इंग्रजांना धूळ चारणारी पहिली भारतीय रणरागिणी : राणी वेलू नचियार!

Image source : Google

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात १८५७ चा उठाव हा इंग्रजांविरोधातील पहिला उठाव मनाला जातो. पण, त्याच्याही आधी जेव्हा इस्ट इंडिया कंपनी भारतात हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा एका भारतीय राणीने इंग्रजांना असा धडा शिकवला होता की इंग्रजांनी पुन्हा तिच्या राज्याकडे डोळा वर करून पाहण्याचीही हिंमत केली नाही. आपल्या पतीच्या पश्चात आपल्या राज्याचे समर्थपणे रक्षण करणाऱ्या या राणीचे नाव होते राणी वेलू नचियार. इंग्रजांना धूळ चारणाऱ्या या राणीची यशोगाथा खूप कमी लोकांना माहिती आहे. या लेखाच्या माध्यमातून राणी वेलू नचियारच्या साहसी जीवनगाथेवर प्रकाशझोत टाकण्याचा एक प्रयत्न!

 

ब्रिटीश सत्तेविरोधात आवाज उठवणारी राणी वेलू नचियार ही पहिली राणी होती. १८५७च्या उठावाच्या आधी शंभर वर्षे या आपल्या राज्यातून इंग्रजांना पळवून लावले होते. यामुळे तिला भारताची पहिली स्वातंत्र्य योद्धा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तामिळनाडूमध्ये आजही वीरमंगाई (वीरमाता/ brave lady) म्हणून तिचा आदराने उल्लेख केला जातो.

 

राणी वेलू नाचीयार ही रामनाड राज्याचे शासक राजा चेल्लूमुत्थू विजयरागुनाथ सेथुपती (Chellamuthu Vijayaragunatha Sethupathy) आणि राणी स्कंधीमुत्थल  (Sakandhimuthal) यांची एकुलती एक कन्या. तिचा जन्म ३ जानेवारी १७३० चा. वंशाला दिवाच हवा असा दुराग्रह न धरता या दांपत्याने आपल्या मुलीला एखाद्या राजकुमाराप्रमाणेच वाढवले. तिला धनुर्विद्या, भालाफेक, घोडेस्वारी, अशा विविध युद्धकलांचे शिक्षण दिले. शिवाय, फ्रेंच, इंग्रजी आणि उर्दू अशा परदेशी भाषाही शिकवल्या. वयाच्या १६ व्या वर्षी वेलू नचियार हिचे शिवगंगाई राज्याचा राजकुमार मुथूवादुगानाथापेरीया उदैयाथेवार (Muthuvaduganathaperiya Udaiyathevar) याच्याशी झाला. दोघांनी सुमारे दोन दशके सुखनैव राज्य केले. त्यांनाही वेल्लाची नावाची एक मुलगी होती.

 

१७७२ साली इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने अर्कोटच्या नवाबाला हाताशी धरून शिवगंगाई वर आक्रमण केले. इतिहासात कलैयार कोली नावाने प्रसिद्ध असलेल्या या युद्धात इंग्रजांनी प्रचंड नरसंहार घडवून आणला होता. लहान मुले, वृद्ध, स्त्रिया, असा कोणताच फरक न करता इंग्रजांनी बेशुमार कत्तल घडवून आणली. या युद्धात राणी वेलू नचियारचे पती आणि इतर सैनिकही शहीद झाले.

 

राणी वेलू मुलगी वेल्लाची सह काही काळासाठी राज्यातून परागंदा झाली. तिने मारुतू बंधूंकडे (Maruthu Brothers) शरणागती पत्करली. मात्र, तिने हार मानली नव्हती. या काळात ती डिंडिगुल मध्ये राहून इतर राज्यांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत होती. आठ वर्षांच्या या अज्ञातवासाच्या काळात तिने शेजारच्या अनेक राज्यांशी राजकीय मैत्र निर्माण केले.

 

डिंडिगुल चे राजा गोपाल नायकर आणि मैसूरचा राजा हैदर अली यांनी तिला मदत करण्याचे मान्य केले. राणी वेलू नचियारचे शौर्य पाहून हैदर अली स्तिमित झाला होता. हैदर अलीने राणीला ४०० पौंड इतकी रोख रक्कम आणि ५००० सैनिक आणि ५००० घोडदळ देऊन तिची मदत केली. शिवाय तिला आवश्यक तो शस्त्रसाठादेखील पुरवला. या सर्वांच्या मदतीने राणीने आपले स्वतःचे सैन्य उभे केले आणि ती इंग्रजाविरोधात लढण्यास सज्ज झाली.

 

१७८० साली राणीने इंग्रजांविरोधात उघड उघड युद्ध पुकारले. या काळात इंग्रजांना ललकारणारी ती पहिली वीरांगना होती. ब्रिटिशाच्या सर्व हालचालींवर तिचे बारीक लक्ष होते. इंग्रजांच्या शस्त्रसाठ्याची माहिती कडून तिने हा शास्त्रसाठाच उध्वस्त करून टाकला. या मोहिमेसाठी तिने इतिहासात पहिल्यांदा मानवी बॉम्ब वापरल्याची नोंद आढळते. तिच्या सैन्य दलातील एक विश्वासू साथी आणि सरदार कुनैलीच्या मदतीने तिने ही मोहीम यशस्वी करून दाखवली. कुनैलीने स्वतःला आगीच्या हवाली केले आणि पेटत्या शरीरानिशी ती ब्रिटीशांच्या शास्त्रसाठ्यात घुसली ज्यामुळे ब्रिटीशांचा संपूर्ण शस्त्रसाठ्याची राख झाली. राणीच्या एका शब्दाखातर कुनैलीने स्वतःचा जीवही कुर्बान केला. शास्त्रसाठाच उध्वस्त झाल्याने इंग्रज सैन्य कमजोर झाले.

 

राणीच्या कुशल रानानितीमुळे आणि धाडसी निर्णयामुळे पुन्हा एकदा शिवगंगाई राज्यावर ताबा मिळवण्यात ती यशस्वी झाली. शहीद रणरागिणी कुनैली आणि उदाईयाल या दोघींच्या नावाने राणीने सैन्यात महिलांची एक खास तुकडी सुरू केली. शिवगंगाईवर सत्ता स्थापन करून राणी वेलू नचियारने पुढील कित्येक दशके तिथे निर्धोक राज्य केले. तिच्या नंतर शिवगंगाईची सूत्रे तिची मुलगी वेल्लाचीकडे देण्यात आली. वेल्लाचीने देखील १७९० पासून १७९३ पर्यंत शिवगंगाईवर राज्य केले.

 

Image source : Google

ब्रिटिशाविरोधातील या लढाईत राणीला ज्या-ज्या स्थानिक राजांनी तिला मदत केली त्या सर्वांशी राणीने अखेरपर्यंत सौहार्दापूर्ण संबंध राखले. राणी वेल्लाची आणि हैदर अलीचा मुलगा मैसूरचा शासक टिपू सुलतान यांच्यातही जिव्हाळ्याचे संबंध होते.

 

२५ डिसेंबर १७९६ रोजी राणी वेलू नचियारचा वृद्धापकाळाने निधन झाले. अखेरच्या काही वर्षात ती हृदयविकाराने ग्रस्त होती. पण, तिने आपल्या हयातीत तामिळनाडू वासियांमध्ये जो देशाभिमान जागृत केला त्याची ज्वाला आजही धगधगत आहे.

 

या महान राणीच्या सन्मानार्थ भारत सरकारने ३१ डिसेंबर  २००८ साली पोस्टल तिकीट सुरू केले आहे.

 तामिळनाडूमध्ये आजही राणी वेलू नचियारच्या स्मृती विविध प्रकारे जपल्या जात आहेत. चेन्नईतील ओवीएम या नृत्य अकादमीने राणी वेलू नचियारची जीवनगाथा भव्य नृत्यकलेच्या माध्यमातून मांडली आहे. आजही ठिकठिकाणी हा कार्यक्रम केला जातो.

 

इंग्रजांना धूळ चारणाऱ्या या शूरवीर राणीला त्रिवार सलाम!

 

Post a Comment

0 Comments