काहीही न करता बसून रहाणं सुद्धा खूप मोठं काम आहे!

कधी कधी सकाळी अंथरुणातून उठावंच वाटत नाही. कुठलंच काम करायला नको दिवस फक्त असाच निवांत असावा...असं वाटणं साहजिक नाही का? दररोज उठून आपण आपलं रुटीन धावपळीचं आणि प्रचंड धकाधकीचं जीवन जगतच असतो. त्यातून एखादा दिवस असा काहीही न करता घालवावासा वाटणं स्वाभाविक आहे. रोजच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येणं ही सामान्य बाब आहे. पण, आपल्याला कामाची इतकी सवय झालेली असते की, काहीही न करता कसं बसायचं? हेच कळत नाही. किंवा आपण बसून राहिलो तर अंगात आळस भरेल, शिवाय कामं तर केलीच पाहिजेत ना? त्याला पर्याय नाही असं म्हणत आपण स्वतःला रेटत नेतो. स्वतःवरच कामाची सक्ती करत राहतो. एखादा दिवस असं स्वतःला अजिबात जबरदस्ती न करता मस्त लोळत काढला जाऊ शकत नाही का?

खरं तर हा प्रश्न बायकांना विचारायला हवा. कारण, असा एखादा दिवस त्याच्या नशिबी येणं म्हणजे स्वर्गीय सुखच. नाही का! रोजच्या कामातून सुट्टी ही हवीच. आपल्या शरीराला आणि मनालाही. काहीही न करू वाटणं, म्हणजे आपल्या शरीरानं आणि आपल्या मनानं पुकारलेलं बंडच असतं. अशावेळी काहीही न करता राहणं ही अवघड आणि काही करणं ही अवघड अशी द्विधा अवस्था होते आणि ती ठीक आहे.

 

अशावेळी निकसेन या डच थेरपीचा चांगला उपयोग होऊ शकतो. डच लोक वर्षानुवर्षे ही पद्धत वापरत आले आहेत. निकसेन म्हणजे ‘काहीही न करणे.’ खरं तर हेच सगळ्यात अनघड काम आहे. काहीही न करता बसून राहिल्यानं मन आणि शरीर सुस्त होईल अशी आपल्याला भीती असते. विश्वास ठेवा कधी कधी काहीही न करण्याचेही बरेच फायदे असतात. मनाला  आणि शरीराला विश्रांती मिळते. आपल्याला नवी ऊर्जा आणि कार्यक्षमता मिळते. आपली नेहमीची कामं करण्याचा उत्साह द्विगुणीत होतो.

 

पण काहीही न करता फक्त बसून राहण्याची कला आपल्याला जमली पाहिजे. जेव्हा कधी तुम्हाला असं काहीही करू नये वाटत असेल तेव्हा खरोखर आपल्या मनाचं ऐकून तसं निवांत राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी निकसेनची कला तुम्हाला उपयोगी पडेल.

 

निकसेन म्हणजे एकाठिकाणी काहीच न करता बसून राहणे आणि मनाला स्वैर सोडणे. खरे तर आठवड्यातील किंवा पंधरवाड्यातील एक दिवस आपण निकसेनची कला अंमलात आणली पाहिजे. मनाला स्वैर सोडून द्यायचं, स्वतःला मनच नाही असं  समजून निवांत बसून रहायचं.

 

अगदीच रिकाम टेकडं बसणं शक्य नसेल तर अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला खुप खूप सवय आहे. जी डोळे बंद करूनही तुम्ही करू शकता.

 

उदा. एखादं गाणं गुणगुणणं, विणकाम करणं, अगदी कागदावर रेघोट्या मारत बसणं सुद्धा चालेल. हे करणं कितीही निरर्थक वाटलं तरी यातून तुमच्या मनाला आणि शरीरालाही विश्रांती मिळेल. तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुम्ही पुर्वीपेक्षा अधिक जोमाने कामाला लागाल. एखाद्या समस्येवर तुम्हाला तोडगा मिळत नसेल तर त्यावर कसं काम करायचं याची उत्तरं मिळत जातील. 

पण तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला असं निवांत बसण्याची परवानगी देत नसतील तर अशावेळी काय करायचं. तर अशावेळी दिवसाची सुरुवात थोड्या धीम्यागतीने करा.

घड्याळ्याच्या काट्यामागून न धावता, शरीराची लय पकडा. शरीराला जो वेग मानवेल त्या गतीनं कामं उरका. अगदी महत्वाची तेवढी कामं उरकून बिनमहत्वाची कामं लांबणीवर किंवा उद्यावर ढकलू शकता.

 

काहीही न करावंसं वाटणं हे साहजिक असलं तरी जर नेहमीच तुमचं शरीर आणि मन अशा प्रकारे बंड पुकारत असेल तर ही धोक्याची घंटा आहे हे वेळीच ओळखा. शरीराला आणि मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी थोडा ब्रेक घ्या. हवं तर एखाद्या कौन्सिलरची मदत घ्यायलाही हरकत नाही.

 

दैनंदिन धावपळीतून थोडा ब्रेक हा आवश्यक असतोच. म्हणून आठवड्यातील एक दिवस किंवा दिवसातील एक-दोन तास जरी तुम्ही निकसेनची कला अंमलात आणलीत तरी त्याने तुमच्या कार्यक्षमतेवर चांगला आणि सकरात्मक परिणाम होईल.

 

काहीही न करता बसून राहण्याऐवजी फक्त आवडेल ते केलं तरी चालू शकतं. मग सांगा बरं निकसेनची कला अंमलात आणताना तुम्हाला नेमकं काय करायला आवडेल?


मेघश्री श्रेष्ठी

 





Post a Comment

1 Comments