भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

Image source : Google


गतकाळाच्या आठवणी एखाद्या भुताप्रमाणे आपल्याला झपाटून टाकतात. हा भूतकाळ कधीकधी इतका आपल्यावर अधिकार गाजवतो की आपण त्याच्या मगरमिठीतून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरी सुटू शकत नाही. एखादे जीवघेणे आजारपण असेल, प्रेमभंग असेल, कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल, एखाद्या जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात असेल, अशा घटनांनी मनावर खोल परिणाम केलेला असतो हे नाकारता येत नाही. या आघातातून सावरायचे झाल्यास स्वतःलाच प्रयत्न केले पाहिजेत. या नकारात्मक आठवणी सोडून देऊन जगणं शक्य आहे का? असा जर प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर याचं उत्तर आहे, हो. तुमचा भूतकाळ कसाही आणि कितीही वाईट असला तरी आजही एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आपला भूतकाळ म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भाग असतो, भूतकाळ म्हणजेच संपूर्ण आयुष्य नव्हे. थोड्याशा प्रयत्नाने तुम्ही या जंजाळातून नक्कीच बाहेर पडू शकता. या सहा पायऱ्या तुम्हाला तुमच्या भूतकाळाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर ठरतील.

 

यातील पहिली पायरी आहे, आपल्या भावनांप्रती सजग होणे – तुम्हाला जो अनुभव आला आहे, तुम्ही ज्या प्रसंगातून गेला आहात किंवा जात आहात त्या प्रसंगामुळे तुमच्या मनात कोणत्या भावना निर्माण होत आहेत हे ओळखणे ही यातील सर्वात पहिली पायरी आहे. तुम्हाला जे काही वाटते ते लिहून काढा, ओरडावं वाटत असेल तर ओरडा, रडावं वाटत असेल तर रडा. पण स्वतःच्या भावनांचा स्वीकार करा. मी वाईट वाटून घेणार नाही. मी रडणार नाही, असा नकारात्मक विचार करून आपल्याच भावनांचा अव्हेर करू नका. त्यांचा स्वीकार केला तरच त्यातून बाहेर पडणे तुमच्यासाठी सोपे जाणार आहे. तुमच्या भूतकाळाने तुमच्या मनावर जे आघात केलेले आहेत ते विसरून नवे आयुष्य जगायचे असेल तर  तुमच्यातील या सगळ्या नकारात्मक भावनांचा निचरा होणे आवश्यक आहे.

 

यातील दुसरी पायरी आहे ध्यान –  यासाठी सुरुवातीला तुम्हाला फक्त ५ ते १० मिनटे वेळ काढावा लागेल. ध्यान केल्याने मनातील भावनांचा हल्लकल्लोळ शांत होण्यास मदत होते. आत्मिक शांती लाभते. नकारात्मक भावनांचा निचरा होण्यास मदत होते. तुम्ही जसजसा याचा अवलंब कराल तसतसे याचे फायदे तुम्हालाच जाणवू लागतील. यासाठी सातत्य खूप गरजेचं आहे. फक्त दहा मिनिटांचा वेळ देखील तुमच्यात खूप मोठा बदल घडवून आणण्यास पुरेसा ठरू शकतो.

 

सूड उपयोगाचा नाही – एखाद्या वाईट प्रसंगातून गेल्यानंतर तो प्रसंग आपल्यावर कुणामुळे गुदरला त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक अढी निर्माण होते. त्याच्याबद्दल मनात कडवटपणा निर्माण होतो. त्याच्यावरही अशीच किंबहुना याहून वाईट वेळ यावी असे विचार मनात थैमान घालू लागतात. पण तुम्ही जितका त्या व्यक्तीच्या वाईटाचा विचार कराल तितके तुम्ही स्वतः नकारात्मक होत जाल. भावनिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी स्वतःला आणि इतरांना माफ करणं गरजेचं आहे. हे थोडं कठीण वाटत असलं तरी अशक्य अजिबात नाही. आत्मिक शांती, आनंद आणि मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी याची नितांत गरज आहे. थोडा वेळ लागेल पण हे नक्कीच जमेल.

स्वतःला आणि इतरांना माफ करण्यासाठी काही टिप्स –

स्वतःला आणि स्वतःसोबत इतरांना माफ कसं करायचं? यासाठी तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही माफ केल्याबद्दल एक पत्र लिहा. हे पत्र इतर कुणाला देण्याची गरज नाही पण त्यांनी तुम्हाला कसा त्रास दिला? त्यांच्यामुळे तुम्हाला काय वाटते, तुम्ही कोणत्या अनुभवातून गेलात याबद्दल सविस्तर लिहून काढा. एकदा का हे सगळं लिहून काढलंत की मग ते विसरणं आणि त्यांना माफ करणं सोपं होऊन जाईल. तुम्हाला वाटत असेल की जे काही झालं त्यात तुमचीही तेवढीच चूक होती. तुम्ही मूर्ख आहात.( या आणि अशाच स्वतःला त्रास देणाऱ्या भावना) तर त्याही लिहून काढा. या सगळ्या चुकांसाठी स्वतःला माफ करून स्वतःत सकारात्मक बदल करत असल्याचा संकल्प करा.

 

व्यस्त रहा

नकारात्मक विचार आणि भावनांतून बाहेर पडण्याचा हमखास मार्ग म्हणजे व्यस्त राहणे. यासाठी व्यायाम एक उत्तम पर्याय आहे. शरीराला थोडी मेहनत दिली आणि थकवा आला की मनातील विचार कमी व्हायला मदत होते. म्हणून तुम्हाला आवडेल त्या प्रकारच्या व्यायामासाठी दिवसातील थोडा वेळ नक्की द्या.

आपल्या भावना आणि आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यायामाचा मोठा फायदा होतो. व्यायाम करताना कोणताही नकारात्मक विचार मनात आणू नका.

 

स्वतःच्या सकारात्मक रुपाची कल्पना करा

तुम्ही जेव्हा सकारात्मक व्यक्ती व्हाल, तेव्हा तुम्ही कसे असाल? कसे दिसाल? काय कराल? याची कल्पना करा. तुम्ही आनंदी असल्याची कल्पना करा. तुम्ही तुमच्या आवडत्या कामात व्यस्त असल्याची कल्पना करा. ही कल्पना काही काळासाठी तरी तुम्हाला आनंद देऊन जाईल. तुमच्यातील बदलाची ही कल्पनाच तुमची खरी शक्ती आणि प्रेरणा असेल. स्वतःत कोणते बदल हवे आहेत त्याची कल्पना करा आणि एक दिवस ही कल्पना नक्कीच सत्यात उतरेल यावर १००% विश्वास ठेवून प्रयत्न करा.

 

प्रत्येकालाच आयुष्यात कठीण/वाईट/दुःखद अशा प्रसंगातून जावे लागते. काही लोक हे घाव चटकन विसरतात आणि पुढचा रस्ता धरतात. तर, काही जणांना यातून पटकन बाहेर पडता येत नाही. भूतकाळातील नकोशा आठवणी त्यांच्या मनावर अशा काही खोलवर उमटलेल्या असतात की, त्यांना त्याचा विसर पडत नाही. थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच हा अनुभव आलेला असतो. स्वतःला भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त बनवण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. या प्रयत्नात तुम्हाला या काही मुद्द्यांचा नक्कीच फायदा होईल.

तुमची स्वप्नं, तुमची ध्येयं, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नेहमीच सक्षम आहात. तुम्हाला जे हवं ते मिळवण्याचा तुम्हाला अधिकार आहे, हे नेहमी लक्षात असू द्या. स्वतःवर प्रेम करत रहा.

  

 

Post a Comment

1 Comments