कंटाळा आला आहे, मृतदेहांची संख्या मोजण्याचा... भयाण निराशेची चाहूल?

कोरोनाने आपलं सगळं  जगणंच बदलून टाकलं आहे. सगळ्याचंच आयुष्य तणावयुक्त बनलं आहे. अशावेळी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना  योध्यांची मानसिकता कशी असेल याची आपल्याला कल्पनाही करवणार नाही. जिकडे तिकडे फक्त मृतदेह दिसत होते तेव्हा कित्येक डॉक्टरांनी आपली हतबलता सोशल मिडीयावरून व्यक्त केली होती.

 

Image source : Google

वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक घटना नुकतीच लखनौ जवळील कानपूर येथे घडली आहे. कानपूरच्या एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात फॉरेन्सिक प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या इसमाने आपल्या पत्नीसह दोन छोट्या मुलांचा निर्घुण खून केला आहे. त्याने लिहिलेल्या डायरीतील नोंदीनुसार ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या भीतीतून त्याने हे कृत्य केल्याचे समजते.

 



कानपूरच्या कल्याणपूर परिसरात राहणारा हा प्राध्यापक शहरातील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कम करत होता. आधी त्याने आपल्या पत्नीचा खून केला त्यानंतर हातोडीने आपल्या मुलाचे आणि मुलीचे डोके फोडून टाकले.

 

तिन्ही खून करताच त्याने भावाला व्हाट्सअपवरून मेसेज करून या कृत्याची माहिती दिली. या मेसेज मध्ये त्याने म्हटले आहे की, ‘ओमिक्रॉन आणि कोरोना कुणालाही सोडणार नाही. मृतदेहांची गिनती करून आता कंटाळा आला आहे, आता कशाचीच मोजदाद करण्याची गरज नाही. हा कोरोना कोणालाही सोडणार नाही. म्हणून मी आधीच त्यांना मुक्तता दिली आहे.’

 

भावाला असा मेसेज केल्यानंतर त्याने फोन स्वीच ऑफ केला पण तो कुठे आहे याचा मात्र पत्ता लागलेला नाही. त्याचा हा मेसेज मिळताच त्याचा भाऊ त्याच्या फ्लॅटवर दाखल झाला आणि त्याने पोलिसांना बोलावून घेतले. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत घुसताच दिसणारे दृश्य भयावह होते. आपली वाहिनी, पुतण्या आणि पुतणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले. कोणीही हेलावून जाईल असे हे दृश्य पाहून पोलीसही चक्रावून गेले.

 

बायको आणि मुलांचा खून करणारा हा प्राध्यापक नैराश्याने ग्रस्त होता आणि त्याला यासाठी उपचारही दिले जात होते अशी माहिती त्याच्या भावाने दिली. त्याने यापूर्वीही नैराश्यातून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.

घटनास्थळी संशयिताने लिहिलेली एक डायरी मिळाली ज्यात त्याने कोरोना आणि ओमिक्रॉन संदर्भात भीती व्यक्त केली आहे.

 

त्याच्या या डायरीनुसार येणाऱ्या ओमीक्रॉनच्या लाटेत कुणीही वाचणार नाही. कदाचित गेल्या दोन लाटांचा धसका घेतल्याने त्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केले की काही वेगळेच प्रकरण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

पण, मृतदेहांची गिनती करण्याचा कंटाळा आला असल्याचे त्याचे हे वाक्य कदाचित त्याच्या मानसिक अवस्थेबद्दल खूप काही सांगून जाते.

 

कोरोना काळात ज्यांनी न थकता काम केले अशा डॉक्टरांची आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची मानसिकता दाखवणारी ही एक प्रातिनिधिक घटना म्हणता येईल. हे कोरोना योद्धेच जर मानसिकरीत्या असे ढासळत असतील तर?.....


मेघश्री श्रेष्ठी.

Post a Comment

0 Comments