तुम्हालाही संताप अनावर होतो? तो आवरण्यासाठी काय कराल?


तुम्हालाही संताप (chronic anger) अनावर होतो? तो आवरण्यासाठी काय कराल? 

भावना प्रत्येकाला असतात. अगदी प्राण्यांनाही. प्रत्येक माणूस भावनिक असतो. भावनांच्या एकत्रीकरणातूनच माणसाचं व्यक्तीमत्व तयार होत असतं. आपण अनेकदा माणसाचं वर्णन त्याच्यातील प्रबळ भावनेवरूनच करतो, तो रागीट आहे, ती प्रेमळ आहे, तो हसरा आहे, ती बोलकी आहे, वगैरे...




पण अनेकदा भावनांचा तोल सांभाळता आला नाही की, याच भावना विकृतीच्या रुपात आपल्यात घर करून राहतात. ही वकृती कधी आपला ताबा घेते ते लक्षातही येत नाही. भावना प्रत्येकाला व्यक्त करता येत नाहीत. एखादी गोष्ट मनात दीर्घकाळ सलत राहिली की, तिचे रुपांतर रागात होते. काही लोकांना राग पटकन येतो,  कारण ही एकमेव अशी भावना आहे जी दबली जात नाही किंवा इतर दबलेल्या भावना याच रुपात उफाळून येतात.

 

काही व्यक्तींच्या मनात अशा दबलेल्या भावनांनी इतके घर केलेले असते की, त्या व्यक्ति सतत चिडचिड करत राहतात. त्यांच्या मनात संताप धुमसत राहतो. हा संताप कधी एखाद्या प्रसंगाबाबत असतो तर, कधी एखाद्या व्यक्तीबाबत. राग किंवा संताप ही एक नकारात्मक भावना आहे. या भावनेचा त्रास जितका खुद्द त्या व्यक्तीला होतो तितकाच तिच्या आजूबाजूच्या लोकांनाही होतो.

बुद्ध म्हणतात, “राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे.”




रागाच्या या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न नाही केले तर हा राग एकदिवस आपल्यालाच खाऊन टाकील.

रागाची पुढची पायरी असते तीव्र निराशा किंवा औदासिन्य ज्याला आपण depression म्हणतो.

आपल्याला प्रमाणाच्या बाहेर राग येतो, रागाच्या भरात आपण कुणाला तरी दुखावतो, नात्यात कटुता आणतो हे अनेकदा आपल्याला कळत नाही. या विघातक भावनेच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी आपल्याला अत्याधिक राग येतो का आणि का येतो हे आधी ओळखता आलं पाहिजे.

राग लवकर कमी होत नाही –

अजिबातच राग येत नाही, असं कुणाच्याच बाबतीत घडू शकत नाही. पण, रागाच्या भरात आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडत असतील किंवा आपला राग लवकर कमी होत नसेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. हा राग कधी कधी महिनोन्महिने असाच धुमसत राहतो. रागापोटी आपण एखाद्या व्यक्तीशी द्वेषपूर्ण वर्तन करतोय हेही आपल्या लक्षात येत नाही.

बराच काळ रागाच्या भरात आपण आपल्याआत घुसमटत राहतो –

दिवसभर आपल्या मनातून संतापाची ही भावना अजिबात कमी होत नाही. आपल्या मनातून राग पटकन जात नाही आणि मग घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपण अजूनच रागराग करू लागतो. रागाच्या भरात अनेक गोष्टी बिघडवून घेतो, ज्यातून पुन्हा राग वाढतो. हे दुष्टचक्र अनेकदा भेदता येत नाही. एखादा दिवस जरी असा संतापजनक गेला तर तुमच्या मानसिक स्थितीत काही तरी बिघाड झाला असून ती दुरुस्त करण्यासाठी वेळ दिला पाहिजे हे जाणून घ्या.

रागाच्या भरात आक्रमक किंवा हिंसक होणे –

अनेकदा व्यक्ति रागाच्या भरात स्वतः वरील नियंत्रण हरवून बसते. रागाच्या भरात इतरांच्या अंगावर धावून जाणे किंवा हाणामारी करणे अशी कृत्ये घडतात. याच टोकाच्या रागातून अनेकदा लोकांच्या हातून गंभीर गुन्हेही घडतात.

संयमाचा अभाव –

एखाद्या ठिकाणी संयमाची गरज असतानाही आपल्याला शांत बसवत नाही. उदा. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. काहीजण स्वतःला त्रास करवून न घेता या परिस्थितीत पुढील गोष्टी कशा हाताळता येतील याच्या नियोजनात लागतात तर, काही जण बाचाबाचीवर उतरतात. तुम्ही जर दुसऱ्या प्रकारातील असाल तर, तुम्हाला मानसिक स्वास्थ्यावर काम करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या.

नात्यात बिघाड –

काही व्यक्तींना बाहेरच्या लोकांशी जुळवून घेताना काही त्रास होत नाही पण, जवळच्या व्यक्तीशी जुळवून घेताना मात्र त्रास होतो. आपल्याला जास्तच गृहीत धरलं जातंय किंवा आपल्याकडे दुर्लक्ष होतंय या भावनेतून आतल्याआत राग धुमसत राहतो आणि नात्यातील कटुता वाढत जाते. अनेकदा समोरच्या व्यक्तीवर सूड उगवण्याची, त्याचा बदला घेण्याची भावनाही वाढीस लागते.

म्हणूनच अतिराग हा आपल्याच नाशाला कारणीभूत होतो, हे लक्षात घ्यायला हवे. यात इतरांपेक्षा आपलंच नुकसान जास्त होतं.

अतिप्रामाणात येणारा हा राग प्रयत्न करून आटोक्यात आणता येतो. तुमच्यातील ही संतापाची भावना शांततेत परिवर्तीत होऊ शकते. त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतील इतकंच.

रागाचं नेमकं कारण ओळखता येणं –

एखाद्या व्यक्तीचा शब्द, कृती किंवा परिस्थिती ज्यामुळे आपल्याला राग येतो ती ओळखता आली पाहिजे. तो नेमका शब्द किंवा नेमकी कोणती कृती आपल्याला उत्तेजित करते हे एकदा समजलं की आपण स्वतःला सावध करू शकतो. आपल्याला उत्तेजित करणाऱ्या या गोष्टी कशा टाळता येतील हेही आपण ठरवू शकतो.

व्यायाम करणं –

राग बाहेर पाडण्यासाठी योग्य ती कृती करणं खूप आवश्यक आहे. आक्रमक होण्यापेक्षा क्रिएतिव्ह व्हा. दररोज व्यायाम केल्यानेही राग कमी होतो. योगासन, प्राणायाम, झुम्बा तुम्हाला आवडेल तो व्यायाम प्रकार निवडा आणि दिवसातील फक्त दहा मिनिटे व्यायाम करा. याने तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल.

ध्यान करणं – 

ध्यान केल्यानं तुमच्या मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो. रागावरही हीच गोष्ट अत्याधिक परिणामकारक ठरते. दिवसातून कुठल्याही वेळी जेव्हा एकांत आणि शांतता मिळेल तेव्हा थोडा वेळ तरी ध्यान करण्याचा प्रयत्न करा.

इतरांची मदत घेणं –

तुमच्या मानसिक स्थितीबद्दल तुमच्या जवळच्या व्यक्तींशी बोलून बघा. गरज पडल्यास कौन्सिलरचीही मदत घेऊ शकता. मानसिक तणावात असताना इतरांची मदत घेणं कधीही चांगलंच. जितक्या लवकर तुम्ही स्वतःवर काम करण्याचा प्रयत्न कराल तितक्या लवकर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि पुढे बिघडणाऱ्या गोष्टी टळतील.

शेवटी, राग ही एक स्वाभाविक आणि नैसर्गिक भावना आहे. गरजेच्या वेळी हेही हत्यार उपसावंच लागतं. पण हा राग जर तुमच्या दैनंदिन गोष्टीत, तुमच्या नात्यांत, तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत असेल तर त्यापासून बाजूला होणं, सावध होणं गरजेचं आहे.

नकारात्मक भावनांना हाताळून मानसिक स्थिरता आणि शांतता मिळवणं हेच आपल्या जीवनाचं पाहिलं उद्दिष्ट असायला हवं.

 

 

 

 

 

 

  

Post a Comment

0 Comments