झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टची डिझायनर हेड शाहीन अत्तारवालाचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल!

‘इच्छा तेथे मार्ग,’ हा सुविचार तुम्ही अनेकदा ऐकला, वाचला असेल. पण, या सुविचाराचा खरा अर्थ जर तुम्हाला समजावून घ्यायचा असेल तर मायक्रोसॉफ्टची प्रोडक्ट डिझायनर असणाऱ्या शाहीन अत्तारवालाची ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे.

 

Image source Google

मुंबईच्या झोपडपट्टीत जन्माला आलेल्या शाहीनने मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रथितयश कंपनीत जे स्थान मिळवले आहे, ते अचंबित करणारे आहे.

 

मुंबई शहराला स्वप्ननगरी म्हटलं जातं आणि हे खरंही आहे. डोळ्यात स्वप्नं घेऊन येणाऱ्या आणि स्वप्नांसाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी असणाऱ्या लोकांना हे शहर कधीच निराश करत नाही. शाहीनच्या लहानपणी तिचे वडीलही असेच चांगल्या जीवनाची स्वप्नं डोळ्यात घेऊन मुंबईत आले होते. शाहीनचा सुरुवातीचा काळ बांद्रा रेल्वे स्टेशन शेजारच्या एका झोपडपट्टीत गेला. या झोपडपट्टीने तिला जीवनाची काळी बाजू दाखवून दिली. खूप लहान वयात तिने जीवनाचे विदारक चित्र पहिले होते. झोपडपट्टीत जिथे सार्वजनिक संडासांचीही सोय नव्हती अशा ठिकाणी जी लहानाची मोठी झाली तिने काय काय पहिले असेल अनुभवले असेल याची कल्पनाच केलेली बरी.

 

आजूबाजूच्या स्त्रियांची परिस्थिती पाहूनच शाहीनने ठरवले की आपले आयुष्य असे नसणार. ती पाहत होती स्त्रियांची मुस्कटदाबी. त्यांचे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण. सर्व प्रकारच्या त्रासाला निमुटपणे सहन करणाऱ्या या स्त्रियांसारख आपण अजिबात जगायचं नाही, या विचारानेच तिला भरारी घेण्याची प्रेरणा मिळाली. पंधराव्या वर्षीच तिने आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एकटीने तर एकटीने पण बाहेर पडायचंच असा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. तिचा हा निर्णय अजिबात चुकीचा नव्हता हेही तिने सिद्ध करून दाखवले.

 

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने चांगले शिक्षण काही नशिबात नव्हतेच. पोट भरण्यासाठी तिनेही काही दिवस शिवणकामासारखे काम केले. येणारा काळ कम्प्युटर्सचा असणार हे ओळखून तिने जवळच्याच परिसरात कम्प्युटर क्लास लावला. क्लासची पैसे भरण्यासाठी तिने वडिलांना कर्ज काढायला लावले. अर्थात शाहीनचा हा हट्ट काही अगदीच जगावेगळा नव्हता तरीही त्यासाठी तिच्या वडिलांनी कर्ज काढले. क्लासची फी भरता यावी म्हणून शाहीन रेल्वेचा प्रवासही टाळत असे. क्लास ते घर आणि घर ते क्लास हा प्रवास ती पायीच करायची. पण या कंप्युटर क्लासनेच तिचे नशीब बदलवून टाकले.

 

जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबायचे नाही, अशी जिद्द उराशी बाळगूनच तिने हा प्रवास केला. शाहीनचे यश पाहून आज अनेकांचे डोळे दिपले असतील. मुंबईच्या एक झोपडपट्टीपासून ते अलिशान फ्लॅट पर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

 

Image source Google

बॅड बॉय बिलेनियर या नेटफ्लिक्स सिरीजमध्ये मुंबईच्या झोपडपट्टीचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये शाहीनने आपले जुने घर ओळखले आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून तो ट्विटरवर पोस्ट केला. सोबत माझे जुने घर पाहून मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण झाल्याचेही तिने लिहिले आहे. झोपडपट्टीपासून ते मायक्रोसॉफ्टची डिझायनर हेड होण्यापर्यंतच्या आपल्या प्रवासाबद्दल तिने या पोस्टमध्ये थोडक्यात उल्लेख केला आहे.

 

तिच्या या पोस्टमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अनेकांनी तिचे आणि तिच्या वडिलांचे कौतुक केले आहे. तिची ही ट्विटर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एनडीटीव्हीने तिची मुलाखत घेतली ज्यामध्ये तिने आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.

 

शाहीनच्या मते मुलींनी लहान वयात शिक्षणावर भर देणे जास्त आवश्यक आहे. कारण, शिक्षण हेच एकमेव असे शस्त्र आहे जे आयुष्याला संपूर्ण कलाटणी देऊ शकते. मुलींना आपल्या आयुष्यात बदल घडवून आणायचा असेल, आपले आयुष्य मागच्या पिढीपेक्षा अधिक चांगले आणि सुखी बनवायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. म्हणून मुलीनी शिकण्याला जात प्राधान्य द्यावे असे शाहीनचे म्हणणे आहे.

 

जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेणाऱ्याला कोणीच अडवू शकत नाही, इतके तरी शाहीनच्या या आयुष्यावरून आपल्याला कळते. मुलींना घडावयाचे असेल तर त्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणच तुमचे नशीब पालटू शकते.

 

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे डॉ. बाबासाहेब का म्हणाले होते हे शाहीन सारख्या मुलींच्या आयुष्याकडे पाहिल्यावर कळून येते. स्वतः डॉ. बाबासाहेब तर मृतीमंत उदाहरण आहेतच पण आजच्या काळातही शिक्षण हेच सामान्य माणसाच्या लढाईतील खरे हत्यार आहे, हे शाहीनकडे पाहिल्यावर लक्षात येते.

मेघश्री श्रेष्ठी

  

Post a Comment

0 Comments