तुमच्या नात्यात (Longterm relationship) या १० गोष्टी असतील तर....!

Source : Google Image 

व्हॅलेंटाइन विक (Valentine week)  सुरू आहे. प्रेमाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच उतावीळ असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीच्या भावना व्यक्त करण्यामागचा हेतू एकच असतो ते म्हणजे नातं अधिकाधिक फुलवणं!

 

आपल्या आयुष्याचा जोडीदार कायम आपल्या सोबत राहावा असं वाटणं साहजिकच आहे ना? पण, काही नाती अशी शेवटपर्यंत टवटवीत राहत नाहीत. नातं अधिक काळ टिकण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. त्याला वेळ, आपुलकी, संवेदनशीलता, प्रेम, विश्वास, एकनिष्ठता, विवेक, समजूतदारपणा, अशा भावनांचे खतपाणी घालावे लागते. ज्या नात्यात या सगळ्या गोष्टी आवश्यक प्रमाणात असतात ते नाते दूरपर्यंत आपल्या सोबत राहते. ज्या नात्याला या गोष्टी मिळत नाहीत, ती लवकरच दम टाकतात.

 

आपली नाती दीर्घकाळ (long term relationship) टिकावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा जोडीदार आणि तुम्ही दोघांमध्येही काही सकारात्मक गुण असणे आवश्यक आहेत. हे दहा गुण जर तुम्हा दोघांमध्येही असतील तर, नक्कीच तुम्ही आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगू शकाल.

 

१) प्रतिक्रिया देणे (Responsiveness) – जगातील प्रत्येक माणसाला असं वाटतं की कुणीतरी त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. तुमच्या जोडीदाराचीही तुमच्याकडून नेमकी हीच अपेक्षा असते. तुमचं नातं दीर्घकाळ (long term relationship) टिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचं म्हणनं ऐकून घ्या. आपल्या जोडीदाराला आपल्या भावनांची कदर आहे, असा विश्वास जर तुमच्या जोडीदाराच्या मनात निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुमच्या नात्यात कधीच वितंडवाद होणार नाहीत. पण, ही प्रतिक्रिया सकारात्मक असली पाहिजे.

  • म्हणून आपल्या जोडीदाराच्या भावना, त्याच्या समस्या यांची तुम्हालाही जाणीव आहे हे दाखवून द्या.
  • तुमचा जोडीदार नेमका काय विचार करतो आहे/करतो, याबद्दल तुम्हाला तितकीच उत्सुकता असली पाहिजे.
  • जोडीदाराच्या गरजा (योग्य असतील तर) पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • जोडीदाराला बोलतं करण्याचा प्रयत्न करणे. यासाठी संवाद साधत असताना प्रश्न विचारण्याची सवय लावून घेतल्यास फायद्याचे ठरेल.
  • जोडीदाराची मानसिकता, त्याची भावनिक, शारीरिक स्थिती जाणून घेण्याची उत्सुकता असली पाहिजे.
  • आपण जोडीदाराला समजून घेतोय याची त्याला स्पष्ट जाणीव करून देता आली पाहिजे.

 

२) परिपक्वता (Maturity) – परिपक्वता म्हणजे अगदीच प्रौढ झाल्यासारखे वागणे नव्हे. तुमच्यातील अवखळ मुल जपता जपता देखील तुम्ही परिपक्वपणे वागू शकता. आयष्यात दंगा, मस्ती मजा तर हवीच ना. पण यासोबतच आपल्या जबाबदारीचे भानही हवे. आपले नाते अधिक सदृढ होण्यासाठी गरज असते ती काही गोष्टी समजून घेऊन त्यांना स्वीकारण्याची

आपला जोडीदार ही एक स्वतंत्र व्यक्ति आहे, त्याला त्याची मते,भावना आहेत आणि ती मांडण्याचा अधिकारही आहे, हे पहिल्यांदा दोघांनीही मान्य करायला हवे. त्यांच्या काही स्वतंत्र इच्छा, स्वप्ने आकांक्षा असू शकतात. त्या जोपासण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. यासाठी त्यांना जोडीदारावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

जोडीदार म्हणजे आपल्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरण्यासाठीचा पर्याय नसतो. तर एकमेकांच्या मदतीने अशा रिकाम्या जागा शोधून त्या कशा भरता येतील याचा प्रयत्न करण्याचा, एकमेकांच्या सहाय्याने पुढे जाण्याचा तो एक आधार असतो.

  • तुम्हा दोघाच्याही व्यक्तीमत्वात सातत्याने सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील तर एकमेकांच्या वागण्याची, कृतीची दाखल घेऊन त्याबद्दल आपले मत व्यक्त करण्यास शिका.
  • तुमचा जोडीदार जेव्हा त्याचे विचार, भावना किंवा समस्यांबद्दल बोलत असेल तेव्हा त्याची खिल्ली न उडवता त्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करण्यास शिका.
  • त्याच्या समस्या त्यांनाच हाताळू द्या. त्याची जबाबदारी स्वतःवर घेण्याऐवजी त्या हाताळण्यासाठी त्यांना तुमची मदत कशी होईल हे बघा.
  • महत्वाची बाब म्हणजे तुमच्या जोडीदाराची कदर करा, त्याचा आदर करा. (honor/respect)

 

३. स्व-नियंत्रण (self-Control)

सदृढ नात्यासाठी दोन्ही जोडीदारांकडे हा गुण असलाच पाहिजे. ज्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही अशा व्यक्ति बऱ्याचदा चुकीचे वागतात आणि चूक मान्य करण्याऐवजी त्याचे समर्थन करतात.

  • अशा व्यक्ति सतत तणावाखाली असतात.
  • ते सतत मोबाईलमध्येच रमलेले असतात.
  • एखाद्या गोष्टीबद्दल, घटनेबद्दल, मत मांडताना संयम हरवतात.
  • जोडीदार बोलत असताना त्याच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.
  • भावनांवर आवर न घालता आल्याने फसवणूक करण्याकडे जास्त कल असतो.

स्वतःवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तिकडून फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. मग तुमच्या नात्यात जर आनंद, विश्वास आणायचा असेल तर हा गुण तुमच्याकडे असलाच पाहिजे ना?

 

४. संवेदनशीलता (Empathy)

आपण त्या जागी असतो तर? हा विचार करण्याची क्षमता म्हणजेच संवेदनशीलता. समोरची व्यक्ति ज्या अनुभवातून गेली आहे त्यावरच त्याचे वर्तन आणि विचार अवलंबून असणार आहेत. म्हणून त्याच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची पूर्ण जाणीव ठेवून त्याच्या वर्तनाची चिकित्सा करता आली पाहिजे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दलचे आपले मत कलुषित होत नाही. उलट त्याला समजून घेणे अधिक सोपे जाते. जोडीदाराला समजून घेतानाही हा गुण खूप उपयोगाचा ठरतो. आपला जोडीदाराच्या वागण्यामागची त्याची भूमिका किंवा हेतू काय हे ओळखणे सोपे जाते. त्यामुळे गैरसमज निर्माण होत नाहीत.

शिवाय, तूमच्या जोडीदाराविषयी जेव्हा तुम्ही सहानुभूती दाखवता तेव्हा आपसूकच तुमच्यातील संवाद सुरळीत आणि अधिक चांगला होतो. हा गुण तुमच्याकडे असेल तर...

  • एकमेकांचे अनुभवांना समजून घेणे सोपे जाते.
  • एकमेकांच्या श्रद्धा, इच्छा, मुल्ये यांचा आदर केला जातो.
  • आपल्या जोडीदाराला सध्या कोणत्या प्रसंगातून, जावे लागत असेल याची स्पष्ट कल्पना येते.
  • एखाद्या प्रसंगाकडे पाहण्याचा एकमेकांचा दृष्टीकोन नेमका कसा आहे हे समजून घेण्यास मदत होते.

 

५. कृतज्ञता आणि कौतुक (Gratitude and appreciation)

तुमच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर, कृतज्ञता आणि कौतुक असेल तर नक्कीच हे नाते अधिक काळ आणि अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकते. पण जोडीदाराचे कौतुक कसे करायचे किंवा त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त तरी कशी करायची?

तुमचा जोडीदार तुमच्यासाठी जे काही करतो त्याबद्दल त्याचे आभार माना. श्बदातून मानता येत नसेल तर ही कृतज्ञता दाखवण्यासाठी एखादी कृती करू शकता.

जोडीदाराचे व्यक्तिमत्व, त्याच्यातील कौशल्य, गुण, त्याची जमेची बाजू यासगळ्यांचे आवर्जून कौतुक करा.

जोडीदाराला कधी छोटीशी चिठ्ठी लिहा. त्यांची आजची कामे काय आहेत, त्यांचा प्राधान्यक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना एखादी भेटवस्तू द्या, जी त्यांना आवडेल.

तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करता हे त्यांना वारंवार सांगा. त्याची जाणीव करून द्या. तुमच्या कृतीतून तुमचे प्रेम दिसू द्या.

तुमचा जोडीदार जेव्हा एखादी चांगली गोष्ट करेल तेव्हा आवर्जून त्याची दखल घ्या.

जर नात्यात प्रेम आणि कौतुक मिळत असेल तर असे नाते दीर्घकाळ टिकते. शिवाय, या सकारात्मक गोष्टीमुळे नाते अधिक सुंदर होते.

६. मर्यादा ओळखा  (set Boundaries) –

जीवनसाथीसोबत कसल्या आल्या मर्यादा? असा जर तुम्ही विचार करत असाल तर...तुम्ही चुकीचा विचार करत आहात. सदृढ आणि सकारात्मक नात्यासाठी आपापल्या मर्यादा ओळखणं आणि त्या पाळणं खूप महत्वाचं आहे. या मर्यादा कधी भावनिक, शारीरिक तर कधी मानसिक स्वरूपाच्याही असू शकतात.

 

जसे की,

  • वैयक्तिक ध्येय, महत्वाकांक्षा आणि स्वप्नं,
  • इच्छा आणि गरजा,
  • काही मर्यादा ज्या कधीच उल्लंघता येत नाहीत.
  • जोडीदाराचे व्यक्तिमत्व आणि त्याचे गुण.

यासाठी तुम्ही अगदी नियमावली बनवून ती तंतोतंत पाळली पाहिजे असं अजिबात नाही. पण आपल्या जोडीदाराविषयी आपल्या मर्यादा काय आहेत ते समजून घेऊन त्यानुसार वागता आलं पाहिजे. या मार्यादाचे उल्लंघन म्हणजे नात्याला आपणहून लावलेला सुरुंगच!

 

७. प्रामाणिकपणा (Honesty)

कोणत्याही नात्यात प्रमाणिकपणा हा एक महत्वाचा गुण आहे. तुम्ही सांगितलेले सत्य आणि वास्तव यात जर समोरच्या व्यक्तीला काही विसंगती वाटली तर तुमच्यावरील त्याच्या विश्वासाला तडा जाण्याचीच शक्यता असते. सत्य कटू असते किंवा अज्ञानातच खरे सुख असते, असे कितीही म्हटले जात असले तरी आपल्या व्यक्तिगत नात्यात मात्र सत्यच तुम्हाला तारून नेऊ शकते.

सत्य काही तरी वेगळेच असून आपण फसवलो गेलेलो आहोत ही भावना एकदा का जोडीदाराच्या मनात तयार झाली की तुम्हाला पुन्हा तो आदर सन्मान मिळवणं अवघड होऊन जाईल.

 

आपल्या वागण्या-बोलण्यात एक वाक्यता असली पाहिजे. जर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात समोरच्याला काही विसंगती आढळून आली, तुम्ही नेहमीच असे विसंगत अनुभव देत असाल तर अशा नात्यातील विश्वास हळूहळू संपून जातो.

 

तुमचं हे खोटं वागणं तुमचा जोडीदाराला मानसिकरित्या उध्वस्त देखील करू शकतं. नातं जर दीर्घकाळासाठी जपायचं असेल तर त्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास जपला गेला पाहिजे. तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावर आणि तुमचा जोडीदारावर जेव्हा पूर्ण विश्वास असतो तेव्हा त्या नात्यात निश्चितच भावनिक सुरक्षितता मिळते.

८. सकारात्मक विचार करणे (Positive Thinking) – आशावादी लोकं नेहमीच प्रसन्न आणि उत्साही दिसतात अशा लोकांच्या संपर्कात राहणं कुणाला आवडणार नाही. तुमच्या जोडीदारालाही हा आशावाद आणि प्रसन्नताच तुमच्याकडे आकर्षित करत असतो.

तुम्ही जर सतत निराश आणि तणावग्रस्त राहत असाल तर अशा व्यक्तीसोबत राहणं थोडं अवघडच जातं. आशावादी व्यक्तिच्या नात्यात गोडवा निर्माण होतो, अशा व्यक्तीसोबत राहताना जोडीदारालाही तणाव जाणवत नाही. तसेच तुम्हीही जोडीदार निवडताना त्याच्यात हा सकारात्मक गुण आहे की नाही हे जरूर तपासले पाहिजे. सकारात्मक व्यक्तीच्या संपर्काने तुम्ही आणखीन उजळून निघाल.

याचा अर्थ तुम्ही किंवा तुमच्या जोडीदाराने नेहमीच आनंदी राहून आपल्या खऱ्या भावना लपवल्या पाहिजेत असे नाही. असा खोटा आव जास्त काळ टिकतही नाही. पण कठीण प्रसंगातही ज्याला सकारात्मक राहण्याची कला जमते त्यालाच पुढची वाट सापडते.

 

९. क्षमाशीलता (Forgiveness) –

या जगात ज्याच्या हातून चुका होतच नाहीत अशी व्यक्ति सापडणं शक्यच नाही. दीर्घकाळ नात्यात राहायचं असेल तर छोट्या चुका बाजूला सारून पुढचा रस्ता धरता आला पाहिजे. एकाच गोष्टीवर अडून बसलात तर असं नातं कधीच दीर्घकाळ टिकणार नाही. शिकणं, चूक सुधारणं आणि त्यातून पुढं जाण्याचा गुणच तुम्हाला आणि तुमच्या नात्याला अधिकाधिक मजबूत बनवू शकेल.

 

मनात अढी धरल्याने जोडीदाराला अधिकाधिक असुरक्षित वाटू शकते. अशा वागण्याने नातं जास्त काळ टिकून राहणारच नाही. नात्यात कुणाच्याही हातून किरकोळ चुका झाल्या असतील तर त्या माफ करून त्या सुधारण्यास वाव दिला पाहिजे. जोडीदाराला माफ करून सकारात्मकतेने पुढची वाटचाल करता आली पाहिजे.

अर्थात या क्षमाशीलतेलाही काही मर्यादा आहेतच.

  • जोडीदाराची चूक अक्षम्य असतानाही ती समजून घेण्याचा, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा, केवळ नातं टिकवण्यासाठी म्हणून स्वतःचं मन मारण्याचा अट्टाहास करू नका.
  • एकवेळ माफ करूनही जर तुमचा जोडीदार आपली चूक सुधारत नसेल किंबहुना त्याला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप वाटत नसेल, आपली चूक त्याला मान्यच नसेल तर ही गोष्ट खपवून घेण्याचा मुर्खपणा महागात पडू शकतो.
  • मारहाण, शिवीगाळ, मानसिक छळ अशा गोष्टींना क्षमाशीलतेची फुटपट्टी वापरता येत नाही.
  • क्षमाशीलता आणि सहनशीलता ही एका मर्यादेपर्यंतच योग्य आहे.

१०. विनोद (humor)

नात्यात दंगामस्ती, चेष्टा-मस्करी असेल तर अशा नात्यातील ताजेपणा टिकून राहतो. कठीण काळात किंवा वाईट प्रसंगातही यामुळे मनाला उभारी येते. मन खचून जात नाही. असे जोडीदार एकमेकांच्यातील आशावाद जिवंत ठेवतात. विनोदामुळे तणाव निवळतो. कोणत्याही प्रसंगातून तरून जाण्याची शक्ती मिळते.

 

म्हणजे काही तुम्ही मनात नसतानाही जबरदस्तीने हसतमुख राहिलाच पाहिजे असं नाही पण, हा गुण तुमच्यातील तणाव दूर करेल हे नक्की.

 

नात्याबद्दल जितके सकारात्मक राहाल तितकेच त्या नात्याचे आयुष्य वाढण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या नात्यात जर हे गुण असतील तर कितीही अवघड काळात तुम्ही तुमच्या नात्यात टिकून राहू शकता. तुमच्या नात्यात काही तरी कमतरता आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे गुण आत्मसात करून ती उणीव तुम्ही भरून काढून अधिक आनंदी आणि सफल आयुष्याला सुरुवात करू शकता.

 

या व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या नात्याची एक नवी सुरुवात करू शकता.

 

Happy valentine day!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Post a Comment

0 Comments