्या प्रभावाने निराश होतो. खरे तर नाण्याला असणारी दुसरी बाजू कधी आपण विचारात घेत नाही. फेसबुकवर लोक नेहमी आपली सकारात्मक बाजुच दाखवत असतात. प्रत्येकाच्या आयुष्याला एक नकारात्मक बाजूही असते जी त्यांनी मांडलेली नसते. पण आपल्याला वाटतं इतरांच्या आयुष्यात सगळं काही चांगलं चाललंय आणि आपण मात्र आहेत तिथेच आहोत. आपल्यात काही प्रगती नाही.

कितीही टाळतो म्हटले तरी हे विचार टाळले जात नाहीत. म्हणून सोशल मिदियावरील वावर शक्यतो कमी असावा. इथे मोजक्या आणि ओळखीच्या लोकांशीच संपर्क असणे जास्त फायद्याचे आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अजून काही नकारात्मक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात ज्याची आपल्याला गरजही नसते आणि फायदाही नसतो.




७.      थोडा पॉज घ्या-

प्रतिकूल परिस्थितीत असताना नकारात्मक विचार तातडीने थांबवता येत नाहीत. त्यांना नाकारून पुढे जाता येत नाही. अशा वेळी थोडा पॉज घ्या. उसळत्या समुद्रात होडी नेता येत नाही, तसेच नकारात्मक भावनांची गर्दी झाली की त्यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी ही गर्दी ओसरण्याची, मन शांत होण्याची वाट पहावी लागते. काही वेळाने हे नकारात्मक विचार अपोआप कमी होतात. अशावेळी ही एक तात्कालिक स्थिती असल्याचे विसरू नका. अगदीच दुखद प्रसंगी निर्माण झालेल्या भावनांना नाकारून आपण त्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही. अशावेळी त्यांचा स्वीकार करणे हाच एक पर्याय असतो. मृत्यूशोक, दुर्धर आजाराची लागण यासारख्या दुर्दैवी घटना जेव्हा घडतात तेव्हा कोणतीही सकारात्मक विधाने, युक्ती तिथे लागू होत नाही. अशावेळी भावना व्यक्त करणे आणि त्या अपोआप नाहीशा होण्यासाठी वेळ देणे हाच एक पर्याय राहतो. मनावर आघात करणाऱ्या या घटना तत्काळ विसरणे शक्य नसते आणि त्यातून घाईने बाहेर पडल्यास पुढे जाऊन गंभीर मानसिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यातून बाहेर पाडण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो.



दु:ख, भीती, चिंता, ताणताणाव, चिडचिड, राग, लोभ या मानवी स्वभावाच्या सहज प्रवृत्ती आहेत. त्यापासून जबरदस्ती सुटका करून घेणे धोक्याचे आहे. पण, या सगळ्या गोष्टींचा दीर्घकाळ अंमलही बरा नव्हे. सतत दुख निराशा आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही पंगु करून टाकते. म्हणून त्यांना हाताळण्याचे कसब शिकले पाहिजे.

सकारात्मकता आपल्या आणि आपल्या आप्तस्वकीयांच्या जीवनासाठीही आवश्यक आहे. याने जीवन थोडेतरी सुसह्य होण्यास मदत होते.


©मेघश्री

 

Post a Comment

0 Comments