स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणं नक्कीच तुमच्या हातात आहे.

स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणं नक्कीच तुमच्या हातात आहे.
आयुष्यात नेहमीच हव्या त्या गोष्टी हव्या तेव्हाच मिळतील असं नाही. गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की, उदास वाटणं, हुरहूर लागणं, असुरक्षित वाटणं साहजिक आहे. सतत जर नकारात्मक विचारात गुरफटून राहिलो तर समोर असलेल्या परिस्थितून कसा मार्ग काढावा हे कळणार तर नाहीच उलट ती आणखीन बिघडण्यास हातभार लागू शकतो. म्हणून सकारात्मकता ही जाणीवपूर्वक निवडावी लागते. एखाद्या परिस्थितीत सकारात्मक राहणं ही तारेवरची कसरत आहे. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास मार्ग सापडत जातात. मग निवडणार काय सकारात्मकता की नकारात्मकता, तुम्हीच ठरवा.

नकारात्मक विचारात गुरफटला तर तुमचा स्ट्रेस वाढेल, ज्याचे तुमच्या शरीरावर, आरोग्यावर, मानसिकतेवर, तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सकारात्मकता निवडलीत तर आहे त्यातही शांत, आनंदी आणि समाधानी राहण्याचा फायदा होईल. सकारात्मक राहा, म्हणजे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून शेख चिल्लीसारखे अवास्तव स्वप्नांचे मनोरे रचा असा होत नाही.  तर तुम्हाला तुमच्या समस्यांची जाणीव असली पाहिजे पण त्यावर उपाय काढण्याच्या दिशेने तुमचे जास्त प्रयत्न झाले पाहिजेत. समस्येतून बाहेर पाडण्यासाठी आपल्याला आपली पूर्ण ताकद लावता यायला हवी आणि ती तेव्हाच लावता येते जेव्हा तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा असेल.

समजा तुमची नोकरी गेली. तर अर्थातच तुम्हाला वाईट वाटणार, दुख होणार, भविष्याची चिंता वाटणार. मग तुम्ही आता दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठे व्हॅकन्सी आहे का बघावे लागेल. तिथे मुलाखत द्यावी लागेल. आत्मविश्वास ठेवावा लागेल. हा झाला सकारात्मक दृष्टीकोन. पण, आता नोकरी गेली म्हणजे आपलं कसं होणार? दुसरी नोकरी कधी मिळणार? ती कुठे आणि कशी मिळणार? तिथे मला काम जमेल का? असे नकारात्मक विचार कराल तर या परिस्थितीत तुम्ही आणखी गुरफटत जाल.
सकारात्मक राहण्याचे कौशल्य विकसित करायाचे असेल तर काही गोष्टी तुम्हाला अंमलात आणाव्या लागतील. या गोष्टी जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्या तर नक्कीच तुमच्यात सकारात्मक दृष्टीकोन रुजेल. कोणी तरी येऊन जादूची कांडी फिरवेल आणि आपला दृष्टीकोन बदलेल असं होत नाही. त्यासाठी या काही साध्या साध्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर... नक्कीच सकारात्मकता आपल्या अंगी रुजेल.

१)    चांगलं ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न
१००% मधील ९९% गोष्टी चांगल्या असल्या आणि त्यात १%जरी काही खोट निघाली तर आपण तेच मनात धरून बसतो. हा मानवी स्वभाव आहे. हो सगळं खरं पण... आणि मग हा पण मारुतीच्या शेपटीसारखा वाढत जातो.
म्हणून परिस्थितीची जी चांगली बाजू माहिती आहे ती ध्यानात घेऊन वाटचाल करा. नकारात्मक बाजू आहे पण तिच्याशी तडजोड केली जाऊ शकते किंवा ती बदलण्यासाठी नंतर प्रयत्न केले जाऊ शकतात. सध्या महत्वाचं आहे ते काम सुरू ठेवणं. ही एक गोष्ट जरी ध्यानात घेतली तरी, तुम्हाला चांगलं आणि वाईट यामधील फरक ओळखून चांगल्याबाजू जमेत घेऊन काम करण्याची सवय लागेल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत सकारात्मक राहू शकाल.




२)    सकारात्मक राहण्यासाठी सकारात्मक असल्याचे नाटक करा.
‘दिवास्वप्न’ हा प्रकार काही आपल्यासाठी नवा नाही. इथे आपण काय करतो, आपल्या कल्पना वापरून एखादा प्रसंग, परिस्थिती याबद्दलचे भविष्य
रंगवत असतो. किंवा भूतकाळातील एखाद्या गोष्टी बाबत उगीचच असं झालं असतं तर तसं झालं नसतं असले खेळ खेळत असतो. जे अर्थातच निरर्थक, अनुत्पादक असतात. याच कौशल्याचा वापर करून आपण एखाद्या परिस्थितीतून आपल्याला मार्ग मिळाला आहे, ही परिस्थिती बदलली आहे, अशी सकारात्मक कल्पनाही करू शकतो.
उदा. तुम्ही जर नोकरी नाही म्हणून चिंतेत असाल आणि आता त्यामुळे आपलं कसं नुकसान होईल, किती भयंकर परिस्थिती उद्भवेल याची कल्पनाचित्रं रंगवत असाल तर हीच ऊर्जा उलट्या दिशेने वापरा. आपल्याला नोकरी मिळेल, तिथे आपण चांगलं काम करू, आपल्याला नव्या गोष्टी शिकायला मिळतील, अशा कल्पना केल्यानं तुमचं बिघडणार काही नाही पण, मनावरील ताण कमी नक्कीच कमी होईल.

३)    उपाय शोधण्यावर लक्ष द्या-
समस्या तर सर्वांना असतात. सगळीकडे असतात. यावर उपाय काय? हा विचार जास्त महत्वाचा. समस्या निर्माण झाली म्हणून हतबलता अनुभवणे साहजिक आहे. पण तुम्ही जितके हताश, हतबल व्हाल तितकी निराशा तुम्हाला ग्रासत जाईल.
समस्येवर मात करण्याची, त्यातून बाहेर येण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्हाला तिचा शोध घ्यायचा आहे. तिचा वापर करायचा आहे. समस्येतूनही नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. त्यासाठी तयार राहायचं आहे.

४)    संयम विकसित करणे, सकारात्मकतेची पहिली पायरी –
सकारात्मक झालात म्हणून लगेच समस्या जादूसारखी गायब झाली असं होणार नाही. त्यासाठी काही कृती करणेही महत्वाचे आहे. केलेल्या गोष्टी कितपत यशस्वी होतात, त्यातून काय निष्पत्ती निघते हे पाहण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. बऱ्याचदा तुमचे निर्णय फसतील, चुकतील अशावेळी पुन्हा एकदा तुम्ही स्वतःला दोष देत नकारात्मक होण्याची शक्यता असते. तेव्हा पटकन हताश न होता, तुम्हाला काही वेळ संयम ठेवावा लागेल. एकावेळी एक निर्णय, एकावेळी एकच काम, अशा पद्धतीने गोष्टी पूर्ण कराव्या लागतील.

५) प्रयत्न सोडू नका-
तुमचं नकारात्मक मन तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल. आपण हे करू शकत नाही, असंही कित्येकदा वाटेल. स्वतःबद्दल साशंक व्हाल. पण, लक्षात ठेवा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्ही जो विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता. जितका नकारात्मक विचार कराल तितके नकारात्मक परिणाम मिळत जातील. म्हणून हार मानण्याऐवजी स्वतःशी सकारात्मक बोला. सकारात्मक बोलण्याचा आणि राहण्याचा प्रयत्न सोडून देऊ नका.


६) स्वतःशी सकारात्मक बोलण्याची सवय लावून घ्या –
आपल्या मनात जो संवाद सुरू असतो, त्याकडे जर कधी लक्ष दिलं तर जाणवेल की या संवादातील बराचसा भाग हा नकारात्मक आहे. आपण जे आपल्याशी बोलतो तेच कुणी इतर बोललं तर आपल्याला एक तर वाईट वाटेल किंवा प्रचंड राग येईल. सकारात्मक राहण्याचा हा एक फायदा होतो की आपण स्वतःशी करत असलेला संवादही चांगला असेल, याकडे लक्ष देतो. जमणार नाही, होणार नाही, करायलाच नको, अशा शब्दाऐवजी करून तर बघू, जमेल, होईल, करायला हवं, अशी सकारात्मक शब्द आपल्याला प्रेरणा देत राहतात. ज्यामुळे तुमचा ताणाव कमी होतो. तुम्हाला काम करण्याचा उत्साह येतो.

७) विनोदी दृष्टीकोन आत्मसात करा-
गंभीर राहिल्याने आयुष्यातील समस्या सुटणार नाहीत. म्हणून कधी कधी हलका फुलका विनोद करत राहावं. हसण्यासारखी एखादी तरी गोष्ट रोज करा. स्वतःवरच विनोद करा. हसत राहिलात तर आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न राहील.

८) सकारात्मक लोकांसोबत रहा-
सकारात्मक विचार करण्यासाठी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं खूप महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला ज्या प्रकारचे लोक राहतात, त्याच प्रकारची आपली मानसिकता बनते. तुमच्या भोवताली जर तुमच्याबद्दल नकारात्मक बोलणारी माणसं असतील तर यामुळे तुम्हीही नकारात्मक बनू शकता. म्हणून सकारात्मक लोक शोधा, त्याच्याशी संवाद करा.

९) नकारात्मक लोकांना टाळा-
नकारात्मक बोलणाऱ्या लोकांमुळे आपणही नकारात्मक विचार करू लागतो. अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. अशा लोकांशी बोलण्यात तुमची शक्ती जर वाया जात असेल तर तुमच्या हातून महत्वाची कामं होत नाहीत. सतत उदास वाटत राहतं. म्हणून जे कोणी नकारात्मक लोक असतील त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. अर्थात, प्रत्येक नकारात्मक व्यक्तीवर आपण फुली नाही मारू शकत. कधी कधी या व्यक्ती म्हणजे कुणी कुटुंबातील सदस्यही असू शकतात. तर अशा व्यक्तींशी आपल्या महत्वाच्या गोष्टी बोलणं टाळा. त्यांनी कितीही नकारात्मक शेरे दिले तरी त्याकडं शक्य तितकं दुर्लक्ष करायला शिका.



१०) सकारात्मक विचार वाढवण्यासाठी कृतज्ञता –
सकारात्मक राहण्यासाठी कृतज्ञतेचा फार मोठा फायदा होतो. आयुष्यातील समस्या, अपयश आणि निराशाच चघळत राहण्यापेक्षा आयुष्यात कमावलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहिल्यानं मनाला समाधान मिळतं. कोणकोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करू शकता अशा गोष्टींची यादी करायला घ्या. ही यादी करताना लक्षात येतं की, जितकं आपण समजत असतो तितकी आपली परिस्थिती नश्चितच वाईट नाही. ती वाईट दिसते कारण, जमेच्या गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात. त्यांची कधी कदर केलेली नसते.
दररोज तुमच्या डायरीत कृतज्ञता नोंदवण्याचा प्रयत्न करा. यामुळे सकारात्मक राहण्यात मदत होते. आपण आयुष्यात बरंच काही करू शकतो, हा आत्मविश्वास कृतज्ञतेतूनच निर्माण होऊ शकतो.

११) फक्त वर्तमान काळाचा विचार करा –
भूतकाळात होऊन गेलेल्या चुकांवर पश्चाताप करत राहिल्याने हातात फक्त नैराश्य राहील. सतत भविष्याचा विचार केलात तर मन चिंतेने ग्रासून जाईल. पण, वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यास चिंता आणि नैराश्य दोन्ही टाळून, सकारात्मक राहता येईल.
मनाला सतत वर्तमानात ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीही मन लावून कराव्या लागतील. आपण आपल्या भविष्यासाठी प्रयत्न करत आहोत, ही भावना मनाला समाधान देते.

१२) निवांत राहायला शिका –
सकारात्मक राहिलात तरच तुम्ही तुम्हाला हवं ते यश प्राप्त करू शकता. त्याशिवाय तर तुम्ही तुमच्या प्रवासाचा अंतिम टप्पा गाठू शकत नाही. तुमचं इच्छित ठिकाण गाठण्यासाठी तुम्ही जो काही प्रयत्न करता त्या प्रत्येक छोट्या प्रयत्नात मिळणाऱ्या छोट्या यशासाठी स्वतःचं कौतुक करा. छोटी छोटी ध्येये गाठत तुमचे मोठे स्वप्न पूर्ण करा. हे करताना मन शांत आणि निवांत राहील, याकडेही लक्ष द्या. मनाची स्थिरता आणि शांतता हरवून आपल्याला संपत्ती, यश, प्रसिद्धी मिळाली तरी, त्याचा काही उपयोग होणार नाही. निवांत राहण्यासाठी ध्यानधारणा करण्याचा फायदा होईल. ध्यान केल्याने मन शांत होते. विचारांचा गोंधळ कमी होऊन त्यातील स्पष्टता दिसू लागते. आपले शरीर, मन आणि आत्मा तिघांनाही विश्रांतीची गरज असणार आहे. निवांतपणा अनुभवण्यासाठी एखादा तरी छंद जोपासा. दिवसातील थोडा तरी वेळ हा खेळ, मेडिटेशन, पुस्तक वाचन अशा तुमच्या आवडत्या छंदाला द्या.

सकारात्मक विचार रुजवण्यासाठी हे सगळे प्रयोग तुम्हाला उपयोगी पडतील. तुम्ही 
परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा दृष्टीकोन बदलू शकता. यातच खरं सुख सामावलेलं 
आहे. सकारात्मक विचार करायला लागता तेव्हा, तुम्ही स्वतःकी कदर ओळखता. 
तुमच्या क्षमतांची तुम्हाला जाणीव होते. उणीवांवर मात करण्याची कुवत निर्माण होते. 
म्हणून जेव्हा केव्हा नकारात्मकता की सकारात्मकता अशी निवड करण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही दुसऱ्या पर्यायाला जास्त प्राधान्य द्याल. नक्कीच!

मेघश्री 💓

Post a Comment

0 Comments