दुपारची पेंग टाळण्यासाठी या ट्रिक वापरून पहिल्यात का?


सकाळी उठून आवरल्यानंतर आपण ऑफिससाठी बाहेर पडतो. सकाळी सकाळी दिवसाची चांगली सुरुवात झालेली असते. आज ऑफिसमधील कामं अजिबात रेंगाळत ठेवायची नाहीत... असा निश्चय केलेला असतो. लंचब्रेक होईपर्यंत हा उत्साह आणि निश्चय अगदी नेटाने रेटत नेलेला असतो. दुपारी लंचब्रेक झाला आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली की या उत्साहाच्या फुग्यातली हवा हळूहळू कमी व्हायला लागते. डोळे अपोआप जड होऊ लागतात. इतके जड होतात कधी मिटतात हे आपल्यालाच कळत नाही. दुपारची ही पेंग कितीही नकोशी असली तरी, ती आपला पिच्छा पुरावाल्याशिवाय राहत नाही.

काम करण्याचा उत्साह अगदी मावळून गेलेला असतो आणि एक छानशी डुलकी काढण्याचा मोह अनावर होतो. पण ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अशी डुलकी घेण्याची परवानगी नसते त्यामुळे अगदी नाईलाजाने आपण स्वतःला जुंपून घेतो. एखाद दिवस असं झालं तर ठीक पण, जर हेच रुटीन राहिलं तर याचा तुमच्या परफॉर्मन्सवर आणि एकूणच आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.

दुपारचीही झोप टाळण्यासाठी काय करता येईल याचा कधी विचार केलाय का? नसेल तर इथे दिलेल्या काही टिप्स फॉलो करता येतात का पहा... याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

दिवसा आनाहुतपणे येणारी ही पेंग किंवा डुलकी ‘का येते?’ हे आधी समजून घेतलं पाहिजे. यामागं आपल्या daily routine पासून ते रोजच्या जेवणापर्यंत अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. दिवसा येणारी डुलकी टाळायची असेल तर रात्री गाढ झोपण्याचा प्रयत्न करा.

१)      रात्री पुरेशी झोप घ्या –

रात्री लवकर झोपा आणि किमान आठ तासाची झोप मिळेल याकडे लक्ष द्या. अनेकदा आपण एक्स्ट्राची काही कामे उरकण्यासाठी एक तर सकाळी लवकर उठतो किंवा रात्री उशिरा पर्यंत जागतो. परंतु निरोगी आरोग्यासाठी आपल्याला किमान आठ ते नऊ तासाची झोप आवश्यक आहे. त्यामुळे झोपेसाठी काहीही करून आठ तास राखीव राहतील याचं नियोजन करून ठेवा. आठ तासाची झोप झाल्यानंतरच दिवसभराच्या कामाचं नियोजन करा. सात ते आठ तास झोपेसाठी कुठून आणायचे असा प्रश्न पडत असेल तर दिवसभरची कामं लवकर कशी उरकता येतील याकडे लक्ष द्या. काही वेळ असाच रेंगाळण्यात जात असेल तर तो कसा manage करता येईल हे ठरवा.


२)     झोपण्यापूर्वी मन शांत करा –

युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या अॅव्हिलिनो व्हार्सिलीस यांच्या मते आपला बेड हा फक्त सेक्स आणि झोप यासाठीच राखीव असला पाहिजे. म्हणजे बेडवर पडल्या पडल्या झोप येत नाही म्हणून फोन घेऊन बसणे, लॅपटॉपवर काम करणे, वादग्रस्त विषयावर जोडीदाराशी चर्चा करणे किंवा अगदी पुस्तक वाचणे, यापैकी कुठलंही काम तुमच्या झोपेत अडथळा निर्माण करू शकतं. झोपी जाण्यापूर्वी ताणाव वाढेल असं कोणतंच काम करायचं नाही. म्हणून बेडवर फक्त झोपायचंच.

३)      झोपण्याची आणि उठण्याची विशिष्ट वेळ पाळा –

ज्यांना झोप न येण्याची किंवा निद्रानाशाची समस्या असते त्यांना नेहमीच हा सल्ला दिला जातो की, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. परंतु झोपण्याची ही ठराविक वेळ पाळणं सगळ्यांनाच जमत नाही. विशेषत: ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांना तर अजिबात नाही. म्हणून वेळेवर झोपण्याचा आणि उठण्याचा अट्टाहास न करता आधी गाढ झोपेत जाण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू रुटीन बसवण्यासाठी प्रयत्न करावा.

४)     जेवणाची वेळ आणि सकस आहार –

फक्त झोपच नाही जेवणाची ठराविक वेळ पाळणं आणि सकस आहार घेणंही गरजेचं आहे. आपल्या आहारात जास्त fat असलेले पदार्थ टाळा. सकाळचा पौष्टिक नाश्ता आणि दुपारचे जेवण खूप महत्वाचे आहे. एक कप चहा बिस्कीट किंवा टोस्ट, याने तुमचा दिवस चांगला जाणार नाही आणि त्याचा तुमच्या शरीराला काही फायदाही होणार नाही. त्याऐवजी सकाळी पोटभर चपाती भाजी आणि दुपारच्या वेळी पूर्ण जेवण घेतलेलं कधीही चांगलं.

आपला आहार सकस, पौष्टिक आणि संतुलित असावा याकडे लक्ष दिल्यास दिवसभर आपली एनर्जी टिकून राहील.

५)     व्यायाम –

दिवसभर आपला उत्साह आणि एनर्जी टिकून राहावी असं वाटत असेल तर, दिवसातून १०-२० मिनिटं तरी तुम्ही व्यायामाला द्यायला हवीत. सकाळच्या वेळेत तुम्ही ३० मिनिटासाठी फिरायला गेलात तरी दिवसभर तुम्हाला याचा चांगला परिणाम मिळेल. व्यायाम केल्याने पचनशक्ती सुधारते आणि जेवणातून अधिक पौष्टिक तत्व शोषली जातात. थोडा वेळ उन्हात घालवल्यास त्याचाही फायदा होईल.

६)     जागरण टाळा –

कामं उरकण्यासाठी किंवा आणखी कोणत्याही कारणाने म्हणून रात्रीचं जागरण करत असाल, तर हे पूर्णतः टाळा. पूर्ण झोप आल्याशिवाय झोपण्याची घाईही करू नका. दिवसाची कामं लवकर उरकून झोपण्यापूर्वीचा काही वेळ मनाला शांत करण्यासाठी वापरा. या वेळेत वाचन, टीव्ही, मोबाईल, गप्पा, काहीही करू नका. झोपी जाण्यापूर्वी जर थोडावेळ mindful meditation करता आलं तर याचा नक्कीच फायदा होईल. झोप शांत लागेल.मनातील विचारांचा गोंधळ कमी होईल आणि त्यामुळे शांत, गाढ झोप लागेल.



७)    गरज लागल्यास वैद्यकीय मदत घ्या –

दिवसाची पेंग येणं हे कधीकधी मानसिक तणावाचं, नैराश्याचंही लक्षण असू शकतं. तेव्हा तुम्हाला ही समस्या जास्तच गंभीर वाटत असेल तर, therapist किंवा counsellor मदत घ्यायला हरकत नाही. मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. क्षुल्लक बाब म्हणून या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका.

Therapist तुमच्या झोपे विषयक समस्या जाणून घेऊन त्यानुसार तुम्हाला आवश्यक ते उपचार सुरू करतील. निद्रानाश, अपुरी झोप किंवा गाढ झोप न लागणे यासारख्या समस्या योग्य त्या उपचारांनी बऱ्या होऊ शकतात.

८)     भरपूर पाणी प्या –

दुपारच्या वेळेत आपण पोटभर जेवल्यानंतर आपले शरीर अन्न पचवण्याच्या कामाला लागते. ज्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. शरीराला लागणारी ही ऊर्जा कमी पडली की आपले शरीर थकल्याची लक्षणे दाखवते. त्यामुळे डोळे जड होणे, जांभया येणे, पेंग येणे अशा गोष्टी सुरू होतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावरही शरीर अशीच लक्षणं दाखवतं. त्यामुळे दुपारच्या वेळेत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कदाचित पाण्याची गरज भागल्यावरही तुमची ही पेंग उडून जाऊ शकते.

९)     शक्य असल्यास फेरफटका मारा –

दुपारच्या वेळी फारच झोप येत असेल तर उठून थोडा अंतर चालून या किंवा आहे त्याठिकाणी स्ट्रेचिंग सुद्धा करू शकता. याने तुम्हाला थोडं ताजतवानं वाटेल आणि तुम्हाला पुन्हा काम करण्याचा उत्साह येईल.

 

या काही टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. पण, तुम्हाला काही शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर तो दूर होणार नाही. तेव्हा तज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन घेण्याची टाळाटाळ करू नका.

 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments