टोमण्यांना भिक न घालता क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण केले, रचला इतिहास!

Image source Google


क्रिकेट (Cricket) हे आता आतापर्यंत पुरुषी क्षेत्र समजलं जायचं. आता मात्र भारतीय मुलींनी याही क्षेत्रात आपला डंका वाजवायला सुरूवात केली आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या बाराव्या महिला वनडे क्रिकेट वर्ल्ड कप (women’s one day cricket world cup) मध्ये भारतीय महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला चित करून इतिहास रचला आहे.

 

भारतीय संघातील नव्या दमाची खेळाडू पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar) आणि अनुभवी खेळाडू स्नेहा राणा यांनाच या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. पूजा वस्त्रकार हिने प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ही पटकावला. पूजाचा हा पहिलाच वर्ल्डकप सामना आहे. पहिल्याच संधीत इतिहास रचून त्याचे सोने करणाऱ्या पूजाचा वर्ल्डकप पर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला जाणून घेऊया या लेखातून.

 

२५ सप्टेंबर, १९९९ रोजी मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात पूजाचा जन्म झाला. तिच्या घरचे लाडाने तिला छोटी म्हणतात. पूजाला एकूण सहा भावंडं आहेत. दोन भाऊ आणि चार बहिणी. पूजा दहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. तिचे वडील बीएसएनएलमध्ये नोकरी करतात. आईनंतर तेच या मुलांची आई आणि बाप अशी दुहिरी भूमिका निभावू लागले.

 

छोट्या पुजाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच  गल्लीतील मुलांसोबत ती क्रिकेट खेळायची म्हणून शेजारीपाजारी आणि नातेवाईक तिला नेहमी टोमणे मारायचे. पण, अशा या कुचकट तोमाण्यांना तिने कधीच भीक घातली नाही. मुलीच्या जातीला असलं शोभत नाही, हे ऐकूनही पूजा नमली नाही. मोठेपणी आपण क्रिकेटरच व्हायचं हे तिनं मनाशी पक्क केलं. कधी काळी जे लोक तिला क्रिकेट खेळते म्हणून टोमणे मारायचे आज तेच तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

 

Image Source : Google

गल्लीत क्रिकेट खेळून शेजारपाजाऱ्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडून शिव्या खाण्यापेक्षा स्टेडियमवर भारी खेळता येतं, हा सल्ला मिळाल्यानंतर ती आणि तिची टीम स्टेडियमवर पोहोचली. याच स्टेडियमने तिच्या करिअरला एक नवी दिशा मिळवून दिली.

 

सुरुवातीला ती फलंदाजीचा सराव करायची. पण, कोच आशुतोष श्रीवास्तव यांनी पुजाची बॉलिंगमधील गती ओळखली आणि तिला बॉलिंगचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. पूजाची मेहनत शेवटी फळाला आली आणि २०१५ साली वयाच्या तेराव्या वर्षी तिची मध्यप्रदेशच्या राज्यस्तरीय संघात निवड झाली. या संघात ती गोलंदाज म्हणून उतरली. याच वेळी ती इंडिया ग्रीन टीमचीही सदस्य बनली.

 

सगळं काही सुरळीत सुरु असतानाच प्रॅक्टिसच्या वेळी तिच्या घोट्यांना दुखापत झाली ज्यामुळे तिला काही काळ खेळापासून दूर राहावे लागले. पुढच्या वर्षी म्हणजे २०१७च्या वर्ल्डकपमध्ये (Cricket World-Cup) खेळण्याची संधी असूनही निव्वळ दुखापतीमुळे तिच्या हातून ही संधी निसटून गेली. सततच्या दुखापतीमुळे ती नेहमीच संघाबाहेर राहिली. मात्र २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघात एकदिवसीय क्रिकेटसाठी तिची निवड करण्यात आली यानंतर ती टी-२०मध्येही सामील झाली.

टी-२० (T-20 World Cup) वर्ल्डकपचा सराव करत असतना पुन्हा एकदा तिच्या घोट्यांना दुखापत झाली आणि या वर्ल्डकपमधूनही तिला बाहेर पडावे लागले. शेवटी घोट्यांचे ऑपरेशन करण्याची वेळ आली. यातून बरी झाल्यानंतर २०१९ मध्ये तिला भारतीय महिला संघात (Indian Women’s Cricekt) स्थान मिळाले.

 

आज भारतीय महिला संघाचा ती एक मजबूत हिस्सा बनली आहे.

 

तिच्या पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा!

 


Post a Comment

0 Comments