कनिका टेकरीवाल, अवघ्या ३२व्या वर्षी कोट्यावधींची उलाढाल करणारी बिझनेसवूमन! /Kanika Tekariwal

मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है|

सिर्फ पंखो से कुछ नाही होता, हौसलों सें उडान होती है|

स्वप्न आकाशाला गवसणी घालणारी असतात तेव्हाच वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते म्हणून तर वयाच्या २१ व्या वर्षी कॅन्सरला हरवून २२ व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप सुरु करणारी कनिका टेकरीवाल आज इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. आज जिकडे तिकडे कनिकाचीच चर्चा दिसते आहे. अर्थातच तिची झेपच इतकी उंच आहे की, चर्चा तर होणारच!

google image


अवघ्या ३२ व्या वर्षी दहा प्रायव्हेट जेट जिच्या नावावर आहेत ती कनिका आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. जगातील १०० श्रीमंत महिलांच्या यादीत तिने आपले स्थान निर्माण केले आहे आणि हे करत असताना वाटेतील प्रत्येक अडथळ्यावर तिने यशस्वी मात केलेली आहे.

 

एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आज गाडी, रेल्वे,बस असे कित्येक पर्याय आहेत. त्यातही अति वेगवान पर्याय कुठला तर प्रायव्हेट जेट! पण, हा पर्याय किती लोकांच्या आवाक्यातला आहे? अगदी थोड्या. त्यातही ज्यांना हा पर्याय परवडतो त्यांनाही यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. प्रायव्हेट जेटने प्रवास करण्यासाठी एखादा कमर्शियल एजंट शोधा, मग त्यासाठी पर्सनल पायलट शोधा, दोघांनाही घवघवीत कमिशन दिल्यानंतर जेटचे भाडे भरा इतका सगळा भुर्दंड सहन केल्यानंतर ते जेट सुरक्षितच असेल याची खात्री नाही. या क्षेत्रात पुरेशी पारदर्शकता आणि चार्टर विमानांची अनुपलब्धता यामुळे ग्राहकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अशा सगळ्या बजबजपुरीतून आपण नक्कीच काही तरी मार्ग काढू अशी आशा कनिकाला वाटली आणि तिने प्रायव्हेट जेट क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे ठरवले.

 

google image

या क्षेत्रात नेमके काय करता येईल यावर अभ्यास करण्यात तिने तीन वर्षे घालवली. शेवटी, जेव्हा ती कामाला लागणार इतक्यात तिला कॅन्सर झाल्याचे निदान लागले. आता या संकटातून बाहेर पडल्याशिवाय तरी ती पुढचे कुठलेच काम करू शकत नव्हती. कनिकाने आधी कॅन्सरशी लढा दिला त्यातून बाहेर पडे पर्यंत एक दीड वर्षांचा कालावधी लोटला होता. पण, प्रायव्हेट जेटच्या क्षेत्रात अजूनही काहीही बदल झालेला नव्हता. तिने पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि २०१२ मध्ये जेटसेटगो या आपल्या प्रायव्हेट जेट विमानाचा स्टार्टअप सुरु केला.

 

खरे तर कनिकाला लहानपणापासूनच पायलट होण्याची इच्छा होती. पण कर्मठ मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या कनिकाला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवे असलेले पाठबळ मिळाले नाही. पायलट होता आले नाही म्हणून काय झाले विमानाची मालकीण तर होऊच शकते ना, याच विचाराने तिने हा नवा स्टार्टअप सुरु केला. एका विमानापासून सुरु झालेला हा प्रवास आज दहा विमानावर येऊन थांबला आहे. म्हणून या कंपनीला हवाई उबेर म्हणून ओळखले जाते.

google image


कनिकाच्या जेटसेटगो कंपनीमार्फत प्रायव्हेट एअर टॅक्सीची सुविधा पुरवली जाते. यासाठी इलेक्ट्रिक व्हार्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग (eVTOL) तंत्राचा वापर केला जातो. सोबत आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी स्मार्ट मॅनेजमेंटचा वापर केला जातो.

 

या तंत्राच्या वापराने विमानाचा मेंटेनन्स खर्च देखील कमी होतो, ग्राउंड टाईम कमी होऊन एअर टाईम वाढतो. यातून कंपनीला अधिकाधिक नफा कमवता येतो.

 

कनिकाला या क्षेत्रात अजूनही खूप मोठी झेप घ्यायची आहे. अजूनही प्रायव्हेट जेट किंवा चार्टर विमान ही मुठभर लोकांच्या आवाक्यातीलच गोष्ट आहे. ती अधिकाधिक लोकांना परवडण्याजोगी व्हावी यासाठी कनिका प्रयत्न करणार आहे. जेणेकरून भविष्यात हवाई प्रवास हा सामान्य लोकांच्या आवाक्यात यावा.

 

google image

कनिका एमबीए झालेली आहे. तिचे वडील रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करतात सोबत त्यांची एक केमिकल फॅक्टरी सुद्धा आहे. कनिकाचे शालेय शिक्षण बोर्डिंगमधून पार पडले. मुंबई विद्यापीठातून तिने तिचे ग्रज्युएशन पूर्ण केले आहे.

 

कनिकाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहेच. पण, अवकाशीय पर्यावरण, वातावरणावर याचे काही विपरीत ठसे उमटणार नाहीत याचीही खबरदारी घ्यायला हवी. अधिकाधिक सुखासोयींकडे आपण खेचलो जात असताना, पर्यावरणाला इजा होणार नाही याचीही दक्षता घेणं आपलंच कर्तव्य आहे.


मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

0 Comments