It's better to be a single parent than a toxic parent/ वाईट पालक होण्यापेक्षा एकल पालक होणं कधीही श्रेयस्कर!


अमीर खान – किरण राव, (Amir Khan - Kiran Rao)  समंथा-नागा चैतन्या (Samantha - Nagachaitanya) आणि आता धनुष-सौंदर्या (Dhanush - Soundarya) अशा प्रसिद्ध कलाकार जोडप्यांनी घटस्फोट (stars who get divorce) जाहीर केल्यानंतर अनेकांनी नाराजी आणि नाखुशी व्यक्त केली. अर्थात आपल्या आवडत्या कलाकार जोडप्यांची अशी ताटातूट होणं चाहत्यांसाठी धक्कादायकच असतं. घटस्फोट म्हटलं की आपल्याकडे लगेचच सगळ्यांचे कान टवकारले जातात. सात जन्म एकत्र राहण्याच्या संकल्पनेचा अजूनही इतका पगडा आहे की, घटस्फोट ही बाब लोकांच्या सहजासहजी पचनी पडत नाही.  घटस्फोट असो की लग्न तो त्या दोन व्यक्तींमधला वैयक्तिक प्रश्न आहे असे आपल्याकडे समजलेच जात नाही. लग्न जुळवून देण्यापासून लग्न टिकवून ठेवण्यापर्यंत या प्रवासात फक्त दोघांचं असं काहीच नसतं. एक तर आपल्याकडे प्रेम विवाह खूप कमी होतात. अरेंज मॅरेज मुळे दोघांची ख़ुशी असो किंवा नसो पण कुटुंबियांच्या आनंदासाठी म्हणून कधीकधी अनेक जोडपी तडजोड करताना दिसतात.

Image source : Google
 

अशा तडजोडीच्या नात्यात दोघांचीही होणारी घुसमट कुणालाही दिसत नाही आणि त्याबद्दल कुणाला दयाही येत नाही. कारण, एकदा का मुलं झाली की नवरा-बायकोनी त्यांचं आयुष्य कुटुंबासाठीच द्यायचं असतं असा आपल्याकडे एक अलिखित नियम आहे. कुटुंबाच्या आनंदापुढे आपला आनंद नगण्य असतो.

 

तसेही भारतात घटस्फोटाचे प्रमाण खूप म्हणजे खुपच कमी आहे. (low rates of divorce) अलीकडेच   National Crime Records Bureau म्हणजेच NCRB ने केलेल्या सर्वेक्षणातून जे आकडे पुढे आलेत ते थक्क करणारे आहेत. कारण, घटस्फोट (Divorce) म्हणजे काही तरी अघटीत आणि विपरीत आहे असा समज असलेल्या आपल्या देशात २०२० मध्ये दररोज २० लोकांनी वैवाहिक समस्यांमुळे आत्महत्या (sucide) केलेली आहे. म्हणजे एकूण ३७,५९१ आत्महत्या मागे त्यांचे अशांत वैवाहिक जीवन हेच एकमेव कारण होते.

तर याचकाळात घटस्फोटामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या होती २६००. म्हणजेच तुमचे दुखी वैवाहिक जीवन (bad marriages) तुमचा बळी घेऊ शकते.

 

यातही महिलांची स्थिती अगदीच दयनीय आहे, २०१६ ते २०१० या चार वर्षांच्या कालावधीत २१,५७० महिलांनी वैवाहिक समस्येतून आत्महत्या केली आहे तर याच काळात १६, ०२१ महिलांनी याच कारणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

ज्यांनी असे कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यातील किती महिला आपल्या वैवाहिक आयुष्यात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुखी आहेत याची आकडेवारी देणारे सर्वेक्षण झालेलेच नाही. उलट चुकीच्या नात्यात अडकून शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ सोसणाऱ्या महिलांची संख्याही काही कमी नाही. किती महिलांना अशा प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागते याचीही निश्चीत आकडेवारी कोणी सांगू शकलेले नाही. वैवाहिक समस्यांमुळे किती लोक मानसिक आजाराला (depression) बळी पडलेले आहेत याचीही आकडेवारी कुणी सांगू शकणार नाही.

 

जिथे आपला जोडीदार स्वतःला निवडण्याची मुभा नसते तिथे घटस्फोट घेण्याची मुभा मिळणे म्हणजे दुरापास्तच. कित्येक मुलींना आपल्या जोडीदारासोबत राहण्याची अजिबात इच्छा नसते तरीही घरचे लोक तिला असा निर्णय घेण्यापासून रोखून धरतात. घटस्फोटीत म्हणून शिक्का बसण्यापेक्षा छळ सोसलेला केव्हाही बरा, या बुरसटलेल्या मानसिकतेतून आजही लोक बाहेर आलेले नाहीत. संसार टिकवून ठेवण्याची कसरत करणे कितीही अवघड असले तरी ती करावीच लागते.

 

 “इतरांचं जाऊ दे पण, किमान मुलांचा तरी विचार करा,” घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांसाठी हा सल्ला अगदी प्रत्येकाकडून दिला जातो. मग मुलांच्या निमित्ताने दोघेही घुसमट सहन करत एका मृतवत नात्यात अडकून राहतात.

 

पण, प्रश्न असा आहे की, खरंच मुलांसाठी असा विवाह टिकवून ठेवण्याचा आटापिटा करणं योग्य आहे का? मुलांना आपल्या आई आणि वडिलांबद्दल सारखीच ओढ असते. दोघांनी एकत्र राहावं अशी जरी त्यांची इच्छा असली तरी दोघांनी मारून मुटकून एकत्र राहिलेलं त्यांना कितपत आवडत असेल? आई-वडील जर एकमेकांचा दुस्वास करत असतील, एकमेकांशी सतत भांडत असतील, मारहाण, शिवीगाळ, आदळआपट करत असतील तर अशा वातावरणात त्या मुलांना कितपत सुरक्षित वाटत असेल? रोज रोज याच वातावरणात राहिल्याने त्यांच्यावर काय परिणाम होत असतील?

 

खरे सांगायचे तर घटस्फोटापेक्षाही हे परिणाम जास्त भयंकर असतात. अशा वातावरणात ती मुलं आनंदी राहू शकत असतील का? त्यांच्या मानसिक, भावनिक गरजा पूर्ण होत असतील का? ज्या कारणासाठी त्यांना आई-वडील जवळ हवे असतात ती मायेची ऊब त्यांना मिळत असेल का? याचे उत्तर नाही हेच असणार आहे. आपल्याच घरात ही मुले (children) एखाद्या ओलितासारखी राहत असतील तर त्यांच्या भावनिक विश्वात किती मोठा गोंधळ माजत असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

 

म्हणून मुलांसाठी विस्कटलेले वैवाहिक आयुष्य विनाकारण रेटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याच मुलांच्या मानसिक वाढीचा विचार करून घटस्फोट घेतलेला कधीही योग्यच. वाईट पालक (Bad parent) होण्यापेक्षा एकल पालक (single parent) होण्याच्या पर्याय अधिक बरोबर वाटत नाही का?

 

मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

0 Comments