प्रसाद म्हणूनचेन्नईच्या या मंदिरात दिले जाते ब्राऊनी, सँडविच आणि केक....

“समय सबसे बडा जादुगार हैं,”असं म्हटलं जातं ते खरं आहे. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पाहा ना... कधी काळी टीव्ही पाहण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसावं लागायचं आणि आज टीव्ही आपल्या सर्वांच्या हातात आला आहे. (मोबाईलच्या रुपात हो!) अशा किती तरी बदलेल्या गोष्टी तुम्हालाही जाणवत असतील. पूर्वी देवळात गेल्यानंतर शांतपणे देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजारी आपल्या हातावर प्रसाद म्हणून साखर, फुटण्याची डाळ, तीर्थ (साधं पाणीच), किंवा लाडू, खोबरं (असं जे काही भाविकांनी देवाला नैवेद्य म्हणून चढवलं असेल तेच) ठेवायचे. पण, आता या प्रथेतही मोठा बदल होऊ पाहतो आहे.

jaydurgapeetham.org
 चेन्नईतील पेडप्पाई भागातील एका मंदिरात चक्क ब्राऊनी, बर्गर, चेरी टोमॅटो सॅलड आणि सँडविच प्रसाद म्हणून वाटला जात आहे. कहर म्हणजे या प्रसादाच्या पाकीटावर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा शिक्का आणि उत्पादन तिथी, एक्सपायरी डेट देखील छापली आहे.

 पेडप्पाई भागातील जय दुर्गा पिठ्म मंदिरातील फक्त प्रसादाचा मेन्यूच बदलेला नाही तर प्रसाद वाटण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक छापील टोकन दिले जाते. जे टोकन एका व्हेंडिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर त्यातून प्रसाद बाहेर येतो. म्हत्वाचे म्हणजे हा सगळा प्रसाद मंदिराच्याच मुदपाकखान्यात तयार होतो, तोही सोवळ्यात.

 

इथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही कल्पना प्रभावी ठरत असल्याचे इथल्या हर्बल ऑंकॉलॉजिस्ट असलेल्या के श्री श्रीधर यांचे मत आहे. यातून आम्हाला फक्त हे दाखवून द्यायचे आहे की, जे काही पोषक मूल्यांनी भरपूर आणि स्वच्छतेचे नियम पळून बनवले गेले असेल ते सर्व देवाला चालते. फक्त पारंपरिक पदार्थांचाच नैवेद्य म्हणून दाखवला पाहिजे असे काही नाही.

 

wikipedia.org

या मंदिराने आणखीही एक चमत्कारिक पाउल उचलले आहे. एखाद्या दिवशी जर एखाद्या भाविकाचा वाढदिवस असेल त्या दिवशी त्याच्यासाठी खास केक बनवून त्याला प्रसाद म्हणून दिला जातो. यासाठी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची जन्मतारीख मंदिराच्या कंप्युटर सिस्टीममध्ये नोंद केली आहे. विशेषत: वृद्ध भाविकांसाठी तर हा एक आनंदोत्सवच ठरत आहे. कारण, किमान मंदिरात तरी त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवले जात आहेत आणि तिथून प्रसाद म्हणून त्यांच्यासाठी खास केक पाठवला जात आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील या स्पेशल दिवसाला आणखीनच स्पेशल टच मिळत आहे. यात मंदिराने फक्त एकच बदल केला आहे, केक सोबत मेणबत्ती ऐवजी तेलाची पणती (अगर दिपम) दिली जाते.

  देवाचा नैवेद्य ही अनेक ठिकाणी खूपच संवेदनशील बाब मानली जाते. हा प्रसाद कसा बनवावा, कुणी बनवावा यावरूनही बऱ्याच ठिकाणी वाद झाले आहेत. 

निव्वळ जंक फूड प्रसादामध्ये मिळते म्हणून तरुणाई मंदिराकडे आकर्षित होईल, असे वाटते का?

 जंक फूडची क्रेझ वाढत असताना आणि त्याचे अनेक घातक फायदे दिसत असताना मंदिराने स्वीकारलेला हा बदल स्वीकारार्ह आहे की नाही? 

प्रसादाच्या बाबतीत आधुनिकता स्वीकारणारे हे मंदिर स्त्रीप्रवेश आणि मासिक पाळीच्या संदर्भातील आपले मतही बदलेल का? तुम्हाला काय वाटते?

मेघश्री श्रेष्ठी

 

 

Post a Comment

0 Comments