स्वतःवरही भरपूर प्रेम करू शकतो आपण! या Valentine ला स्वतःवरचं प्रेम व्यक्त करा!

प्रेमाचा आठवडा सुरु आहे. प्रेमाच्या या प्रवासाची सुरुवात होते ती स्वतःपासून आणि स्वतःवरील प्रेमाची सुरुवात होते आत्म-स्वीकारापासून. पण स्वतःचा स्वीकार म्हणजे तरी काय?

स्वतःला आहोत तसं स्वीकारणं म्हणजे आत्म-स्वीकार. हे वाक्य वाचायला जितकं सोपं आहे तितकंच प्रत्यक्षात अवलंबायला कठीण! मुळात आपण कसे आहोत हेच बरेचदा आपल्याला माहीत नसतं. 



मग हा प्रवास स्वतःला ओळखण्यापासून सुरू व्हायला हवा. एकदा का स्वतः आपण कसे आहोत कसे नाही हे कळालं की, मग ते स्विकारणं सोपं होईल नाही का?

बरेचदा इतरांनी दिलेले शेरे, कौतुक, मान अपमान याच चष्म्याने आपण आपली एक प्रतिमा बनवलेली असते. पण, मुळात आपण कसे आहोत, कसे होतो? हेच कधी कधी विसरून गेलेलं असतं.

असे इतरांनी दिलेली मतं आपण आपल्यावर लादली आहेत का हेही पाहायला हवं.

कधी कधी अशी मतं न कळत आपल्यात रुजलेली असतात, आपण ती स्वीकारलेली असतात. स्वतःला स्वीकारताना, अशी लादलेली प्रतिमा नाकारताही यायला हवं. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा आपण स्वतःला ओळखलं, एकदा स्वीकारलं आणि बस्स आता आपण स्वतःच्या प्रेमात पडलो असं होत नाही.

तुमचं दुसऱ्याशी असलेलं नातं जसं बिनसतं ना तसं मध्ये मध्ये स्वतःशी असलेलं नातंही बिनसू शकतं. हेही होऊ शकतं. आपण आपल्यावरच नाराज होऊ, रागराग करू, आपल्याच अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होणार नाहीत. हे सगळं होत राहिलं तरी एक गोष्ट मात्र पक्की हवी. स्वतःचा हात कधीच सोडायचा नाही!



स्वत:ला आहे तसं स्विकारणं म्हणजे उणीवांवर पांघरून घालणं असं होत नाही. त्या उणिवा ओळखून त्यावर काम करून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. इतर कुणासाठी नव्हे स्वतःसाठी!

आत्म-स्वीकार म्हणजे मी आहे तशीच राहणार असला दुराग्रह नव्हे. आत्म-स्वीकार म्हणजे मी अशी आहे, पण मला अजून चांगलं बनण्याची संधी सोडायची नाही. त्यासाठी धडपडत रहायचं आहे.

आपल्याला काय हवंय काय नको याची स्पष्टता आधी हवी. मग सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात.

आजूबाजूला भौतिक सुखांची रेलचेल नसली तरी चालेल पण, आपल्यालाकडे जे आहे ते आपल्यासाठी पुरेसे आहे, हा व्यावहारिक शहाणपणा सुद्धा आत्म-स्वीकार आणि स्व-प्रेमात मोडतो.

कोणी कितीही सल्ले दिले तरी, त्यातील आपल्याला जे झेपेल तेच आपण करू शकतो, याचं भान असणं. स्वतःवर कोणत्याही प्रकारे दडपण न घेता, आपापलं ठरलेलं काम करत राहणं.

सगळ्यात महत्वाचं, इतरांशी तुलना न करणं.

स्वतःच्या स्वतःकडून अपेक्षा असायला हव्यात. पण, या अपेक्षा इर्षा आणि स्पर्धेतून आल्या आहेत की, खरोखर आपल्यालाच त्यांची ओढ आहे, या दोन प्रश्नांनी ताडून पहायाला हवं. मोठ-मोठ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून निराशा येत असेल तर छोट्या-छोट्या गोष्टीतून मिळणारा पूर्णत्वाचा आनंद घ्या. एक छोटसं काम केल्याबद्दल तरी निदान तुम्ही स्वतःवर खुश व्हायलाच हवं. मग ते काम घरातील पसारा आवरणं, आवडती भाजी बनवणं किंवा पुस्तक वाचणं इतकं सोपं-साधं असलं तरी चालेल. दिवसातून एक संधी घ्या स्वतःचं कौतुक करण्याची.

स्वतःला ओळखण्यासाठी वेळ हवा. पण किती? दिवसातील १०-२० मिनिटं पण, भरपूर आहेत. वेळेचं नियोजन चुकलं की सगळी गणितं चुकतात हे तर आपल्याला माहीत आहेच. दिवसभराचं तुमचं एक रुटीन ठरलेलं असतं. त्यातूनच ही १०-२० मिनिटं अॅडजस्ट करायची आहेत. या वेळेत फक्त स्वतःचा विचार करा. स्वतःला ओळखण्याचे मार्ग तुम्हाला सापडत जातील. आपण म्हणजे कोण? आपलं शरीर, आपलं मन, आपले विचार आणि आपली कृती या सगळ्यांची गोळाबेरीज करून ‘आपण’ हे उत्तर मिळतं. शरीर, मन, विचार आणि काम या सगळ्याची काळजी घेणं म्हणजे आपली काळजी घेणं.



शरीरात बिघाड झाला की जसं आपणच औषध घेतो..? तसच मन आणि विचारात बिघाड झाला की आपल्यालाच काम करायचं आहे. इतरांची मदत घेऊ शकता पण, इतरांना जबाबदार धरू शकत नाही.

इतरांच्या आयुष्याकडे पाहून जर आपण आपलं सुख-दुःख मोजायला लागलो तर, पदरी नेहमी निराशाच पडेल. आपण थोडे हळूहळू जाऊ पण, जिथं पोहोचायचं आहे तिथं नक्की पोहोचू.

कमी वयात कमी वेळेत मोठं काही तरी करून दाखवण्याचं दडपण कशाला हवंय. शेवटी यश दुसऱ्याला दिसणारी आणि दुसऱ्याच्या तराजुनी तोलली जाणारी गोष्ट. समाधान मात्र स्वतःचं, हक्काचं आणि स्वतःसाठी असतं. आपल्या आनंदाची फुटपट्टी आपल्याला माहीत हवी आणि तीच प्रमाण मानून चालायचं आहे.

जसं विनाकारण आपण इतरांचे सल्ले ऐकत नाही, तसच इतरांना विनाकारण सल्ले देत बसण्यातही काही अर्थ नाही. मग ती व्यक्ती कितीही जवळच्या परिघातली असली तरी! जो नियम आपण स्वतःला लागू करतो तोच इतरांच्या बाबतीतही लागू होतो.

शेवटी काय आपण माणूस आहोत, चांगलं वाईट सगळं काही आपल्यातही भरलेलं आहेच. पण, तरीही यातील काही गोष्टी आपण बदलू शकतो काही बदलू शकत नाही. ज्या गोष्टी बदलणार नाहीत त्या स्वीकारण्याची तयारी तर ठेवावीच लागेल.

ज्या बदलू शकतात असं वाटतं त्यावर काम करावं लागेल. ही प्रक्रिया शेवटपर्यंत सुरू राहील. पण, एक मात्र नक्की हवं, स्वतःचा हात सोडायचा नाही!

 © मेघश्री

 

 

 

 

 

Post a Comment

1 Comments