नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?


“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.”

“नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.”

वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो.

बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो.



विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो.

खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल.  

२४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नकारात्मक विचारांचा आपल्यावर कमीत कमी परिणाम होईल हे पाहणं मात्र कुणालाही जमू शकतं.

यासाठी आपण तीन पर्यायांचा विचार करणार आहोत

पहिला – नकारात्मक विचार ओळखणे – Being aware of toxic thoughts

दुसरा – नकारात्मक विचारांचा ताबा घेण्यासाठी काम करणे – working to release toxic thoughts

तिसरा – आपला दृष्टीकोन बदलणे – changing perception

नकारात्मक विचार (negative thoughts) आपल्या आरोग्यासाठीही घातक असतात. आपले मन आणि शरीर दोन्हीही एकमेकांवर परिणाम घडवून आणतात म्हणूनच नकारात्मक विचारांचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावरही नकारात्मक परिणाम दिसून येतो. म्हणून आपण नकारात्मक विचारांपासून शक्य तितक्या लवकर सुटका करून घेतली पाहिजे किंवा नकारात्मक विचारांनी आपल्या मनाचा, मेंदूचा आणि शरीराचा ताबा घेण्याआधी त्यांना हुसकावून लावलं पाहिजे.



यासाठी आधी नकारात्मक विचार ओळखावे लागतील –

आपल्या मनात आपल्या नकळत अनेक नकारात्मक विचार चालू असतात ज्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो, आपल्या वागण्या-बोलण्यातूनही तो परिणाम जाणवतो पण तो फक्त आपल्याला कळत नाही. नकारात्मक विचार कसे असतात हे ओळखायलाही अनेकांना जमत नाही. नकारात्मक विचाराचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे वर्गवारी करता येईल.

घाईघाईने निष्कर्ष काढणे

काल्पनिक अंदाज बांधणे

परिस्थितीचा बागुलबुवा करणे

शिक्का मारणे

‘च’ चा अतिरिक्त वापर

भावनिक तर्क

न्यूनगंड / स्वचिकित्सा

या सर्व प्रकारचे विचार हे नकारात्मक आणि toxic असू शकतात. सगळ्यात महत्वाची आणि सामान्य बाब म्हणजे हे विचार अतार्किक असतात. एखादी परिस्थिती ही ‘अशीच’ असली पाहिजे या अतार्किक विचारातून नकारात्मक विचार जन्माला येतात.

लहानपणी आपण ज्या पद्धतीने विचार करायला शिकलेले असतो त्याचाही नकारात्मक विचारांशी घनिष्ठ संबंध आहे. काही काही लोकांचं बालपणच अतिचीकीत्सा करणाऱ्या, सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात गेलेलं असेल तर अशा लोकांचा self-talk हा नकारात्मक असणार यात वाद नाही. पण, प्रयत्न पूर्वक हा self-talk बदलाल जाऊ शकतो.

‘या नोकरीसाठी मी अर्ज केला पाहिजे.’ असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तो नक्कीच सकारात्मक असतो. पण, यानंतर लगेचच तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो आणि तुम्ही पण, ‘ही नोकरी मिळाली नाही तर?’, ‘मी सिलेक्ट झाले नाही तर?’, असे अवास्तव तर्क करू लागता तेव्हा इथे नकारात्मक विचार सुरू होतात. जे तुम्हाला नोकरी मिळवण्याच्या तुमच्या इच्छेपासून दूर घेऊन जातात. कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करताना नेहमीच हे होत असेल तर तुमच्या विचारांची दिशा बदलली पाहिजे. आपण नकारात्मक विचार करतो आहोत हे ओळखता येणंच यातली पहिली आणि महत्वाची पायरी आहे.


या आणि अशा प्रकारच्या विचारांचा एकच परिणाम होऊ शकतो आणि तो म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही. कारण, तुमचे विचार हे चुकीच्या गृहीतकांवर आधारलेले आहेत. जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवतात. परिस्थितीचा घाईघाईत अर्थ लावणे, झटकन निष्कर्षापर्यंत पोहोचणे, ठाम मत बनवणे, या सगळ्याचा तुम्हाला मोठा फटका बसतो. बाऊ करण्याने तर तुम्ही फक्त गर्भगळीत होऊ शकता बाकी काही नाही. भावनिक तर्क लावल्याने तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते.

जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुमचे विचार हे याच पठडीतून जात आहेत तेव्हा आधी ते लिहून काढण्याचा प्रयत्न करा. हे विचार लिहून काढताना ते किती अतार्किक, अवास्तव आणि काल्पनिक आहेत हे तुम्हालाच दिसून येईल. एकदा लिहून काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, या विचारांचा तुमच्यावर कसा आणि किती परिणाम होतो. त्यानंतर नक्कीच तुम्ही स्वतःहून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल.

परिस्थिती किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल ठाम मत बनवण्यापूर्वी, हे मत तुम्ही कोणत्या विचारांच्या आधाराने बनवत आहात याची तुम्हाला जाणीव होईल. या विचारांचं मूळ कशात आहे हे समजल्यावरच तुम्ही ते विचार उपटून टाकण्याचा प्रयत्न करू शकाल.

नकारात्मक विचारांचा ताबा घेण्यासाठी काम करणे

एकदा का नकारत्मक विचार आणि त्यांचं मूळ शोधता आलं की तुम्ही हे नकारात्मक विचार पळवून लावू शकता. यासाठी तुम्हाला self-improvement techniques शोधाव्या लागतील आणि त्या वापराव्या लागतील.

तुमच्यातील नकारात्मकतेला खतपाणी घालणारे कोणती तत्वे तुम्ही जपली आहेत ते आधी पडताळून पहा. ही तत्वे खरच उपयोगी पडणारी आहेत की नुसतीच मनाचा गोंधळ वाढवणारी आहेत हेही तपासून पहा. तुमच्या self-talk चा अधिकाधिक भाग हा फक्त self-criticize करण्यात जात असेल तर त्याचं कारण शोधा. आपल्या हातून होणारी प्रत्येक गोष्ट ही परिपूर्णच झाली पाहिजे, आपण नेहमीच इतरांपेक्षा चांगली कामगिरी केली पाहिजे, या अवास्तव अपेक्षा तुम्हाला प्रगतीकडे नेत नाहीत तर तुमच्यातील न्यूनगंडाला खतपाणी घालतात. म्हणून एखादं काम करताना तुमच्या हातून चूक झाली, गोंधळ उडाला, काम वेळेत पूर्ण झालं नाही तरी, त्याचा स्वीकार करा. इतरांशी स्पर्धा, तुलना, इर्षा करण्यापेक्षा त्या लोकांकडून आपल्याला काय शिकता येईल हे पहा.

जेव्हा जेव्हा तुमच्या मनात स्वतःबद्दल न्यूनगंड वाढवणारे विचार येतील तेव्हा, सगळं काही मी एकट्यानेच केलं पाहिजे असं आहे का? सगळं अगदी ‘ओकेच’ झालं पाहिजे असं आहे का? अशा प्रकारचे प्रश्न विचारा... हवं तर यासाठी इतरांची मदत घ्या.

परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा त्यातून मार्ग काढण्यासाठी काही नवी शक्कल लढवता येते का पहा. काही मार्ग सापडतो का त्यावर विचार करा. तुम्हाला मार्ग सापडला नाही किंवा तुम्हाला परिस्थिती हाताळता आली नाही म्हणून काही फार मोठं नुकसान होणार नसतं. परंतु परिस्थितीचा बाऊ केल्याने विनाकारण तुम्ही त्रेधातिरपीट उडू शकते. तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ढासळू शकतं. तेव्हा परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा ती हाताळण्याचे वेगवेगळे मार्ग शोधा आणि शक्य तिथे इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.

 आपला दृष्टीकोन बदलणे  -

अनेकदा परिस्थितीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण आपलं एक ठाम मत बनवलेलं असतं जे आपण कधीच तपासण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळेही कधीकधी परिस्थिती सुधारण्याऐवजी चिघळत जाते. ‘माणसं अशीच असतात’, ‘या परिस्थितीत असंच घडलं पाहिजे’, अशी काही गृहीतकं आपण स्वत:च ठरवलेली असतात ज्यामुळे आपला दृष्टीकोन नकारात्मक बनतो. परिस्थिती असो किंवा व्यक्ती तिच्याबद्दल घाईघाईत मत बनवण्यापेक्षा थोडा वेळ घ्या. कधीकधी अशा नकारात्मक गृहीतकांवर बनवलेल्या आपल्या मतामुळे आपण इतरांना toxic वाटू शकतो.

सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल काही तरी ढोबळ अनुमान काढून त्यानुसार वागण्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. स्वतःची इतरांशी नाहक तुलना करण्याची सवय लागते. ज्यामुळे आपल्या न्यूनगंडात आणखी भर पडते. हे वागणं तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायक ठरू शकतं. इतरांपेक्षा वेगळं असणं, वेगळं काही तरी करणं चुकीचं नाही पण, त्यासाठी स्वतःला सतत धारेवर धरणं, इतरांशी तुलना करत राहणं, मात्र धोक्याचं ठरू शकतं.

यासाठी नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर त्यासाठी स्वतःला फोर्स करू नका. इतरांशी तुलना करणं, इतरांबद्दल ठाम मत बनवणं या सगळ्यामुळे तुम्हाला फक्त ताणताणाव आणि दु:खच  मिळू शकतं. त्याऐवजी तुमची बलस्थानं ओळखून ती वाढवण्याचा, त्यानुसार काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच त्याचा फायदा होईल.

नकारात्मक विचार येणं ही एक स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्ट आहे. अट्टाहासाने नकारात्मकता दूर होत नाही हेही तितकंच खरं आहे. यासाठी स्वतःचा स्वीकार आणि इतरांशी जुळवून घेण्याची कला शिकली पाहिजे. स्वतःतील गुणांचा अधिकाधिक विकास कसा करता येईल यावर जरी भर दिला तरी मनातील नकारात्मकता कमी होऊ शकते. नकारात्मक विचारांना ओळखून त्यांना दूर करणं सोपं आहे, त्यासाठी जागरूकता हवी. जागरूकता येण्यासाठी ध्यान करणं, ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती अभ्यासणं गरजेचं आहे.



 

नकारात्मक विचार पळवून लावताना शक्य तितका आत्मस्वीकार (self-acceptance) करण्यावर भर दिला पाहिजे.

 

 

 

 

 

Post a Comment

2 Comments

खूप छान माहिती मिळाली..
Nikhil khedkar said…
एकदम सुंदर