Time is money! या संकल्पनेचा असाही वापर होऊ शकतो.

Image source Google

वेळ हीच संपत्ती (Time is money) असे म्हटले जाते. काही लोक याचा आयुष्यात अगदी हुशारीने वापर करतात तर काही लोकांना मात्र वेळेचा सदुपयोग करणं जमत नाही. काही लोक स्वतःपेक्षा जास्त इतरांवरच वेळ खर्च करतात. थोडक्यात काय तर वेळ ही अशी गोष्ट आहे जी हळूहळू आपल्या हातातून निसटून जाते आणि आपल्याला कळतही नाही. अशी ही वेळ कधी बँकेत डिपॉझिट करता येईल का? तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा वेळ कशी काय बँकेत जमा करून ठेवता येईल? असं शक्य असतं तर जग किती बदललं असतं. पण स्वित्झर्लंडने ही अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवली आहे.

 

अलीकडेच स्वित्झर्लंडने एका नव्या संकल्पनेची सुरूवात केली आहे, ज्यानुसार तिथल्या लोकांना त्यांच्या वेळेच्या बदल्यात ते हवी ती वस्तू किंवा सेवा घेऊ शकतात. ही काय भानगड आहे नेमकी? तर स्वित्झर्लंडने नुकतीच एक Time Bank नावाची संकल्पना राबवायला सुरूवात केली आहे. या संकल्पनेनुसार देशातील नागरिक त्यांच्या फावल्या वेळेचा सदुपयोग इतरांना विशेषत: ज्येष्ठ नागरिक ज्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांसाठी करतील. त्यांचा हा वेळ त्यांच्या social security account मध्ये जमा होईल आणि त्यांना हवं तेव्हा ते या वेळेच्या बदल्यात एखादी सेवा घेऊ शकतात. हा सगळा व्यवहार Barter पद्धतीने म्हणजे वस्तू-विनिमय पद्धतीने चालणार आहे.

 

या संकल्पने नुसार जो कोणी नागरिक आपला वेळ खर्च करण्यास तयार आहे त्यांनी आपल्या आजुबाजुच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करायची आहे, त्यांची औषध आणून देणं असेल, त्यांना बाजार करून देणं असेल किंवा त्यांच्या सोबत गप्पा मारणं असेल, अशी कामे करून त्यांना जितका वेळ दिला तितका वेळ त्यांच्या social security account मध्ये जमा होईल. हे नागरिक जेव्हा वयोवृद्ध होतील तेव्हा त्यांना या वेळेचा वापर करता येईल. त्यांच्या वृद्धापकाळातही त्यांना अशाच प्रकारे सेवा देणारे स्वयंसेवक उपलब्ध करून दिले जातील.

 

अर्थात फक्त वृद्धांचीच सेवा नाही तर, लहान मुलांची देखभाल, त्यांची शिकवणी, बागकाम, किंवा अशा प्रकारच जे काही वेळखाऊ काम आहे त्या सगळ्याच्या बदल्यात ही संकल्पना वापरता येणार आहे.

 

Image source Google

स्वित्झर्लंड हा काही अशा प्रकारे Time bankची संकल्पना राबवणारा पहिलाच देश नाही. यापूर्वी जपान, युके, न्यूझीलंड, स्पेन, अशा जगातील तब्बल ३४ देशांनी ही संकल्पना स्वीकारली आहे. सिंगापूर देखील आपल्या देशात याप्रकारची संकल्पना राबवण्याचा विचार करत आहे.

 

भारतातही २०१८ साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ही संकल्पना स्वीकारण्याची शिफारस केली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या शिफारशी नंतर एकट्या मध्यप्रदेश राज्याने ही संकल्पना सुरू केली. २०१९ मध्ये मध्य प्रदेशने Time Bank स्थपन करून अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे देशातील  पहिले राज्य बनण्याचा मान मिळवला. आज मध्यप्रदेशमध्ये शेकडो लोक या उपक्रमात आपले योगदान देत आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये आणखी ५०० नवे स्वयंसेवक या उपक्रमात सामील झाले आहेत.

 

अशा प्रकारे आपल्या वेळेचा सदुपयोग करून इतरांना सेवा देणे आणि त्याबदल्यात स्वतःसाठी दुसरी सेवा मिळवणे ही संकल्पना सध्या तरी एकदम चांगली, परोपकारी आणि माणुसकी वाढवणारी वाटत असली तरी, याचा हेतू कितपत आणि कसा साध्य होतो हे येणारा काळच सांगू शकेल.  

 

संपूर्ण भारतातही अशा प्रकारची संकल्पना राबवली गेली पाहिजे का? तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंट करून सांगा.


मेघश्री श्रेष्ठी.

Post a Comment

0 Comments