Emotional Intelligence म्हणजेच भावनिक बुद्ध्यांक कसा राखावा?

Image source : Google 

 







बुद्ध्यांक हा शब्द तुमच्या चांगलाच परिचयाचा असेल. पण भावनिक बुद्ध्यांक हा शब्द तुम्ही कधी वाचला किंवा ऐकला आहे का? भावनिक बुद्ध्यांक म्हणजे, स्वतःच्या भावना ओळखता येण्याची, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करण्याची आणि भावनांचे नियंत्रण करण्याची क्षमता. प्रत्येक व्यक्तीकडे ही क्षमता असेलच असे नाही पण थोड्याशा प्रयत्नाने हे नक्कीच साध्य होऊ शकते. वैयक्तिक नातेसंबंध आणि व्यावसायिक संबंध अशा दोन्ही ठिकाणी जर याचा योग्य वापर करता आला तर व्यक्ति आयुष्यात यशस्वी होऊ शकते. बौद्धिक क्षमतेपेक्षाही ज्याचा भावनिक बुद्ध्यांक चांगला असतो ती व्यक्ति यशाच्या पायऱ्या सर करण्यात लवकर यशस्वी होते.

 

हा भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवावा याबद्दल काही टिप्स इथे देत आहोत.

१)      प्रश्न विचारा – तुम्हाला जर प्रश्न विचारण्याची सवय असेल तर ही एक एकदम चांगली सवय आहे. प्रश्न विचारल्याने आपल्या ज्ञानात, माहितीत भर पडते. कधीकधी स्वतःला प्रश्न विचारणेही सोयीचे ठरते. म्हणजे एखाद्या वेळी उदास, निराश, हताश वाटत असेल किंवा कुणाचा राग आला असेल, अशा वेळी स्वतःला विचारा मला असे का वाटत आहे? ही भावना कशामुळे निर्माण झाली? आणि त्या भावनेचा उगम कुठून झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांची आणि तुमच्या मनाची चांगली ओळख होईल.

२)     सोडायला शिका : काही गोष्टी तात्पुरत्या काळासाठी आनंद देतात. पण, याच आनंदाच्या मोहात आपण वाहवत जातो. नकळत अशा गोष्टींच्या जाळ्यात गुरफटतो. सहज म्हणून केलेली एखादी गोष्ट नंतर व्यसनात परावर्तीत होते. एकदा लागलेले व्यसन मग लवकर सुटत नाही. म्हणून वेळीच अशा गोष्टींना नकार देता आला पाहिजे. भावनिक बुद्ध्यांक वाढवताना आपण कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचे याचा विचार करता आला पाहिजे.

३)      बोलण्यापूर्वी विचार करा –  एकदा धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही, त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा. असे म्हटले जाते. तुम्हाला काय म्हणायचे आहे हे नेमक्या शब्दात समोरच्या पर्यंत पोहोचवण्यात याची मदत होईल. भावनिक बुद्ध्यांक वाढवताना आपले संवाद कौशल्य वाढवणेही तितकेच गरजेचे आहे.

४)     संवेदनशील व्हा – संवेदनशील होणे म्हणजे काय तर दुसऱ्याच्या भावनांची अनुभूती घेणे. त्याच्या जागी आपण असू तर... असा विचार करणे. यामुळे तुम्ही स्वतःच्या भावनांप्रतीही सजग व्हाल. तुमच्या सामाजिक जाणीव अधिक वृद्धिंगत होतील. ज्यामुळे तुमचा भावनिक बुद्ध्यांकही वाढेल.

५)     टीका पचवायला शिका – भावनिक बुद्ध्यांकाचा खरा कस लागतो तो इथेच. कोणी तुमची चूक दाखवून दिली, तुमची थट्टा केली, टर उडवली तरी स्वतःवरील नियंत्रण सुटणार नाही याचे भान बाळगणे म्हणजेच भावनिक बुद्ध्यांक. अशा प्रकारची टीका सर्वानांच सहन करावी लागते. त्यामुळे ही टीका म्हणजे काही अंतिम सत्य नाही. आज टीका करणारे उद्या तुमचे चांगले मित्रही बनू शकतात. त्यामुळे टीकाटिप्पणी सहजतेने स्वीकारता यायला हवी.

या पाच गोष्टींकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास तुमचा भावनिक बुद्ध्यांक वाढण्यास चांगलीच मदत होईल.


मेघश्री श्रेष्ठी.

Post a Comment

1 Comments

Mahesh Raut said…
अतिशय महत्वाची माहिती मिळाली मी जे शिकत आहे इथे पण हेच शिकवत आहेत पण तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे thanku ☺️