मनसोक्त रडणंही कधी कधी चांगलं असतं. पण...

“रडू नको.” 
“का रडतेस?”
“किती ते रडायचं?”
अशी रडणं नाकारणारी वाक्य ऐकत ऐकतच आपण मोठे होते. लहान असताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडणारे आपण मोठं होण्याच्या अट्टाहासात रडणंही विसरून जातो. 
या जगात आपण सुखरूप अवतरलो ही गोष्टही आपण रडण्यातून जाहीर करतो. जन्मानंतर आपणं सुखरूप आहोत ही आनंदाची वार्ता आपण रडूनच सांगतो आणि तरीही आयुष्यभर या रडण्यापासून दूरदूर पळत राहतो. रडणारी लोकं खंबीर नसतात. रडणारी लोकं आयुष्यात काही करू शकत नाहीत. अशी वाक्य ऐकून ऐकून आपल्याही मनात या भावनेबद्दल एक नकारात्मकता तयार होतेच. मग आपण इतरांसमोर रडू शकत नाही म्हणून खाजगीत, एकांतात, एकट्याने रडतो. 
कुणी आपल्यासमोर रडत असेल तर आपणही त्याला हीच ऐकलेली, वाक्य ऐकवत राहतो. ‘रडू नको,’ ‘रडायचं नसतं,’ हेच सांगत राहतो. पण का? का नाही रडायचं? हे कधीच स्वतःलाही आपण विचारत नाही. 
रडायचं नाही हे वाक्यानं माझ्या डोक्यातही असच घर केलं होतं. प्रत्येक गोष्ट हसून मागे टाकताना आत रडणं साचत चाललंय हे लक्षातच आलं नाही. अर्थात अगदीच रडणं बंद असंही झालं नव्हतं. जेव्हा जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा तेव्हा ते अश्रूंच्याच माध्यमातून व्यक्त होतात. तरीही आपण स्वतःची समजूत काढण्याचं थांबवत नाही. आपण स्वतःलाही ऐकवत राहतो. रडायचं नाही. 


अलीकडे मात्र हमखास छोट्या छोट्या गोष्टीवरून रडणं जास्त होऊ लागलं. मग पुन्हा तेच रडायचं कशाला? म्हणत डोळे पुसायचे. हसायचं आणि रोजच्या कामात गाढून घ्यायचं. 
सहा महिन्यापूर्वी मात्र मला असं रडायला आलं की चार-पाच तास माझं रडणंच थांबत नव्हतं. रडायचं नाही अशी कितीही समजूत काढली तरी रडणं थांबलं नाही. रडून रडूनच रात्री कधीतरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सगळं काही पुन्हा पूर्ववत झालं. 
चार दिवस गेले आणि पुन्हा तेच. पुन्हा स्वतःला समजावणं रडायचं नाही. पण, मन ऐकायला तयार नव्हतं.
नंतर नंतर तर कुठेही रडायला यायला लागलं. ऑफिसमध्ये, रस्त्यात, बाजारात, फिरायला, गेलं तरी...
पण असं चारचौघात, अनोळखी माणसात कसं रडायचं? म्हणून पुन्हा ते दाबून ठेवायचं.
कुणी विचारलंच का रडतेस तर सांगताही यायचं नाही. कारण, रडण्यासारखं काही झालेलंही नसायचं. कुणाशी भांडण नाही. काही दुखतय म्हणून नाही, कुणी बोललं म्हणून नाही. काहीच कारण नाही. सांगणार काय?
रडायचं नाही म्हणत मी जितकं रडणं थांबवत होते तितकंच ते रडणं उसळी मारून बाहेर यायचं. 
कधी कधी तर असंही वाटायचं की, आता रडले नाही तर काही खरं नाही. 
कुठल्याही कामात लक्ष नाही. कामं करण्याचा उत्साह नाही. रोजची कामंही कशी तरी जीवावर उदार होऊन उरकायची. मुलाला डबा दिला पाहिजे, आपण डबा नेला पाहिजे म्हणून जेवण बनवायचं. एक काम केलं की पुढचं काम करण्याची शक्तीच नाही, असं वाटायचं. पाच-सहा महिने हे असंच सुरू राहील. 
त्यातच दिवाळीच्या दरम्यान आई-वडील दोघांनीही जगाचा निरोप घेतला आणि आश्चर्य म्हणजे इतकी रडणारी मी तेव्हाही ढिम्म बसून राहिले. 
कुणी गेलं तरी आपण जगणं सोडत नाही किंवा जगणं आपल्याला सोडत नाही, म्हणून पुन्हा आपण नॉर्मल होण्याचा प्रयत्न करतोच. त्यानंतर मात्र पुन्हा रडणं वाढलं. पण रडू नको हे सांगणारे आजूबाजूला असतातच. त्यांना काय उत्तर द्यायचं हेही कळत नव्हतं. 


दिवस जातील तसतसं उत्साह नाही की, कुठली काम करण्याची इच्छा नाही!
ऑफिसमध्ये गेले तरी ढिम्म बसून राहणं. तिथली कामं म्हणजे तर प्रचंड ओझं वाटू लागली. 
सलग दोन तीन दिवस मी ऑफिसला हाफ डे टाकून घरी आले. चौथ्या दिवशी मी पुन्हा एकदा ऑफिसचं काम अर्ध्यातच सोडून घरी आले. वाटलं हे असंच चालू राहिलं आपलं तर, एक दिवस ऑफिसमधून कायमचंच घरी थांबण्याचा निरोप मिळणार. पण, हे असं का होतंय कळत नव्हतं. शेवटी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण, डॉक्टरांना तरी काय सांगणार? 
तरीही उठून दवाखान्यात गेलेच. कारण, जे काही होत होतं ते नॉर्मल नाहीये, एवढं तर जाणवत होतं. डॉक्टरांनाही तेच सांगितलं, कधीही कुठेही अचानक रडायला येतं आणि असं रडायला येतं की तासनतास ते रडणं थांबत नाही. मला काय होतंय हे माझं मलाही सांगता येत नाही. पुरेशी गाढ झोप लागत नाही. कुठलंही काम करण्यात रस वाटत नाही. अगदी अंघोळ, ब्रश अशी रुटीन कामंही रेंगाळत सुरू असतात. करायचं म्हणून करायचं. डॉक्टरांनी ऐकून घेतलं. सुदैवाने त्या दवाखान्यात सायकॅट्रिस्ट पण होते. त्यांनी काही औषधे लिहून दिली. डॉक्टर म्हणाल्या, काही वाटलं तर कधीही फोन करा. मी आहे. 
हे सगळं संभाषण सुरू असतानाही डोळ्यातील पाणी थांबलं नव्हतंच. आता औषधं आणली आहेत तर बरं वाटेल असा समज करून पुन्हा रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न सुरू झाला. औषधांमूळं असेल पण, काही दिवस रडण्याचं प्रमाण कमी झालं. पूर्णत: थांबलं नव्हतंच. 


बहिणीला भावाला फोन करून सांगितलं हे असं होतंय. काही जवळच्या लोकांनाही कल्पना दिली. मग त्यांचे काळजीचे फोन आणि मेसेज जे पुन्हा नको वाटू लागले. 
जबरदस्तीने तर आपल्या हातून काहीच होणार नाही, हे लक्षात आलं. सतत एकच प्रश्न सतावत होता, हे असं का होतंय? 
वाटलं किती दिवस आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली नाही म्हणून असेल. ते सुरू केलं तरीही मन त्यात रमत नव्हतं. पण, जसं जमेल तसं सुरू ठेवलं. डॉक्टरांनी मेडिटेशन करायला सांगितलं म्हणून तेही सुरू केलं. पेनकिलर घेतल्यावर तात्पुरतं दुखणं थांबतं तसंच सगळ्या गोष्टींचा तात्पुरता परिणाम. 
मख्खपणा किंवा आळस (खरं तर निष्क्रियता) काही केल्या कमी होत नव्हती. 
तेव्हा स्वतःलाच विचारलं आपण का अस्वस्थ होतोय? रडायला येतंय म्हणून? पण, मग त्यात नाकारण्यासारखं काय आहे? मग ठरवून टाकलं, सगळे उलटे प्रयत्न बंद करून आता जितकं रडायला येईल तितकं रडून घ्यायचं. स्वतःला रडू नको, असं अजिबात सांगायचं नाही. आठ दिवस ऑफिसलाही गेले नाही. जितकं रडायला येईल तितकं रडून घेतलं. जाणीवपूर्वक रडणं थांबवण्याचा प्रयत्न केलाच नाही. कधीकधी चार पाच तास रडून झाल्यावर अपोआप रडणं थांबायचं. पुन्हा एक दोन तासांनी पुन्हा तेच. पण, ते जबरदस्तीनं अजिबात थांबवलं नाही. 
आठ दिवसात रडण्याव्यतिरिक्त खरं तर दुसरं काही केलंच नाही. कुठलंही काम अमुक वेळेत पूर्ण झालंच पाहिजे असा आग्रहही धरला नाही. कधी करू वाटेल तेव्हा, जमेल तशी कामाला सुरुवात केली. अक्षरश: चार भांडी घासतानाही दोन वेळा ब्रेक घ्याव्या लागायचा. पण, जे काही होतंय ते स्विकारणं एवढाच नियम घालून घेतला. आठ दिवस दिवसा-रात्री, जेव्हा रडायला येईल तेव्हा मनसोक्त रडून झाल्यावर हलकं वाटू लागलं. हाच दिनक्रम सुरू ठेवल्यावर हळूहळू अशा वाटू लागली. आपण आता पुन्हा नॉर्मल लेवला येत आहोत हे जाणवायला लागलं.
मग कधीतरी वाटलं की कित्येक दिवस काही वाचलं नाही. म्हणून दोन पुस्तकं खरेदी केली. हे कुणी सांगितलं म्हणून नाही, स्वतःला वाटलं म्हणून केलं. ‘स्वतःचं ऐकणं’ ही याकाळातील पहिली महत्वाची अट ठरवून घेतली. बाकी चिंता सोडून दिल्या. ऑफिसला गेले नाही आता ते काय म्हणतील, पुढे काय होईल, हा विचारही काढून टाकला. रडणं कमी कमी होत गेलं. 

पुस्तकात रमल्यावर मनस्थिती बदलत गेली आणि एक दिवस रडणं कायमचं थांबलं.
अर्थात या दिवसात काही मोजक्या लोकांनी सोबतही केली. कुणी कौन्सिलर सुचवले कुणी आणखी काही. कुणीही अमुकच कर अशी जबरदस्ती केली नाही. 
पण, आम्ही सोबत आहोत, हा विश्वास दिला. 
विनाअट सोबत राहण्याची त्यांची ही कृतीच माझ्यासाठी खूप मोठं औषध होती. 
दु:ख, निराशा, राग, या सगळ्या मानवी भावनाच आहेत. त्यांना नकारात्मक म्हणून आपण त्यांच्यावर कायमची फुली मारू शकत नाही. वाईट वाटणं, रडायला येणं, दु:खी होणं, चिडचिड होणं, हे सगळं नॉर्मल आहे. २४*७ आपण फक्त आनंदी नाही राहू शकत. 
चंचलता हाच मानवी मनाचा स्थायीभाव आहे. ते कधी उदास होणार तर कधी उत्साहानं ओसंडून वाहणार. त्याची दोन्ही रूपं तितक्याच आत्मीयतेनं स्वीकारता आली पाहिजेत. ज्या भावनेतून जात आहोत ती स्वीकारल्याशिवाय ती बदलता येत नाही. हे मात्र या अनुभवावरून कळलं. 
जगात दु:ख आहे आणि या दु:खावर उपायही आहे. WHOच्या अहवालानुसार नैराश्यग्रस्त लोकांचा देश म्हणून भारताचा तिसरा क्रमांक लागतो. म्हणजे निराश असणारे काही आपण एकटेच व्यक्ती नाही.  
या अनुभवानंतर, “काय झालंय मुळूमुळू रडायला?” असं मी तरी कोणाला विचारणार नाही.
सकारात्मक राहण्याचा सल्ला देताना किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःवर आणि इतरांवरही जबरदस्ती करण्याची गरज नाही. अशी जबरदस्ती करणारे कुणी असतीलच तर त्यांचं काहीही मनावर घ्यायचं नाही. 
अशा मानसिकतेतून तुम्हीही जात असाल, गेला असाल तर आपल्याला फार काही तरी गंभीर आजार आहे असं मानायची गरज नाही. निराशा आली म्हणजे आपण आता जगूच शकणार नाही किंवा आपली स्वप्न पूर्ण करूच शकणार नाही, असंही नाही. 
सगळ्यात महत्वाचं नकारात्मक असलो काय किंवा सकारात्मक असलो काय आपण आपल्यासाठी महत्वाचे आहोत. ‘स्वतःचा हात सोडायचा नाही,’ एवढं सूत्र पाळलं तरी पुष्कळ आहे. दिवस बदलतात. भावना बदलतात तसे आपणही बदलतो. बदलावर विश्वास ठेवा.

©मेघश्री

Post a Comment

0 Comments